दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १६
पुढच्या वेळी समिधा मनोजच्या घरी गेली तेव्हा आठवणीने आईला विचारून तिने तिची जन्मवेळ लिहून घेतली आणि मनोजच्या आईकडे दिली. मनोजची आई पण अति उत्साही. लग्न इतक्यात करायचे नव्हते तरी तिने त्यांच्या गुरुजींकडून समिधाची जन्मपत्रिका बनवून घेतली. जन्मपत्रिका बनवून झाल्यावर मात्र तिचा सारा उत्साह मावळून गेला. बाकी पत्रिका चांगली असली तरी समिधाच्या पत्रिकेत कडक मंगळ होता. ज्या दिवशी पत्रिका बनवून आली त्याच दिवशी मनोजच्या आईने त्याला सांगितलं,
"मनोज तुझं आणि समिधाचं एकमेकांवर कितीही जरी प्रेम असलं तरी आता हे लग्न होऊ शकणार नाही."
"असं का म्हणतेस आई अचानक तुझं तिच्याबद्दलचं मत बदललं की काय!"
"तिच्या पत्रिकेमुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल. समिधाच्या जन्मपत्रिकेत कडक मंगळ आहे ज्यामुळे तुझ्या जीवाला धोका किंवा इतर काहीही होऊ शकतं. आता हे कळल्यावर मी कदापि तुझ्या लग्नाला परवानगी देणार नाही."
"अगं आई प्रेमविवाह करताना कुठे जन्मपत्रिका बघितली जाते. उलट ज्यांची पत्रिका पाहिली जात नाही त्यांचे विवाह जास्त यशस्वी होतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे."
"अगं हा म्हणतोय ते खरं आहे. हल्ली कोणी पत्रिकेचा बाऊ करत नाहीत. त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम असताना तो इतर कोणाशी लग्न करून सुखी होईल का!"
"अहो सुरुवातीला त्याला तिची आठवण येईल पण एकदा का दुसऱ्या सुंदर मुलीशी लग्न झालं, संसारात पडला की तो नक्कीच तिला विसरून जाईल."
"आई माझं प्रेम काय एवढं तकलादू नाही. तू जर आमच्या लग्नाला विरोध केलास तर मी इतर कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही."
"तू माझं न ऐकता या मुलीशी लग्न केलंस तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वईट करून घेईन."
"अगं काय म्हणतेस तू! असं आपल्या मुलाला वेठीस धरू नये. तो सुद्धा म्हणू शकतो ना की माझं हीच्याशी लग्न नाही झालं तर मी आत्महत्या करेन. त्यावेळी तू काय करशील. उगाच असं भावनांचं भांडवल करू नकोस. समिधा किती गुणी मुलगी आहे. इतके दिवस तू तीचे गुण गात होतीस. लगेच फक्त पत्रिकेमुळे ती अपशकुनी ठरते का?"
"नाही बाबा आत्महत्या मी कधीच करणार नाही. मी इतका पळपुटा नाही आहे. मी आईचं मत बदलण्याची वाट बघेन. पण तिच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही. आई फार तर तू यावर काय उपाय असेल तर तो कर. इतका टोकाचा निर्णय घेऊ नकोस. समिधा आताच्या जमान्यातील असून पण खूप वेगळी आहे. तिला परिस्थितीची जाणीव आहे."
"अगं आपलं आता काय राहिलं आहे. या मुलांचं तरुण वय आहे. त्यांना जीवनात एकमेकांची साथ मिळाली तर त्यांचा संसार नक्कीच सुखाचा होईल. तू इतका स्वार्थीपणे विचार करू नकोस ना! उलट मोठ्या मनाने तयार हो."
"तुम्हाला बोलायला काय जातंय. अहो उद्या उठून माझ्या मुलाला काय झालं तर मी माझा मुलगा कायमसाठी गमावून बसेन असं नाही का वाटत तुम्हाला? माझं आईचं मन एक आईच जाणू शकते."
"कोणत्या जमान्यात जगतेस तू. असं वाईट घडेलच याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. आपण नेहमी सकारात्मक विचार करायचा."
"तुम्ही दोघांनी मला कितीही समजावलं तरी मी माझं मत बदलू शकत नाही."
आईच्या या कटू निर्णयामुळे मनोजची सारी मखमली स्वप्न पायदळी तुडवली जात होती. त्याला खूपच वाईट वाटत होतं. आपली आई अशा बुरसटलेल्या विचारांची असेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. तिने एकटीने पुढचा मागचा काही विचार न करता हा निर्णय कसा घेतला ह्याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. त्याच्या बाबांना पण तिचं हे वागणं अजिबात पटलं नव्हतं.
मनोज दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये गेल्यावर त्याचा उदास चेहरा पाहून समिधाने त्याला विचारलं,
"मनोज काय झालं तुझा चेहरा असा का दिसतो?"
तिने पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. तिने त्याचा हात धरला,
"चल लगेच माझ्याबरोबर कॅन्टीनमध्ये आणि काय झालं ते सांग."
दोघं कॅन्टीनमध्ये एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसले. समिधा पटकन जाऊन दोन चहा आणि पाणी आणायला सांगून मनोज जवळ आली. तिने मनोजला पाणी प्यायला दिले आणि त्याच्या हातावर हात ठेवून धीर देत तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले,
"समिधा आता सगळं संपलं ग. आईने तुझी पत्रिका बनवून घेतली त्यात तुला कडक मंगळ आहे असं कळलं आणि तिने आपल्या प्रेमाला, लग्नाला नकार दिला. ती म्हणाली समिधाशी जर तू लग्न केलंस तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईन. मी आणि बाबांनी आईला खूप समजावले पण ती मानायलाच तयार नाही. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही ग."
(मनोजचे हे निर्वाणीचं बोलणं ऐकून समिधा त्याला आता काय सांगेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा