Login

माझे मन अखेर तुझे झाले _भाग २१

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २१


सकाळपासून ज्या घटना घडल्या होत्या त्याने समिधा खरं तर खूप संभ्रमात पडली होती. तिच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट दिसत होतं. आता अभिराम लग्नाला तयार झाला होता. अभिरामच्या बाजूने त्याचे साहेब आणि कुमारचे कंपनीतले अजून तीन चार सहकारी होते. तो बिचाऱ्या साध्या शर्ट पँट मध्येच लग्नाला उभा राहिला. कोणीतरी त्याच्या डोक्यावर टोपी घातली. सगळी तयारी झाल्यावर गुरुजींनी नवऱ्या मुलीला घेऊन यायला सांगितले. समिधा तिच्या मामाबरोबर सावकाश एकेक पाऊल उचलत विवाह वेदी कडे येत होती.

त्याही परिस्थितीत सुंभाष राव आणि सुषमा यांना देवाने आपली लाज राखली म्हणून कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. सुभाष रावांना वाटलं अजून जर थोडा वेळ गेला असता तर ह्या सर्वांचा ताण असह्य होऊन कदाचित आपल्याला हार्ट अटॅक आला असता. म्हणूनच आपल्याकडे लग्नकार्य सुरळीत पार पडावे म्हणून देवाला साकडं घालत असावेत. कार्य होईपर्यंत कोणते संकट उपस्थित होईल कोणी सांगू शकत नाही. एकदा ते व्यवस्थित पार पडलं की यजमानाच्या जीवात जीव येतो. त्यातही मुलीच्या आई बाबांना तर खूपच समाधान मिळतं.

मंगलाष्टकं चालू होती आणि अभिरामच्या मनात येत होतं की आपण कधी लग्न करू असा विचार पण केला नव्हता. आपलं जीवन म्हणजे एका फकीराचं जीवन होतं जे अगदी सरळ रेषेत चाललं होतं. आपण कधीच सोसायटीत अथवा कार्यालयात कोणाच्या अध्यात मध्यात नसतो. एक आहे कोणी अडला नडला दिसला तर आपण त्याला लगेच मदत करतो. त्यामुळे अशा सर्वांचे आपल्याला नेहमीच आशीर्वाद मिळत असतात. कदाचित त्यातलाच एखादा आशीर्वाद फळला असेल आणि समिधा सारख्या सर्वच बाबतीत सरस असलेल्या मुलीशी आज आपलं लग्न होतंय. आपण तिच्याशी लग्न तर करतोय पण तिला आपण पूर्ण न्याय देऊ शकू ना. तिच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकायला हवं ना. एकंदरीत समिधा खूप समजूतदार वाटते आहे. कदाचित दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं असेल तर आपल्या आयुष्यात खूप प्रश्न निर्माण होऊ शकतात.

समिधा अभिराम समोर अंतरपाटाच्या आड उभी होती. डोक्यात फक्त आणि फक्त भावनांचे कल्लोळ. एक तर प्रत्येक मुलीच्या मनात आपले घर आपण कायमचे सोडणार म्हणून खूप हळव्या भावना असतात. आता आपण तिथून निघालो की कमावणारा एक हात कमी होणार. आपल्याला खूप छान पगार आहे आणि आपण घरातील खर्चाचा बऱ्यापैकी हातभार उचलायचो. मला वाटतं अभिरामची आर्थिक स्थिती उत्तम आहे. आपण त्यांना विनंती केली तर आपल्या पगारातील काही हिस्सा ते आपल्याला घरी देऊ देतील. म्हणजे बाबांवरचा भार थोडा तरी कमी होईल. ह्या विचाराने तिला थोडं बरं वाटलं.

अभिरामच्या मनात येत होतं समोर असलेली मुलगी आता ह्या क्षणापर्यंत आपल्याला पूर्णतया परकी होती. आता तिच्या गळ्यात वरमाला घातल्यावर ती आपली बायको होणार. हे नातं आपल्याला नाकापेक्षा मोती जड असं तर नाही होणार ना. सुंदर मुलीच्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा पण खूप भारी असतात. आता ती आणि तिच्या घरचे अडचणीत आहेत म्हणून ती लग्नाला तयार झाली असेल आणि नंतर कदाचित ती आपल्यावर अधिकार गाजवू लागेल. आपल्या काकाला ती प्रेम देऊ शकेल का? मी आणि काका आपण एकमेकांशी लहानपणापासून एका अतूट बंधनात बांधलो गेलो आहोत. ती घरात आल्यावर कलाह निर्माण होता कामा नये. नाहीतर आगीतून सुटून फुफाट्यात पडल्यासारखं होईल.

"आली लग्नघटी समीप" वधू आणि वराला सावध करणारं मंगलाष्टक सुरू झालं आणि दोघांच्याही हृदयाची धडधड वाढू लागली. उपस्थित मंडळी शिल्लक असलेल्या अक्षता वधू वरावर टाकण्यासाठी सज्ज झाली होती. इतक्यात, "शुभ मंगल, सा sss व धान" उच्चारले गेले आणि अंतरपाट दूर झाला. दोघांनीही एकाच वेळी नजर उचलून एकमेकांकडे पाहिले.

(दोघांच्या नजरा एकमेकांना काय सांगत होत्या पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all