Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २९

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २९


लग्नापासूनच्या घडामोडी इतक्या जलद घडत होत्या की कुणी कधी त्याची कल्पनाही केली नव्हती. आता अभिरामचे बाबा रवींद्र गद्रे काय सांगतात याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले होते. ते खूप भावविवश झाले होते. अभिरामने त्यांना पाणी प्यायला दिलं.

"काय सांगू एक काळ असा होता की मला वाटायचं माझ्याएव्हढा सुखी माणूस जगात दुसरा कोणीही नसेल. माझीच मला दृष्ट लागली म्हणा ना! माझा आणि सुलेखा, माझी पत्नी आमचा प्रेमविवाह झाला होता. माझी आणि अनिलची लहानपणापासूनची मैत्री होती आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. सुलेखा माझ्या जीवनात तेव्हाच आली. आमची तिघांची कॉलेजमध्ये एकदम घट्ट मैत्री होती. आमच्या प्रेमाचा साक्षीदार अनिल. नंतर आमचे लग्न झालं. तेव्हाही अनिलचे आमच्या घरी येणंजाणें सुरूच होतं. तो आम्हाला आमच्यात तिसरा कधीच वाटला नाही. लग्नानंतर दोन वर्षांनी अभिचे आमच्या जीवनात आगमन झालं. आम्ही सुखाच्या अत्युच्च शिखरावर होतो. अभी दोन वर्षांचा झाला आणि सुलेखा वाडीत गेली असताना विषारी साप चावून तिचं निधन झालं. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. चिमुकल्या अभिचा काय दोष होता की देवाने त्याच्यावरील मातृछत्र काढून घेतलं. त्यावेळी अनिलने मला खूप आधार दिला. वाडीत कामाला येणाऱ्या बायकांपैकी एक बाई अभिला सांभाळायला घरी येऊ लागली. अभी तीन वर्षांचा झाल्यावर आमच्या ओळखीतल्या एका मुलीशी मी लग्न करावं असं आमच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. परंतु मी अभिला सावत्र आई आणायला तयार नव्हतो.

सगळ्यांनी मला खूप समजावलं. अनिल पण म्हणाला तू मुलीशी बोलून घे. ती अभिची नीट काळजी घेणारी वाटली तर तिच्याकडून कबूल करून घे की ती त्याचा नीट सांभाळ करेल. त्याप्रमाणे मी त्या मुलीला म्हणजेच मंजुषाला, माझ्या सध्याच्या पत्नीला भेटलो,

"हे बघ मंजुषा माझं सुलेखावर खूप प्रेम होतं. मी तिला कधीही विसरू शकणार नाही. मी केवळ अभिच्या भवितव्यासाठी तुझ्याशी लग्नाला तयार होतोय. तू त्याची नीट काळजी घेशील ना. त्याची अजिबात आबाळ करायची नाही."

"अहो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी अभिरामची नीट काळजी घेईन. इतकंच काय तर माझ्याकडून त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून पाहिजे तर आपण आपल्याला मूल होऊ द्यायचं नाही."

तिने इतकी खात्री दिल्यावर मी तिच्याशी लग्न केलं. पण कसलं काय. सुरुवातीचे तीन चार महिने तिने अभिला व्यवस्थित सांभाळलं आणि नंतर मी घरात नसताना ती मुद्दामहून त्याचे हाल करू लागली. मला घरी कामाला येणारे लोक आणि इतर बघणाऱ्यांनी तसं सांगितलं. मी मंजुला विचारल्यावर ती म्हणाली मी असं कसं करेन. मी आई आहे त्याची. दिवसेंदिवस ती त्याचा जास्त छळ करू लागली. तिने माझ्याशी संपत्ती साठी लग्न केलं होतं. मी तिला सांगितलं तुला अभिशी नीट वागायला जमत नसेल तर चालू पड. तिने मलाच धमकी दिली,

"तुम्ही काय मला जायला सांगता मीच तुम्ही माझा छळ करता असे सांगून तुम्हाला जेलची हवा खायला पाठवेन. आता तुम्हाला मी सांगेन तसंच वागायला लागेल. मी तुमच्या आणि माझ्या बाळाची आई होणार आहे."

"काय! म्हणजे तू माझी फसवणूक केलीस. लग्नाआधी गोड गोड बोलून माझी दिशाभूल केलीस."

"लग्ना आधी मला तसं बोलणं भागच होतं पण मी तुम्हाला वचन किंवा तसं काही लिहून दिलं नाही."

"अगं आता तू आई होणार आहेस तरी माझ्या अभिला छळतेस. किती उलट्या काळजाची आहेस. तुला आई तरी कसं म्हणायचं."

तिने माझ्या मागे तगादा लावला की अभिरामला कोणत्या तरी आश्रमात ठेवा नाहीतर मी त्याचा अधिक छळ करेन. मी त्याला कुठेतरी ठेवण्याचा विचार करत असताना अनिल माझ्या मदतीला धावून आला. मी मंजुषा काय म्हणते ते सांगायला अनिलला भेटायला गेलो.

"अनिल मंजुषाने कबूल केलं होतं की ती अभिचा नीट सांभाळ करेल पण आता तिने त्याचा खूप छळ सुरू केला आहे. मी तर तिला घराबाहेर काढणार होतो पण तिने माझी फसवणूक केली आहे. ती गरोदर आहे आणि म्हणते की तुम्ही अभिला एखाद्या आश्रमात ठेवा. मला काही सुचत नाही. तुझ्या माहितीत असा एखादा चांगला आश्रम असेल तर सांग."

"रवी तू काय वेडा बीडा आहेस की काय. अभिचा काका अजून जिवंत आहे. मी त्याला सांभाळायला खमक्या आहे. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. माझं घर एव्हढे मोठं आहे. मी एखादी वयस्कर मावशी त्याला सांभाळायला ठेवेन. खूप चांगल्या शाळेत घालेन. ऑफिसमधून आल्यावर त्याच्या बाललीलांमध्ये मध्ये मी रमून जाईन."

(अनिल अभिला सांभाळायला तयार झाल्यावर मंजुषा ने पुढे काय केलं पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all