Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३०

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३०


अनिलने अभिरामला सांभाळायची तयारी दर्शवल्यावर रवीने त्याला कडकडून मिठीच मारली.

"अनिल आपले गेल्या जन्मीचे काय ऋणानुबंध आहेत काय माहित पण तुझं माझं रक्ताचं नातं नसताना सुद्धा तू माझ्या पाठीमागे एखाद्या
पहाडाप्रमाणे उभा असतोस. खरंच आता मला अभिची काळजी नाही. अगदी सुरक्षित हातात मी त्याला सोपवणार आहे. हे बघ मी दर महिन्याला तुझ्या खात्यात एक ठरावीक रक्कम ट्रान्स्फर करत जाईन म्हणजे अभिला कशाचीच कमतरता भासायला नको."

"रवी तू पैशाची भाषा बोलून मला परका करू नकोस. अरे मी एकटा जीव सदाशिव. माझ्या मागे पुढे कोणीच नाही. देवाने मला भरपूर दिलं आहे. त्यातला थोडासा भाग माझ्या अभी साठी मी वापरेन. हो तू अधून मधून आम्हाला भेटायला येशील तेव्हा त्याच्यासाठी पोते भरून खाऊ, खेळणी घेऊन ये की. त्याला माझी ना नाही."

दोघेही आनंदाने हसायला लागले. त्यानंतर रवी घरी आला आणि त्याने अभिची व्यवस्था एका आश्रमात केली असे मंजुषाला सांगितले.

"चला एक ब्याद तर मिटली."

"एक ब्याद मिटली म्हणजे अजून कोणाला तुला मिटवायचे आहे. मला संपवण्याचा विचार तर नाही ना तुझा."

"अहो काहीतरीच काय बोलता. तुमच्यावर माझं प्रेम आहे. मला असं म्हणायचं आहे की आता आपल्याला बाळ होणार. त्याची पुढची व्यवस्था चांगली व्हायला हवी ना. मी काय म्हणते माझ्या नावावर तुम्ही काही करू नका पण बाळ झाल्यावर संपत्तीचा अर्धा हिस्सा तुम्ही त्याच्या नावावर करा. म्हणजे मला काही काळजी नाही."

"हो बाळ झाल्यावर पुढचे पुढे पाहू. मी दोन दिवसांनी सकाळी लवकर अभिला घेऊन जाईन मग तू आनंदाने इथे रहा."

"हो तुम्ही पण जाणार की काय. असं नका करु तुम्ही अभिला सोडून परत या."

"मी परत येणारच आहे. मी जीवापाड जपलेली, माझ्या बाबांची निशाणी असलेली ही वाडी मी तुझ्या हातात सोपवणार नाही."

एकंदरीत रवीला मंजुषाच्या मनात काय आहे ते कळून चुकलं. त्याने मनोमन निर्णय घेतला आपला इथला वकील मंजुषा आणि तिच्या घरच्यांना माहीत आहे. आता मुंबईला अनिलच्या ओळखीने चांगला वकील बघून आपल्या संपत्तीतील काही हिस्श्याची तरतूद अभिसाठी करून ठेवायला हवी.

रवीने अनिलला दोन दिवसांचा वेळ दिला होता. तो त्याप्रमाणे अभिला सांभाळण्यासाठी मावशी बाईंची व्यवस्था करणार होता. अनिल स्वतः एका नामांकित कंपनीत वरच्या हुद्द्यावर कार्यरत होता. त्यामुळे त्याला उत्तम पगार होता. तो समाजातील तळागाळातील लोकांना नेहमीच मदत करायचा. त्याचं त्याच्या गावातील एका मुलीवर प्रेम होतं परंतु तिच्या घरच्यांनी दबाव आणल्यामुळे तिने घरच्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं. अनिल खूप दुःखी झाला. त्यानंतर तो गावी कधीच गेला नाही. तसं पण त्याचे आई बाबा तो लहान असतानाच वारले. काकांकडे तो लहानाचा मोठा झाला. त्याचं जीवन हालअपेष्टा सहन करतच गेलं. गावी वाट बघणारं असं कोणीच नव्हतं.

अनिलने रवीला, अभिला सांभाळण्याची सर्व व्यवस्था झाल्याचं सांगितल्यावर रवीने निघायची तयारी केली. रवी बॅगेत काय काय भरतोय ह्याकडे मंजुषाचे पूर्ण लक्ष होतं. ते पाहून रवीला खूप राग आला. एक तर आपल्या कायदेशीर वारसाला हिच्यामुळे आपल्याला दूर ठेवावं लागतंय हया भावनेने तो खूप व्यथित झाला होता. तो तिला जोरातच बोलला,

"काय नेतोय ते बघण्याची गरज नाही. त्याचे कपडे आणि खेळणीच घेऊन जातोय. मला आश्चर्य वाटतंय तुझ्या उदरात एक चिमुकला जीव वाढतोय आणि तू इतकी दुष्टपणे कशी काय वागू शकतेस. एक लक्षात ठेव पेरावे तसेच उगवते. अभिला सवय होईपर्यंत पाच सहा दिवस मला तिथे रहावे लागेल."

इथे अनिलने अभिच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. त्याच्यासाठी नवीन पाळणा, खेळणी, कपडे. अगदी कशाचीच कमतरता नव्हती. एक बेडरूम अभिच्या नावे बहाल केली होती. त्याच्यासाठी नेमलेल्या मावशींशी रवीची ओळख करून देत अनिल म्हणाला,

"मावशी हे ह्या अभिरामचे बाबा आहेत. मी नसताना ते कधीही आले तरी त्यांच्यासाठी आपला दरवाजा कायम उघडा हवा."

ह्या मावशींना अनिल खूप चांगले पैसे देणार होता. शिवाय ह्या विनापाश होत्या त्यामुळे त्या अभिची चांगली काळजी घेतील ह्याची खात्री होती. सुरुवातीचे पाच सहा दिवस रवी आणि अनिलने दोघांनी मिळून अभिसाठी पोषक वातावरण निर्माण केले.

अशा रीतीने मला अभिला माझ्यापासून दूर करावे लागले."

सर्व सांगून झाल्यावर रवीचे म्हणजेच अभिच्या बाबांचे डोळे भरून आले. थोडा वेळ ते तसेच शांत बसले. अनिल रवीला थोपटत म्हणाला,

"चल आता आपण निघूया. अभी आणि समिधा मागाहून येतील. आपल्याला एक महत्वाचे काम करायचं आहे ना. चल चल पटकन जाऊ."

"अहो चहा तरी घेऊन जा."

"आम्ही बाहेरच घेऊ चहा. जरा महत्त्वाचे काम आहे."

(अभीचे बाबा आणि काका घाईघाईने निघून गेले. समिधाला अभिरामला मनोजबद्दल सांगण्याची संधी मिळते का पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all