दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १७
मनोजचं बोलणं ऐकून समिधाला वाटलं आपल्या पहिल्यावहिल्या प्रेमाची आपल्याला अशा तऱ्हेने आहुती द्यावी लागणार का! म्हणूनच आईने मला सांगितलं होतं की पत्रिकेत कडक मंगळ आहे हे कोणाला सांगू नको. आता आपली जीवननौका अशी अधांतरीच तरंगत राहणार का! कारण ठरवून लग्न केलं तर पत्रिका बघितली जाईलच. त्यापेक्षा आपण आपल्या मनोज वरील प्रेमाला तिलांजली दिलेलीच बरी. समिधा शांत बसलेली पाहून मनोज तिला म्हणाला,
"अगं तू काहीतरी बोल ना अशी शांत बसू नकोस. तू जर तयार असशील तर मी आईच्या मनाविरुद्ध तुझ्याशी लग्न करून आपण वेगळे राहू."
"नाही मनोज हे कदापि शक्य नाही. अरे आई-बाबांनी आपल्याला वाढवायला किती कष्ट घेतलेले असतात. त्यांची कितीतरी स्वप्न आपल्यामध्ये त्यांनी बघितलेली असतात. त्यांच्या मनाविरुद्ध मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार. त्यांना दुखवणं म्हणजे एक प्रकारे मी माझ्या आई-बाबांना दुखावण्यासारखं आहे, नाही का!"
"माझी मधल्या मध्ये खूपच विचित्र अवस्था झाली आहे. मला आई बाबा आणि तू सुद्धा हवी आहेस. कोणती युक्ती केली तर हे सारं जुळून येईल असं तुला वाटतं."
"नाही मनोज शेवटी जी देवाची इच्छा असते तसंच घडतं. माणूस फक्त प्रयत्न करू शकतो पण यश देणं `त्याच्याच `हातात असतं. मला असं वाटतं की आता आपण इथेच थांबायला हवं. तुला आणि मला वेगवेगळ्या मार्गावरून चालावं लागेल. तू निराश होऊ नकोस कदाचित तुला माझ्यापेक्षा जास्त चांगली बायको मिळू शकेल."
"मला तुझ्या पेक्षा चांगली बायको मिळाली तरी मी सुखी होणार नाही पण माझ्या जीवनात तू आलीस तर माझं जीवन एक सुंदर मधुबन होऊन जाईल."
"मनोज आता तुला असं वाटतंय पण या सगळ्यावर काळ हाच एक रामबाण उपाय आहे. हळूहळू सगळं मार्गी लागेल."
"तुला वाईट वाटत नाही का, तुला माझा खूप राग येत असेल. समिधा मला माफ कर."
"मनोज असं नको म्हणूस हे सगळे माझ्या नशिबाचे भोग आहेत. ते मला भोगायलाच लागणार आहेत. अजून पुढे काय काय बघावं लागेल काहीच सांगू शकत नाही. लहानपणापासून माझं आयुष्य कष्ट, अडचणी यातूनच गेलं आहे. हे विधिलिखित आहे. चल तुला पुढील आयुष्य साठी खूप खूप शुभेच्छा, आनंदी राहा."
असं म्हणून समिधा तिथून उठली आणि मागे न वळता पटकन निघाली. एक बरं होतं की हे शेवटचं वर्ष होतं आणि परीक्षा जवळ आली होती त्यामुळे आता मनोजशी समोरासमोर भेट होण्याचा जास्त प्रश्न येणारच नव्हता. तिच्या मनात आलं हा प्रेमाचा काळ किती रमणीय होता. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आपण मनोजलाच पाहत होतो. एक बरं आहे की आपल्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल काही माहीत नाही. नाहीतर त्यांच्या मनावर खूप मोठा आघात झाला असता. आपल्या मुलीच्या बाबतीत असं घडलं तर आई-वडिलांना किती मानसिक त्रास होतो.
मनोज बरोबरचा ऋणानुबंध इथेच संपला असं म्हणून आता पुढे चालायचं. तसं पण आता परीक्षा जवळ आली आहे नेटाने अभ्यास करून खूप चांगले मार्क मिळवायला हवेत. ती घरी आली तेव्हा आई दरवाज्यातच होती.
"समिधा तुझा चेहरा उतरलेला का दिसतोय कोणी काही बोललं का ग तुला."
"नाही ग आई आता परीक्षा जवळ आली आहे अभ्यासाचं थोडं दडपण येतं ना म्हणून."
"चल कांदेपोहे केले ते खाऊन चहा घे गरम गरम बरं वाटेल."
"आई मला आत्ता भूक नाही मी रात्री एकदमच जेवेन."
समिधा सहज बोललं असल्यासारखी दाखवत होती तरीसुद्धा सुषमाताईंना लक्षात येत होतं की नक्कीच तिचं काहीतरी बिनसलं आहे.
आई बाबा आणि मावशी हॉलमध्ये एखाद्या सुयोग्य तरुणाला आव्हान करायला गेले आणि इतक्या कालावधीत समीधाने आपला हा पूर्ण जीवनपट पाहून घेतला.
(समिधाचे बाबा आता कसे आवाहन करतील आणि कोण मोठ्या मनाचा तरुण पुढे येईल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा