Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २६

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २६


रात्री खूप वेळ समिधा जागीच होती. उलट सुलट विचारांची तिच्या डोक्यात अलोट गर्दी झाली होती. उशिरा कधीतरी तिला झोप लागली ती मात्र एकदम गाढ झोप. सकाळी सोसायटीतील झाडावर पक्ष्यांच्या किलबिलाटाने तिचे डोळे उघडले. क्षणभर तिला आपण कुठे हवापालट करायला आलो आहोत की काय असे वाटले. तिच्या घरी ते सर्व दाटीवाटीने झोपत असत. कधी झोपेत एकमेकांचा पाय लागायचा आणि झोपमोड व्हायची. पण इथे मऊशार ऐसपैस बेडवर खूप छान झोप लागली. ती पूर्ण जागी झाल्यावर तिला कळलं की अरे आपण अभिरामच्या घरात नवी नवरी आहोत. सासूबाई नसल्या तरी सासरे बुवा आहेत. त्यांचं आपल्याबद्दल काय मत होईल. खरं तर आपल्याला रोज लवकर उठायची सवय आहे. तिने बाजूला पाहिलं तर सायली मस्त आरामात झोपली होती. तिच्या कपाळावर एक चुकार बट आली होती त्यामुळे ती खूप गोड दिसत होती. तिने समोर पाहिलं. मावशी उठून ध्यान धारणा करत होती. तिचं लक्ष गेल्यावर तिने आपुलकीने समिधाला विचारलं,

"झोप लागली का बाळा. आज तुझा चेहरा फ्रेश दिसतो आहे. जा तुझं आवरून घे मी जरा बाहेर काय चाललं आहे ते पाहते."

"हो मावशी लगेच आवरून येते बाहेर."

समिधा आवरायला गेली. बापरे इथलं बाथरूम आपल्या किचन एव्हढे आहे. सगळ्या अत्याधुनिक सुखसोयी आपल्यासाठी सज्ज आहेत. हे सर्व आपल्या दिमतीला आहे पण आपलं मन थाऱ्यावर नाही. एरव्ही हे मनोजचे घर असतं तर आपण हक्काने ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेतला असता.

आवरून ती हलकी सिल्कची वेलबुट्टी असलेली गुलबक्षी रंगाची साडी नेसून बाहेर आली. त्या साडीत तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. आता बाहेर सोफ्यावर काका, मावशी आणि अभिराम पण बसले होते. अभिरामने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून समिधा कडे पाहिले. त्याला ती गुलाबी परी भासली. इतक्यात कला मावशींनी सर्वांसाठी वाफाळता चहा आणि बिस्किटे आणली. सर्वांनी फक्त चहा घेतला.

काका उठले आणि पेपर आला आहे का बघायला बाहेर गेले. पहिल्याच ठळक बातमीवर लक्ष गेल्यावर त्यांचे डोळे विस्फारले गेले. अभिराम म्हणाला,

"काय काका एव्हढी काय बातमी पाहिली तुझे डोळे विस्फारले!"

"घे बघ तूच तुझ्या डोळ्यांनी पूर्ण बातमी वाच."

अभिरामने त्यांच्या हातून पेपर घेतला बातमीच तशी होती.

"मुलीचे लग्न ऐन मुहूर्ताच्या वेळी मोडले तरी तिच्या आई बाबांची मग्रुरी. अशा वेळी लग्नासाठी तयार असलेल्या तरुणाशी उद्धट वर्तन"

त्या खाली सविस्तर बातमी दिली होती. त्यात समिधा आणि तिच्या आई वडिलांची नावं आणि मयूर राणे हा विवाहास तयार असलेला तरुण असं म्हटलं होतं.

मयूर ने जाताना समिधाच्या आईला धमकी दिली होती "मावशी तू माझा अपमान केलास बघ आता तुमची कशी बदनामी करतो". त्याने त्याच्या पत्रकार मित्राला हाताशी धरून हे सर्व कारस्थान रचलं होते. अभिरामला वाटलं एखादी व्यक्ती स्वतःची पात्रता नसताना चांगल्या मुलीच्या आयुष्याची नासाडी करायला तयार होतो आणि त्याला विरोध केल्यावर इतक्या खालच्या थराला जातो म्हणजे कमालच आहे.

ही बातमी वाचून समिधा रडायला लागली. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आई बाबांचा केविलवाणा चेहरा उभा राहिला. कालच एवढा मानसिक ताण त्यांनी सहन केला आणि आज आता ही बेअब्रू. कसं सहन करतील ते. अभिरामच्या काकांना हा काय प्रकार काही माहितच नव्हता तरी त्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवून तिला धीर दिला.

"समिधा हा काय प्रकार मला माहीत नाही तरी आम्ही सर्व तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. हे बघ आता तू आमची सून नाही तर मुलगी आहेस. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. तू आधी तुझ्या घरी फोन करून त्यांना सांग आम्ही ह्या असल्या बदनामीला भीक घालत नाही."

अभिरामने पण त्याला दुजोरा दिला. समिधाने बाबांना फोन केला. बाबा फोनवर रडायलाच लागले.

"समू काय झालं गं हे. आता अजून किती दिवस हे दुष्टचक्र चालणार आहे. मला आता हे सगळं सहन होत नाही. आईला तर बातमी वाचून चक्कर आली."

"बाबा तुम्ही रडू नका ना. आम्ही उद्या येऊच सकाळी लवकर. तुम्ही दोघं काळजी घ्या." अभिरामने समिधाच्या हातातून फोन घेतला आणि बाबांना दिलासा देत म्हणाला,

"बाबा तुम्ही आधी शांत रहा. हे बघा तुम्ही म्हणत असाल तर आपण अब्रु नुकसानीचा दावा करू शकतो. हॉल मध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना नक्की काय झालंय ते माहीत आहे. मुख्य म्हणजे आम्ही अशा खोट्या बातम्यांना भीक घालत नाही. तुम्ही दुर्लक्ष करा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आईना पण सांगा."

(दुसऱ्या दिवशी समिधाच्या घरी पूजा आहे. त्या आधी सकाळी अभिराम आणि समिधाला अजून एक सरप्राइज मिळणार आहे. ते कोणतं पाहुया पुढील भागात)


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all