Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २५

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २५


संध्याकाळी सर्वांचा आराम झाल्यावर अभिरामने सर्वांना आपलं घर दाखवलं. त्याचं घर म्हणजे अद्ययावत इंटेरियर असलेला सुंदर फ्लॅट होता. सुरुवातीला पॅसेज मध्ये खूप छान अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलात्मक फ्रेम्स लावल्या होत्या. हॉलमध्ये सोफासेट, चेअर्स सर्व उच्च अभिरुचीच्या होत्या. हॉलला जोडून जी गॅलरी होती त्यात विविध आकर्षक रोप लावली होती. एका वॉल ला वॉलपेपर आणि इतर ठिकाणी आकर्षक रंगसंगतीचा रंग दिला होता. मास्टर बेडरूम मध्ये मंद आकाशी रंग दिला होता. पलंगाच्या दोन्ही बाजूला छोटी चौकोनी आकाराची टेबल्स दोन्ही बाजूला आणि देखण्या नक्षीचे नाईट लॅम्प होते. बेडरूम प्रशस्त होती. तिथे अजून एक सोफासुद्धा ठेवला होता. दुसरी बेडरूम पण तशीच खूप सुंदर रीतीने सजवलेली होती. किचन पण हल्लीच्या मानाने खूपच मोठं होतं. समोरासमोर दोन किचन प्लॅटफॉर्म होते. एका बाजूला अद्ययावत ट्रॉलीज होत्या दुसऱ्या बाजूला सुंदर सन्मायका लावलेले युनिट्स होते. वॉशिंग मशीन आणि मोठ्या आकाराच्या फ्रीजसाठी समोरासमोर जागा होती. एकंदरीत घराचं सौंदर्य समिधाच्या मनात भरून राहिलं.

तिला आपलं वन रूम किचनचं सामानाची गर्दी असलेलं घर आठवलं. तिच्या मनात आलं कधी ना कधी आपण सुद्धा आई-बाबांसाठी असा सुंदर फ्लॅट घ्यायला हवा. त्यासाठी आपल्याला नोकरीत लवकर लवकर प्रमोशन्स घ्यावी लागतील. प्रमोशन साठी लागणारे योगदान पूर्ण मनाने द्यावे लागेल.

कला मावशी त्यांच्याकडे सकाळी सात ते रात्री सात अशा कामाला येऊन निघून जायच्या. पण काकानी त्यांना एक आठवडाभर राहण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे त्या तयार झाल्या होत्या. इतर कामासाठी दुसरी एक बाई होती. नवीन सुनबाई आली म्हणून कला मावशीने गोडाचा शिरा
आणि कुरकुरीत अळूवड्या स्वयंपाकाबरोबर केल्या होत्या. सर्वांचे जेवण झाल्यावर बाहेर सगळे बसले असताना समिधाच्या बाबांचा फोन आला,

"जावईबापू परवा आमच्या घरी लग्नानिमित्त सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे. तुम्ही आणि समिधा पूजेला बसणार आहात तर तुम्ही सर्वांनी सकाळी लवकरच या. गुरुजी सकाळी दहा वाजता येणार आहेत."

"बाबा आता तुम्ही मला फक्त अभिराम बोला जावईबापू म्हणू नका. आता मी तुमच्या मुलासारखाच आहे."

"मला नक्कीच म्हणायला आवडेल पण म्हटलं अगदीच सुरुवातीला नावानं कसं बोलवायचं."

त्यानंतर बाबा समिधाशी पण बोलले,

"समू तू गेलीस आणि घर खूप सुनं सुनं झालं गं. तू आता या घरात नाही ही कल्पनाच मला सहन होत नाही. तुझ्या बहिणी सुद्धा आपली ताई नाही म्हणून हिरमुसल्या आहेत. आईला तर काही सुचतच नाही. ती कावऱ्याबावऱ्या नजरेने येथे तिथे पाहते आहे. एक-दोन वेळा तिच्या तोंडून समू हे नाव निघालं. थांब तिच्याशी पण बोल जरा."

"बाबा मी बोलते आईशी पण तुम्ही आता मी नसण्याची सवय करून घ्या. तुम्ही आपली तब्येतीची काळजी घ्या आईला पण धीर देत जा. मुख्य म्हणजे कामाची दगदग कमी करा. माझ्या तीनही बहिणी खूप गुणी आहेत त्या आईला नक्कीच कामात मदत करतील. द्या आईला मी तिच्याशी बोलते."

सुषमाताईनी फोन हातात घेतल्यावर त्यांच्या तोंडून आधी हुंदका निघाला.

"आई तूच अशी रडू लागलीस तर मी नवीन घरी संसार कसा करणार. अग मी नसले तरी अजून तिघीजणी आहेत त्यांच्याकडे नीट लक्ष दे. अभ्यासात त्या हुशार आहेतच. तुम्ही सर्वांनी आता एकमेकांना सांभाळून राहायला हवं."

"हो ग सगळं कळतंय पण वळत नाही. तुम्ही आनंदाने संसार करा आणि परवा पूजेला याल तेव्हा आपण गप्पा मारू."

झोपायची वेळ झाल्यावर अभिराम हळुवारपणे म्हणाला,

"समिधा सकाळपासून तू खूपच दमली असशील. मानसिक ताणाने तुझ्यावर खूप ओझं जाणवत असेल. तू मावशी आणि सायली तुम्ही तिघी मास्टर बेडरूम मध्ये झोपा मी आणि काका दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपतो. शांत चित्ताने झोप आता कसलाही विचार करायचा नाही."

समिधाच्या मनात आलं हा आयुष्यभर आपल्याशी असाच समजूतदारपणे वागत राहिला तर आपण त्याची भक्ती करू लागू. तिच्या डोळ्यासमोर कृष्णाची मीरा आली. आपल्याला मीरा आणि राधा दोन्ही भूमिका वटवाव्या लागतील.

(दुसऱ्या दिवशी समिधाच्या आयुष्यात अजून काय खळबळ उडेल पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all