Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २३

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २३


सर्व पंगती उठल्यावर शेवटची मानाची पंगत म्हणजे वधू-वर आणि तिचे कुटुंबीय. अभीराम कडून तरी चार-पाचच माणसं होती. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर अभीराम आणि समिधा जेवण्यासाठी पंगतीत आले. दोघेही जण एकमेकांचे शेजारी अगदी गपचूप बसले. त्यांना तसं बसलेले पाहून नीलिमा मावशी उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या,

"हे बघा तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झाले सर्वांनाच माहिती आहे. पण आता या पुढील आयुष्य तुम्हाला एकत्र घालवायचं आहे तर आपण या पंगती पासूनच तुमच्या एकत्र आयुष्याची सुरुवात तुम्ही दोघांनी उखाणा घेऊन करा असं मी तुम्हाला सुचवते. समिधा जावईबापूंना घास भरव आणि नाव घे."

"अरे असं अचानक कसं मी नाव घेऊ! मला काही आता सुचत नाही."

"नाव घ्यायला सुरुवात कर आपोआप सुचेल."

सगळेजण उत्सुकतेने समिधाकडे पाहत होते. थोडं आठवल्यासारखं केलं आणि तिने अतिशय सुरेख उखाणा घेतला,

"ऐन मोक्याच्या क्षणी अभिरामनी दाखवला मोठेपणा मनाचा
नवीन जीवनाची करते सुरुवात रचून पाया विश्वासाचा "

"व्वा व्वा खूप सुंदर"

समिधाला सगळ्यांकडून छान दाद मिळाली. आता अभिराम काय उखाणा घेतो याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिले होते. तो पटकन म्हणाला,

"हा माझा प्रांत नाही. मला काही जमणार नाही."

"ए असे नाही चालणार. नाव घ्यावेच लागेल."

"वाटलं नव्हतं समिधाशी होईल अशी अचानक भेट
आता कधीच नाही तुटणार नशिबाने बांधलेली लग्नगाठ"

उखाणा घेण्यामुळे वातावरणातील ताण थोडा कमी झाला होता. लोक हास्य विनोद करत होते. जेवणानंतर मध्ये थोडा निवांत वेळ गेला. आता समिधाची पाठवणीची वेळ झाली होती. तिचे आई बाबा खूप हळवे झाले होते. एक तर लेकीच्या विवाहाला गालबोट लागलं होतं. नशीब पुढच सगळं नीट पार पडलं. समिधाला अश्रू अनावर झाले होते. तिच्या बहिणींची ताई आज दूर जाणार होती. त्या चौघींमध्ये खूप जिव्हाळा होता. त्यांच्यात कमावणारी समिधाच होती. ती त्यांचे लाड करायची. त्यांना काय हवं नको ते त्या तिलाच सांगायच्या. आता त्यांचा हक्काचा आधार दूर जाणार होता. समिधाला काळजी वाटत होती ती महिन्याच्या खर्चाच्या गणिताची. आई बाबांना हातभार लावते घरगुती पदार्थ तयार करून. पण दिवसेंदिवस महागाई वाढते तिचा हातभार किती पुरणार. शिवाय आता कामात आपली मदत नसेल अर्थात सायली करेलच तिला मदत. लवकरच आपण अभिराम जवळ हा विषय काढायला हवा. त्यांनी होकार दिला तर ठीकच आहे नाहीतर जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हा पैसे देत जाऊ.

समिधाच्या बॅग्जस भरलेल्याच होत्या. तिचा मावसभाऊ त्या घेऊन हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ आला. सगळेजण समिधाला निरोप द्यायला आले होते. आई खूपच भावविवश झाली होती. समिधा त्यांची पहिली मुलगी होती. साहजिकच ती खूप लाडकी होती. वेळप्रसंगी ती आईच्या बाजूने बाबांशी वाद घालायची. तिला सौंदर्या बरोबर बुद्धिमत्तेचा वरदहस्त लाभला होता. तिने आईला मिठी मारली त्या क्षणी सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. दोघीही मूकपणे अश्रू ढाळत होत्या. बाबा तर कातर स्वरात म्हणाले,

"समू मला माफ कर. तुझ्या लग्नात असं सगळं झालं. जावईबापू खूप चांगले आहेत. सुखाने संसार कर. आतापर्यंत तू सर्वांचं मन जपत आलीस. तुला सर्वांचे आशीर्वाद आहेत. तुझं सगळं चांगलच होईल. सुखी रहा पोरी."

बाबांना बोलणं असह्य झालं. नीलिमा मावशींच्या मिस्टरानी त्यांना जवळ घेतलं. तरीही बाबांनी अभीरामला म्हटलं,

"जावईबापू माझी समू खूप समजूतदार आहे. काही चुकलं तर मोठ्या मनाने सांभाळून घ्या. तुमचं आणि तुमच्या नातेवाईकांचे मानपान पुढे करू आम्ही. तुम्ही जो मनाचा मोठेपणा दाखवला ह्याबद्दल मी तुमचे आभार मानणार नाही पण कृतकृत्य झालो."

"अहो बाबा मी फार काही केलं नाही. उलट ध्यानीमनी नसताना मला समिधा सारखी सुशील, सुंदर आणि कर्तबगार पत्नी मिळाली. मी स्वतःला.खूप भाग्यवान समजतो. आज समाजात हे असं घडायला हवं. कित्येकदा हुंड्यापायी अथवा इतर काही कारणास्तव नवरदेव रुसून बसतो, कधी तर निघूनही जातो. त्यावेळी वधू आणि तिच्या घरच्यांचा विचार तो करत नाही. लग्न मोडले जाते. अशावेळी एखाद्या तरुणाने स्वतःच पुढे येऊन तिच्याशी लग्न करायला हवं."

"खरंच तुमचे विचार खूप उच्च दर्जाचे आहेत."

दोघेही आईबाबा आणि इतर मोठ्यांच्या पाया पडून निघाले.

(अभिरामच्या घरी समिधाचे स्वागत होईल की त्याचे काका ह्या सर्वाला विरोध करतील पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all