Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २४

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २४


अभिरामने जेवण झाल्यावर त्याच्या काकाला म्हणजे अनिल राणे यांना फोन करून त्याने लग्न केलं असल्याचं सांगितलं. त्यांना खूप मोठा धक्काच बसला. ते म्हणाले,

"अरे असं तडकाफडकी झालं तरी काय की तू अचानक लग्न केलंस मला कळवलं सुद्धा नाहीस. नक्की झालं तरी काय! तू कशात अडकला नाहीस ना!"

"काका मी सविस्तर तुला घरी आल्यावर सर्व सांगेनच. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. ती वेळच तशी होती की मला पटकन निर्णय घेणं भाग होतं. शिवाय तुला कळवून तिथे बोलवून घेणे एवढा वेळही नव्हता आणि मला ते पटकन सुचलं पण नाही. सगळच खूप घाई गडबडीत झालं आहे. मी तुला कळवलं नाही, तुझी परवानगी घेतली नाही त्याबद्दल सर्वप्रथम मी तुझी माफी मागतो. आता काही वेळातच मी आणि माझी पत्नी समिधा आणि तिच्याबरोबर तिची बहीण असे घरी येऊ. तू आपल्या मदतनीस कला मावशींना बोलावून थोडी तयारी करून घेशील का?"

"अरे घेशील का काय विचारतोस! ह्या सोनेरी दिवसाची गेले कित्येक महिने मी वाट पाहत होतो. तू घेतलेला निर्णय नक्कीच योग्य असणार ह्याची मला खात्री आहे. आता आशीर्वाद प्रत्यक्ष पाया पडूनच घे."

इथे अभिरामची गाडी त्याच्या सहकाऱ्यांनी थोडीफार सजवून घेतली. समिधाबरोबर पाठराखीण म्हणून सायली येणार होती. कोणीतरी मोठे बरोबर पाहिजे म्हणून सुषमाताई नीलिमाला म्हणाल्या,

"नीलिमा तू पण ह्यांच्या बरोबर जा. कोणीतरी मोठे बाईमाणूस सोबत असलेलं बरं."

अभिरामची गाडी त्याचा एक मित्र चालवणार होता. अभिराम, समिधा आणि सायली मागे बसले. साहेबांच्या गाडीत नीलिमा मावशी आणि इतर दोघे तिघे बसले. साश्रू नयनांनी समिधाला निरोप दिला गेला.

माटुंग्याला एका सुंदर इमारतीतून गाडी आत प्रवेशली. सिक्युरिटीने अभिरामला कडक सॅल्युट ठोकला. अभिरामचा फ्लॅट पाचव्या मजल्यावर होता. तिकडे गेल्यावर समिधाने पहिले पूर्ण मजल्यावर संस्कार भारतीची रांगोळी काढली होती, फुलांची सजावट केली होती. मुख्य म्हणजे दरवाजात कला मावशींनी सजवलेले सुंदर माप ठेवलं होतं. आरतीची तयारी केली होती. अभिरामने काकाला नजरेनेच कौतुकाची पावती दिली.

नव्या सुनेने माप ओलांडून गृहप्रवेश केला. दोघेही काका आणि कला मावशींच्या पाया पडले. काका हळव्या स्वरात म्हणाला,

"सुनबाई ह्या घरात तुझं स्वागत आहे. इथे तुला तू इथे आल्याबद्दल कधीच पश्चाताप होणार नाही ह्याची मी ग्वाही देतो. इथे तू नात्याने सुन असलीस तरी कायम तुला मुलीचे प्रेम मिळेल. माझ्यासारख्या अविवाहित माणसाचे काय पुण्य म्हणून अभिरामसारखा गुणी मुलगा माझ्या आयुष्यात आला. आणि आता आयुष्याच्या सांज उतरणीवरती तू माझ्या आयुष्यात आलीस. इथे जराही परकेपणा बाळगायचा नाही. हे तुझेच घर आहे. सुखाने संसार कर."

त्यांच्या शब्दांनी समिधाला खूप समाधान मिळालं. समिधाच्या मनात आलं या व्यक्तीचे विचार इतके चांगले आहेत आणि त्यांच्याच पालनपोषणामध्ये अभिराम मोठे झाले आहेत म्हणजे त्यांचे विचार सुद्धा नक्कीच खूप चांगले असणार. सकाळपासूनच्या धावपळीमुळे सगळेजण थकले होते काकाने सर्वांना बसायला सांगितले. इतक्यात कला मावशी आतून सगळ्यांसाठी आलं घातलेला वाफाळता गरमागरम चहा घेऊन आल्या ज्याची नितांत गरज होती. नीलिमा मावशी म्हणाल्या,

"कला ताई चहा खूपच सुंदर आहे आणि अगदी गरजेच्या वेळी आणलात. आभारी आहे."

"अहो आभार कसले मानता. हे तुमचंच घर आहे. इथे तुम्ही कधीही या तुमचं स्वागतच असेल."

सगळ्यांचे चहापाणी झाल्यावर काका म्हणाले,

"आता तुम्ही सगळ्यांनीच निवांत आराम करा त्यानंतर आपण गप्पागोष्टी करूया."

अभिराम ने समिधा, मावशी आणि सायलीला मास्टर बेडरूम मध्ये जायला सांगितलं. बाकी सगळे हॉलमध्येच थांबले. कुमारचे सहकारी जे अभिरामच्या परिचयाचे होते ते जायला निघाल्यावर साहेबांशी ओळख करून देत अभिराम म्हणाला,

"काका आज ह्यांच्यामुळेच माझी आणि समिधाची लग्नगाठ बांधली गेली.

त्यानंतर सगळे जण गेल्यावर अभिरामने काकाच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांना सकाळपासूनची अथपासूनची कथा सांगितली. काकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले,

"अभिराम आज तू जे वागलास त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. आता ज्या विश्वासाने ही मुलगी आपल्या घरात आली आहे तो आपण कायम जपायला हवा. जा आता तू पण थोडा वेळ आराम कर."

(समिधा आणि अभिराम ह्या दोन अनोळखी जीवनाच्या संसाराची सुरुवात कशी होईल पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all