दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २२
अंतरपाट दूर झाला आणि समिधा आणि अभिराम दोघांनीही एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले. अभिरामची नजर समिधाला खूपच धीर देणारी, आश्वस्त वाटली. तो जणू नजरेने तिला सांगत होता,
"समिधा घाबरू नकोस. मी आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुझ्या सोबत असेन. जेव्हा तू उदास असशील तेव्हा तू न सांगताही तुझ्या उदासीचे कारण मी समजून घेईन. तू आनंदात असशील तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच मला सर्व काही सांगून जाईल. जेव्हा तुला तुझ्या माहेरची आठवण येईल तेव्हा मला तुझ्या हालचालीतून लगेचच कळेल आणि मी स्वतः तुला तुझ्या माहेरची वाट दाखवेन. तुझ्या प्रगतीचा प्रत्येक टप्पा माझ्यासाठी आनंदाचा असेल. मी कधीच तुझा हेवा करणार नाही. मी तुझ्या कर्तृत्वाच्या आड कधीच येणार नाही. मी तुला चूल आणि मूल या जुनाट रहाटगाडग्यात कधीच अडकवून ठेवणार नाही. आता आकाश हेच तुझ्या प्रगतीची मर्यादा आहे. खूप यशस्वी हो. मी कायम सावलीसारखा तुझ्या सोबत असेन. तुझ्यावर आलेलं कोणतंही संकट मी आधी माझ्यावर झेलून घेईन."
अभिरामने समिधाच्या नजरेत पहिलं आणि ती त्याला म्हणत होती,
"माझ्या जीवनाची दोरी अपघाताने जरी तुमच्या हातात आली असली तरी मी प्राणपणाने तुमचा संसार नीटनेटका करेन. तुम्हाला मान खाली घालवी लागेल असे कृत्य माझ्या हातून कधीच होणार नाही. आपली जोडी एकमेकांना शोभेशी नसली तरी मी दिसण्यावरून कधीच तुमचा अपमान होऊ देणार नाही. घरात आणि समाजात तुमचा मान कसा राखला जाईल हे मी कटाक्षाने पाहिन. तुमच्या संघर्षमय जीवनाबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल."
"चला आता दोघानी एकमेकांच्या गळ्यात हार घालायचा आहे." गुरुजींचे हे शब्द ऐकताच दोघांचीही तंद्री भंगली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. कुटुंबातील एका वयस्कर स्त्रीने त्यांच्या प्रथा प्रमाणे दोघांचे डोके एकमेकावर आपटलं. आता सर्वांच्या चेहऱ्यावर मंद स्मित दिसत होतं. समिधाने हळूच अभिरामच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं. तो दिसायला हँडसम नसला तरी त्याच्या चेहऱ्यावर बुद्धीचे आणि कर्तबगारीचे तेज झळकत होतं. डोळ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता. त्या नंतर इतर विधी पार पडले. सप्तपदी चालताना समिधाच्या मनात आलं असं कोणाच्या आयुष्यात घडत असेल का! मनोज आपल्या आयुष्यात असताना आपण त्याच्या बरोबर सप्तपदीची स्वप्न पाहिली होती. ती नक्कीच इंद्रधनुच्या सप्तरंगासारखी होती. ती स्वप्न भंग पावल्यावर कुमारशी लग्न ठरलं. आपण ते पण स्वीकारलं. आयुष्यात जे जे समोर आलं आपण स्वीकारत गेलो. कधीही कुठच्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. देव पण अशाच माणसांच्या परीक्षा घेत असतो का? काही जणांचं नशीबच इतकं चांगलं असतं की त्यांना न मागताही हवं ते मिळत असतं. ठीक आहे देवा माझ्या पदरात जे दान पडलं ते मी स्वीकारलं आहे. जे मिळालं आहे त्यात मी समाधान मानणार आहे.
सगळे विधी पूर्ण झाल्यावर वधू आणि वर आपापल्या खोलीत जाण्यासाठी निघाले. इतक्यात शारीरिक आणि मानसिक श्रमाने समिधाला थोडी भोवळ आल्यासारखं झालं. पडते असं वाटल्यावर लगेचच अभिरामने तिला आपल्या बाहुंचा सहारा दिला. समिधाला लगेचच सावरले. अभीरामने पटकन तिला थोडं पाणी प्यायला दिलं. त्याच्या या कृतीने समिधाला मनोमन खात्री पटली की पुढील आयुष्यात आपल्याला सावरण्यासाठी हा नेहमी आपल्या शेजारी असेल. अभिराम साठी वेगळे काही कपडे नव्हतेच. तरीही त्याच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याच्यासाठी सुंदर कपडे आणले.
रूम मध्ये आल्यावर अभिराम खुर्चीत शांतपणे बसला. सकाळी तो घरातून बाहेर पडताना कुमारच्या लग्नासाठी म्हणून निघाला. हे असं काही घडेल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते. त्याला वाटलं आपण हा निर्णय घेऊन चूक तर केली नाही ना! लग्न हा खरं तर एक जुगारच असतो. सारे फासे व्यवस्थित पडत राहिले तर दोघांचा एक छान संसार ठरू शकतो अथवा दोघांपैकी एक जरी हेकेखोर, दुराग्रही असला तर तो संसार नरक यातना ठरू शकतो. समिधाकडे पाहून त्याच्या मनात येत होतं की आपला निर्णय योग्यच आहे.
बाहेर जेवणाच्या पंगती उठत होत्या. आता शेवटची पंगत वधू वर आणि कुटुंबीय ह्यांची.
(वधू वरांची पंगत नेहमीप्रमाणेच हसती खेळती असेल की ती एक साधी इतरांसारखी पंगत असेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा