Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १८

अपघाताने दुसऱ्याच मुलाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १८


सुभाषराव, सुषमा, नीलिमा आणि तिचे पती चौघेजण स्टेजवर आले खरे पण सुभाष रावांना कळत नव्हतं की आता सुरुवात कशी करायची. त्यांनी आपल्या डोक्यावरील फेटा हातात घेतला आणि सर्वांना उद्देशून म्हणाले,

"तुम्ही सगळेजण आमचेच नातेवाईक, स्नेहीजन आहात. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत कळलं असेलच की कुमार कुठेतरी निघून गेला आहे आणि तो कुठे गेला आहे त्याच्या आई-बाबांना खरोखर माहित नाही. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता इथे अनेक सुविद्य, विवाहोत्सूक तरुण आहेत. मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुमच्यापैकी कोणी सुयोग्य वर माझ्या मुलीशी आत्ता या क्षणी लग्न करू शकेल का?"

त्यांच्या अचानक अशा बोलण्यामुळे सर्व हॉलमध्ये शांतता पसरली. वयस्कर लोक उपस्थित तरुणांकडे पाहू लागले. पूर्ण आयुष्याचा निर्णय कोणीही तडकाफडकी घेणार नव्हता. सुभाषराव पुन्हा म्हणाले,

"तुम्ही सगळ्यांनी माझ्या लेकीला समिधाला इथे पाहिलंच आहे. माझी मुलगी म्हणून मी सांगत नाही पण ती खरोखर सुशील, नम्र आणि कर्तबगार आहे. ज्या कोणाशी तिचं लग्न होईल त्याला ती नक्कीच सुखात ठेवेल."

इतक्यात समोरून एक रंगेल, नखरेबाज तरुण चालत येत होता. त्याला पाहून सुषमाताईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो होता मयूर, त्यांचा लांबच्या नात्यातला अतिशय श्रीमंत, व्यसनाधीन, अय्याश असा एक मुलगा. तो पुढे येऊन म्हणाला,

"मावशी मी तुझ्या समिधाशी लग्न करतो. तसं पण कॉलेजमध्ये असल्यापासून मला ती खूप आवडते."

तो स्टेजची पायरी चढायला लागल्याबरोबर सुषमाताई कडाडल्या,

"तू तिथे खालीच थांब अजिबात वर यायची गरज नाही. तुझ्यासारख्या व्यसनाधीन मुलाशी लग्न करून देण्यापेक्षा माझी मुलगी बिन लग्नाची राहिली तरी चालेल. तू इथून तात्काळ निघून जा."

तो आत्ता पण बहुतेक थोडा पिऊनच आला होता. तो म्हणाला,

"तू इथे सर्वांसमोर माझा अपमान केला आहेस. मी याचा बदला नक्कीच घेईन."

"चल चालू लाग." हॉलमधील दुसऱ्या त्याच्या ओळखीच्या दोन-तीन जणांनी त्याला बाहेर नेऊन सोडलं. सुषमाताईंना अश्रू आवरत नव्हते. आपल्या मुलीच्या लग्नात आलेलं हे विघ्न आणि चाललेली विटंबना त्यांना सहन होत नव्हती. हॉलमध्ये पुन्हा कुजबुज सुरू झाली. "शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात" यासारखी सर्वांची भावना होती. प्रत्येकाला वाटत होतं की दुसऱ्याच एखाद्या तरुणाने लग्नासाठी तयार व्हावं. इतक्यात एक तरुण उठून उभा राहिला. थोडा सामान्य रूपाचा आणि साधारण समिधाच्याच उंचीचा तो तरुण आपल्या वयापेक्षा थोडा थोराड वाटत होता. त्याच्याबरोबर पन्नाशीच्या आसपासची एक रुबाबदार व्यक्ती असे ते दोघेजण स्टेज कडे चालत आले.

स्टेजवर आल्यानंतर त्या तरुणाने प्रथम तो फेटा बाबांना डोक्यावर ठेवायला सांगितला आणि माईक हातात घेऊन म्हणाला,

"काका तुम्ही हा फेटा आधी तुमच्या डोक्यावर घाला. जे काही घडलं आहे त्यात तुमची किंवा तुमच्या मुलीची काहीच चूक नाही असं असताना तुम्ही एवढे लाचार होऊ नका. या सर्व गोष्टी
दैवाधीन असतात."

"तुमचे विचार खूप चांगले आहेत. तुम्ही तुमची ओळख करून द्याल का?"

"मी अभिराम गद्रे. तसा मी कुमारचा मित्रच आहे. आमची व्यावसायिक ओळख आहे. मी स्वतः सीए आहे आणि माझा व्यवसाय आहे. कंपनीच्या कामानिमित्त मी कुमारच्या ऑफिसमध्ये ये जा करत असतो. तेव्हा आमची चांगली ओळख झाली आहे आणि हे कुमारचे साहेब आहेत. माझ्याबद्दल हे तुम्हाला अधिक माहिती सांगू शकतात."

"नमस्कार. मी श्रीकांत सबनीस. कुमार ज्या कंपनीत काम करतो तिथे मी डेप्युटी जनरल मॅनेजर आहे. हे अभिराम गद्रे स्वकष्टातून वर आलेले आणि खूप मेहनती, हुशार आहेत. ते आमच्या कंपनीचे सी ए आहेत. आता तुम्हाला ते योग्य वाटत असतील तर तुम्ही तुमच्या मुलीशी त्यांची भेट घालून द्या. इतर माहिती ते स्वतः तुम्हाला सांगतील."

सुषमा ताईंना अभिरामचे रूप पाहून वाटले की आपली नक्षत्रासारखी मुलगी ह्याला द्यायची का? अर्थात मुलाचे रूप न बघता कर्तबगारी बघायची असते. शेवटी जो काही निर्णय असेल तो समिधाला घ्यायचा आहे. इतक्यात अभिराम म्हणाला,

"काका मी खाली थांबतो. तुम्ही तुमच्या लेकीशी बोलून बघा. त्यांची ईच्छा असेल तर मी त्यांच्याशी बोलेन."

सुभाष रावांनी सगळ्यांना शांत राहून हॉल मध्ये थांबण्याची विनंती केली आणि ते सगळे समिधाच्या रूम मध्ये गेले.

(सुभाष राव समिधाशी बोलल्यावर ती काय निर्णय घेईल पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all