Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २७

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २७


समिधाने मनोमन देवाला विनवले,

"देवा अजून माझ्या आयुष्याची कीती फरफट करणार आहेस. आता तरी माझं जीवन सरळ मार्गावरून चालू दे. संकटाना मी घाबरत नाही पण हे असं माझ्यामुळे आईबाबांना मान खाली घालवी लागेल असं काही नको."

काका म्हणाले,

"लोकांना असं दुसऱ्याच्या आयुष्यात विष कालवून काय मिळतं काही कळत नाही."

दुपारची जेवणं आटोपल्यावर सायली आणि मावशी घरी गेल्या. थोड्या वेळाने कला मावशी काहीतरी आणायला खाली गेल्या. अभिराम आणि समिधाला मोकळेपणाने बोलता यावं म्हणून काका पण बाहेर निघाले. अभिराम म्हणाला,

"लवकर या काका परत. थंडीचे दिवस आहेत अंधार लवकर पडतो."

"माझ्या पायाखालचा रस्ता आहे. मी डोळे झाकून आलो तरी बरोबर आपल्या पत्त्यावरच येईन."

काकांच्या मनात होतं की नवीन सुनबाई घरात आली आहे आपण तिला काहीतरी द्यायला हवे म्हणून त्यांनी त्यांच्या नेहमीच्या सोनाराकडून एक नवीन फॅशनचा हार आणि त्याला मॅचिंग कानातले घेतले. समिधाला त्यांनी त्यांच्या आवडीच्या रंगाच्या म्हणजे जांभळ्या रंगाची पैठणी घेतली. अभिराम साठी मस्त क्रीम कलरची शेरवानी घेतली.

इथे घरात अभिराम आणि समिधा दोघेच होते. पहिल्यांदाच ते दोघेच समोरासमोर होते. आता बोलायचं तरी काय हा दोघांना प्रश्न पडला होता. त्यावर उपाय म्हणून अभिरामने गाणी लावली. सुरेल स्वरात गण सुरू झालं,

"अजनबी मुझको इतना बता "

दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते गालातल्या गालात हसले. समिधाच्या मनात आलं आता दोघच आहोत तर अभिरामला मनोजबद्दल सांगावं. तिने आधीच ठरवलं होतं की ज्याच्याशी लग्न ठरेल त्याला लग्नाआधीच सर्व सांगून टाकायचं. कुमारला तिला सांगायचं होतं पण जे काही तीन चार वेळा ते भेटले तेव्हा बोलणं असं काही झालंच नाही. हे लग्न तर अचानकच झालं. तरीसुद्धा समिधाला पहिल्या योग्य वेळी मनोज बद्दल सांगणं गरजेचे वाटत होते. नंतर तिच्या मनात आलं आईबाबांनी पूजा करण्याचं ठरवलं आहे तर त्यात विघ्न नको यायला. उद्या आपण नक्की सांगुया.

काका मुद्दामहून जरा उशीराच आले. आल्यावर त्यांनी दोघांना सोफ्यावर बसवले. आतमधून आरतीचे तबक आणले. येताना त्याचं देवघराकडे लक्ष गेलं. आज दिवेलागणीला समिधाने दिवा लावला होता तो पाहून ते मनातल्या मनात खुश झाले. दोघांना त्यांनी आणलेल्या भेटवस्तू दिल्या. समिधाला गहिवरून आलं. तिला वाटलं सासूबाई नाही त्यांची उणीव काका अजिबात जाणवू देत नाहीत.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकरच उठले. तिघांनी एकत्र चहा घेतला आणि समिधा म्हणाली,

"मी माझं आवरते." इतक्यात दारावरची बेल वाजली. इतक्या सकाळी कोण आलं असणार म्हणून आश्चर्याने समिधाने दार उघडलं. दारात साधारण काकांच्या वयाचे एक गृहस्थ उभे होते. त्यांनी समिधाकडे पाहिले आणि नकळत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. काकांचे त्यांच्याकडे लक्ष गेल्यावर ते पटकन उठून पुढे गेले आणि त्यांनी त्या गृहस्थाला दारातच मिठी मारली. दोघांचेही डोळे पाणावले. अभिराम पण पुढे गेला आणि त्याने पण त्यांना मिठी मारली. समिधाला ते कोण ते कळत नव्हतं तेव्हा अभिरामने समिधाला पुढे बोलावलं आणि म्हणाला,

"हे माझे बाबा. पालघरला राहतात."

दोघांनी त्यांना वाकून नमस्कार केला.

"सुखाने संसार करा बाळांनो. अभिराम यापुढे तरी तुझ्या आयुष्यात सुख आणि फक्त सुखच असू दे. काय रे अभी आणि तू दोघांपैकी कोणी मला कळवलं पण नाही अभिराम लग्न करतोय. ह्या पेपर मधली बातमी वाचून मी इथे आलो."

"बाबा वाईटातून चांगलं म्हणतात ते हेच तुम्हाला आमचं लग्न झालं हे तरी कळलं आणि खरं सांगू का सगळे इतके अचानक घडलं की मी या काकांना सुद्धा काहीच कळवलं नव्हतं. बरं लग्न झाल्यावर तुम्हाला कळवणार होतो पण आई आणि शशांक पुन्हा घर डोक्यावर घेतील म्हणून मी काही बोललोच नाही."

"अरे त्याची आता मला सवय झाली आहे. ते जाऊ दे त्या विषयावर कितीही बोललो तरी कमीच. सुनबाई तू आता माझ्या अभिच्या आयुष्याचे सोने कर. बरं तुम्ही दोघं बसा, हा माझ्या वतीने तुम्हा दोघांना लग्नाचा आहेर."

बाबांनी कितीतरी वस्तू दोघांसाठी आणल्या होत्या. त्यांच्याशी थोडं बोलणं झाल्यावर काका म्हणाले,

"अरे रवी आज समिधाकडे पूजा आहे. त्यांना निघायचं आहे. आता तुम्ही दोघं आवरून लगोलग निघा. मी आणि रवी नंतर येतो."

दोघे आवरून पूजेसाठी निघाले. अभिराम निघताना म्हणाला,

"गप्पांच्या नादात पूजेला यायचं विसरू नका. पूर्ण दिवस आणि रात्र तुमचीच आहे."

"हो म्हणजे काय आम्ही येणारच आहोत. आता ह्याची तिकडे ओळख करून द्यायची आहे ना!

(अभिरामच्या बाबांची ओळख करून देताना अभिरामच्या आयुष्यात काय घडलं आहे ते पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all