Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २०

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २०


कुमारची टॅक्सी भरधाव वेगात पुढे जात होते. चिंतन स्वामींचा आश्रम शहरापासून थोडा दूर होता. टॅक्सीच्या वेगासारखेच कुमारचे विचार सुद्धा वेगाने धावत होते. राजनने त्याला टॅक्सीत काहीही न बोलण्याची सूचना केली होती त्यामुळे तो सुद्धा गप्प होता. इतक्यात आश्रम आला आणि दोघेही तिथे उतरले. उतरल्याबरोबर जवळच्याच कचराकुंडीत कुमारला राजनने त्याचा मोबाईल फेकून द्यायला सांगितला. इतका महागाचा मोबाईल फेकायचं खरंतर कुमारच्या जीवावर आलं होतं परंतु त्याने स्वतःला समजावलं आता आपल्याला साऱ्या मोहमायेचा त्याग करायला हवा.

प्रवेशद्वारातून आत शिरताच आश्रमाचा विस्तीर्ण परिसर कुमारच्या नजरेत भरला. आश्रमाची रचना खूप कल्पकतेने केली होती. आश्रमातीलच एखाद्या वास्तुविशारदाने ती रचना केली असावी. ठिकठिकाणी मोठे वृक्ष होते. एका बाजूला सर्वांची राहण्याची सोय केली होती. एका बाजूला विस्तीर्ण भोजनालय होतं. मध्यभागी एक विस्तीर्ण मंडप होता स्वामीजींचे प्रवचन ऐकण्यासाठी. तिथे अनेक लोकांची बसण्याची सोय होऊ शकत होती. ज्या लोकांना खाली बसता येत नव्हतं त्यांच्यासाठी मागच्या बाजूला खुर्च्या ठेवल्या होत्या. आश्रमात गाई म्हशी अशी दुभती जनावरे होती. आश्रमात शीरताच कुमारला जाणीव झाली आपण योग्य ठिकाणी आलो आहोत.

राजन सर्वप्रथम त्याला चिंतन स्वामींकडे घेऊन गेला. चिंतन स्वामी त्याला म्हणाले,

"वत्सा तू इथे आलास आणि आमच्या कार्याला हातभार लावू इच्छितोस हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आता सर्वप्रथम राजन तुम्ही यांना आपल्या प्रथेप्रमाणे स्नादादि उरकून आपल्या आश्रमातील वेश परिधान करण्यास द्यावा. त्यानंतर तुमचं भोजन उरकल्यावर तुम्ही यांना माझ्याकडे घेऊन या मग आम्ही त्यांच्याशी सविस्तर बोलतो."

दोघे स्वामीना नमस्कार करून निघून गेले. आश्रमात लहान मुलांपासून अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत लोक होते. तेथील काही लोकांच्या चेहऱ्यावर खानदानी तेज दिसत होतं. कुमारचे स्नान झाल्यावर आश्रमाचा वेष परिधान करून ते दोघं भोजनालयात आले. तिथे खूप शिस्त होती. प्रत्येकाने आपली थाळी घेऊन हवं तेव्हढा वाढून घ्यायचं. कोणीही त्यात अन्नाचा कणही टाकता कामा नये असा नियम होता. त्यानंतर प्रत्येकाने आपली थाळी, पाण्याचं भांड स्वच्छ धुवून ठेवायचं. जेवण खूप साधं परंतु चविष्ट होतं.

जेवून दोघे जण स्वामींकडे आले. स्वामीना त्यांनी प्रणाम केला आणि ते दोघे त्यांच्या समोर बसले. राजनने त्यांच्या प्रवचनाने कुमार कसा प्रभावित झाला आणि आज तो कोणत्या परिस्थितीत इथे आला ते सांगितलं. ते ऐकून स्वामीजी व्यथित झाले आणि म्हणाले,

"हे तू चांगलं केलं नाहीस. इथे येताना तुम्ही कमीत कमी आपल्या घरच्याना विश्वासात घ्यायला हवं होतं. ज्या मुलीशी तुम्ही लग्नाला तयार झाला होतात तिचं पुढे काय होईल ह्याचा विचार करायला हवा होता. तुमच्या सारख्या उतावळ्या माणसांमुळे आश्रमाचे नाव खराब होतं. इतक्या उदात्त कामाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज होतात. आता सर्वात आधी तुम्ही तुमच्या पिताजीना फोन करून कळवा तुम्ही इथे आला आहात आणि इथे तुम्ही सुरक्षित आहात. दुसरं म्हणजे त्यांना दिलासा द्या की तुम्ही महिन्यातून एकदा त्यांना भेटायला जाऊ शकता."

कुमार आणि राजन बाहेर आले. कुमारला वाटलं स्वामिनी आपल्याला किती छान समजावून सांगितले. त्याने राजनकडून फोन घेऊन बाबांचा नंबर फिरवला. तो बाबांना काही सांगणार इतक्यात बाबाच त्याला बोलले,

"अरे कुमार तू शेवटी गेलासच ना चिंतन स्वामींकडे."

"बाबा तुम्हाला कसं कळलं."

"दोन ओळींची चिठ्ठी लिहिली होतीस ना आमच्यासाठी."

"बाबा मला माफ करा. मी खूप चुकीचं वागलो आहे. पण स्वामीजींनी मला समजावून सांगितलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला फोन केला."

"तुझी चूक तुला कळली ना. मग आता कधी परत येणार आहेस. ये लवकर. तुझ्या आईच्या डोळ्याला डोळा लागला नाही कालपासून."

"नाही बाबा मी आता परत येऊ शकत नाही. मी लग्न करून कोणत्याही मुलीचं आयुष्य उध्वस्त करू शकणार नाही. माझं मन संसारात रमू शकणार नाही. बाबा आता तुम्ही पण तो विषय सोडून द्या. मी तुम्हाला महिन्यातून एकदा भेटायला येत जाईन."

"ठीक आहे सांगतो मी आईला तसं. मुलगा असून आम्ही निपुत्रिक असल्यासारखं वाटतंय. आमचं प्राक्तन दुसरं काय!"

बाबांनी फोन ठेवला आणि कुमारशी असलेले त्यांचे बंध तुटले.

(कुमारचा अध्याय इथे संपला आता समिधा आणि अभिरामच्या लग्नाचं काय होतं पाहूया पुढील भागात.)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all