दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १९
इथे रूममध्ये बसून समिधाला बाहेर काय चाललं आहे ते कळत नव्हतं. इतक्यात आई बाबा आत आले. बाबा तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले,
"समिधा अभिराम रेगे नामक एक सी ए तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तुला आधीच सांगतो की तो रूपाने सामान्य आहे पण कर्तबगार आहे. आम्हाला दोघांना तो तुझ्यासाठी योग्य वाटतोय. तुझी ईच्छा असेल तर तू त्याच्याशी बोलून घे आणि मगच तुझा निर्णय कळव."
समिधाच्या मनात आलं आता आपल्याला कुठे काही चॉइस राहिलाय. आता फक्त आपण आपल्या आई बाबांच्या इभ्रतीचा विचार करायला हवा. सकाळपासून त्यांच्या मनावर किती दडपण असेल. ह्या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम व्हायला नको. सगळेच आपल्या निर्णयाची आशाळभूतपणे वाट पाहत असतील. तिने बाबांकडे पाहत म्हटलं,
"आई बाबा तुम्हाला दोघांनाही ते माझ्यासाठी योग्य वाटतोय तर आता मी त्याच्याशी वेगळं काय बोलणार. हो पण त्याला तुम्ही माझ्या पत्रिकेतील मंगळा बद्दल सांगा. जर त्याला हे मान्य असेल तर आणि तरच तुम्ही पुढची तयारी करा. मला मान्य आहे."
"हे बघ तुझ्या मनाविरुद्ध आपण काहीही करणार नाही आहोत. तू नीट विचार कर, थोडं बोल त्याच्याशी. मी त्याला इथे बोलावतो." अभिराम आल्यावर सर्वप्रथम तो त्या सर्वांना उद्देशून म्हणाला,
"तिथे सर्वांसमोर मी काही सांगितलं नाही. म्हटलं आधी तुमचा निर्णय बघून मग सगळं सांगावं. मी तीन वर्षांचा असल्यापासूनच माझ्या बाबांच्या एका अविवाहित मित्राकडे वाढलो. त्याची कारणं मी नंतर कधी सांगेन. माझा मुंबईत माटुंग्याला थ्री बी एच के फ्लॅट आहे. तिथे मी आणि माझे बाबांचे मित्र ज्यांना मी काका म्हणतो, आम्ही दोघच रहातो. माझ्या ऑफिसमध्ये एकूण पंचवीस स्टाफ आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. माझ्या पत्नीने नोकरी करावी की नाही हा सर्वथा तिचा प्रश्न आहे. लग्न झालं तर ती कधीही तुमच्याकडे येऊ शकते आणि तुम्ही सगळे सुद्धा कधीही तिकडे येऊ शकता. बाबा आता फक्त दोन मिनिटं तुमची परवानगी असेल तर मला समिधाशी एकटीशी बोलायचं आहे."
"हो काहीच हरकत नाहीं. पण त्या आधी तुला एक गोष्ट सांगायची आहे की समिधाच्या जन्मपत्रिकेत मंगळ आहे. हे ऐकून तुझं नकार असेल तर स्पष्ट सांग."
"काका माझ्या आयुष्यात इतकं काही घडलं आहे की पत्रिकेवर विश्वास ठेवण्याइतका मी दुबळा राहिलो नाही. लग्नाला माझी काहीच हरकत नाही."
"ठीक आहे तुम्ही समिधाशी बोला आम्ही थांबतो बाहेर."
समिधाच्या मनात आलं आता ह्याला आपल्याशी काय बोलायचं असेल! हा रूपाने सामान्य असला तरी खूप सच्चा वाटतोय. कसलीही लपवाछपवी नाही. खरंच आदर्श जोडीदार असाच असायला हवा नाही का! इतक्यात अभिराम शांतपणे म्हणाला,
"समिधा तुमच्या बाबतीत जे घडलं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपण कितीही काही म्हटलं तरी घडायचं ते घडतंच. आपलं लग्न झालं तर मी आयुष्यभर तुम्हाला तक्रारीला जागा ठेवणार नाही. तुम्हाला सुखात ठेवेन. मी आहे हा असा आहे. माझं आयुष्य खूप संघर्षमय रित्या गेलं आहे. आता ह्या घडीला तुमची अवस्था खूप दोलायमान झाली आहे. तुम्ही खूप हुशार आहात असं ऐकलं सर्वांकडून. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही कोणताही निर्णय घाई गडबडीने घेऊ नका. तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार असाल तर मी तयार आहे."
इतकं बोलून अभिराम बाहेर निघून गेला. समिधाच्या जीवनात सारं काही एखाद्या चित्रपटात शोभेल असं घडत होतं. तिने मनाशी ठरवलं आता काहीही झालं तरी ह्याच्याशी लग्न करायचं. काय माहित हेच आपल्यासाठी नंदनवन ठरू शकेल. हो तरी पण योग्य संधी मिळताच त्याला मनोजाबद्दल नक्की सांगायचं. आज आपण दोघं अनोळखी आहोत. तसं पण जेव्हा ठरवून लग्न करतात तेव्हा कुठे नवरा बायको एकमेकांना जास्त ओळखत असतात. तिने बाबांना आत मध्ये बोलावलं आणि म्हणाली,
"बाबा मी या लग्नाला तयार आहे."
"तू जर पूर्ण विचार केला असशील तर आपण पुढे जाऊया."
बाबांनी बाहेर जाऊन सर्व मंडळींना सांगितलं की आता थोड्याच वेळात लग्न लागेल. उपस्थित मंडळींनी वधू वरांना आशीर्वाद आणि प्रेमळ शुभेच्छा देऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा. गुरुजींनी लगेच पुढील विधींची तयारी केली. अभिरामने जे कपडे घातले होते त्यानिशीच तो लग्नाला उभा राहिला. हा विवाह सोहळा सर्वांच्या स्मरणात नक्कीच राहणार होता.
समिधाशी लग्न करण्यासाठी कोणी तरुण पुढे येतो की नाही ह्याची काळजी श्रीरंग रावांना सुद्धा होती. त्यामुळे त्यांची काही लोकं तिथेच थांबली होती. त्यांच्या मनातून कुमारचा विचार जाता जात नव्हता.
(कुमार राजन बरोबर आश्रमात गेला असेल तर तिथे काय घडलं पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा