दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३१
अभिरामच्या बाबांनी सांगितलेली कर्म कहाणी ऐकून समिधा आणि सगळेच थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. निःशब्द झाले. सर्वांचे डोळे पाणावले होते. सुषमा ताई म्हणाल्या,
"मला तर बाई नवलच वाटतंय की एखादी स्त्री ह्या थराला जाऊ शकते. स्त्री म्हणजे मूर्तिमंत ममता, कारूण्याचा सागर असेच आपण मानतो. आणि ही बाई, ते सुद्धा स्वतः आई होणार असताना एव्हढी क्रूर वागू शकते. विश्वासच बसत नाही."
"सुषमा आपण सामान्य माणसं. आपल्याला लहानपणापासून नीतिमत्तेचे धडे दिलेले असतात. पण जगात अशी पाताळयंत्री माणसं कमी नाहीत."
"चला जाऊदे तो विषय. जावईबापू तुम्हाला आईकडून न मिळालेलं प्रेम आता आमच्याकडून मिळेल. आता तुम्ही आमचा मुलगाच आहात."
"आई बाबा समिधाशी लग्न झालं तेव्हाच मी तुमचा मुलगा झालो. आता तुम्ही सुद्धा काहीही असलं तरी निःसंकोचपणे माझ्याशी बोलायचं."
"नातं नेहमी दोन्ही बाजूनी निभावलं गेलं पाहिजे तरच ते दिवसेंदिवस अधिकाधिक गहिरे होतं."
थोड्या वेळाने चहा घेऊन झाल्यावर अभिराम म्हणाला,
"आता आम्ही निघतो. संध्याकाळ आहे ट्रॅफिक लागेल. समिधा निघूया ना!" समिधा आणि आई बाबा, तिच्या बहिणी सगळेच भावनिक झाले. ते पाहून अभिराम म्हणाला,
"समिधा तुला इथे रहावेसे वाटतंय का? तसं असेल तर तू दोन दिवस रहा. नंतर ये."
"नाही जावईबापू ती राहायला नंतर येईल. आता ती तुमच्या बरोबर येईल."
"आई तुम्ही अभिराम म्हणायची सवय करा आता."
"हो हो नक्की करेन. जरा वेळ लागेल. समिधा थांब हळद कुंकू लावते."
दोघांनीही वाकून आई बाबांना नमस्कार केला. सगळेच त्यांना सोडायला खाली गाडीपर्यंत आले. समिधा शुभ्रधवल मर्सिडीज मध्ये अभिरामच्या बाजूला बसली. तिची ऐट पाहून आई बाबांना भरून आलं. सायली म्हणाली,
"जिजू तुमची गाडी खूप छान आणि मोठी आहे. आम्हाला पण कधीतरी फिरायला न्याल ना!"
"अरे सायली हा पण काही प्रश्न आहे का? आता ही गाडी तुमचीच आहे. तू फक्त कुठे जायचं सांग आपण लगेच जायचं."
त्यांना बाय करून दोघे निघाले. रस्त्यावर जरा वर्दळ कमी दिसली तेव्हा समिधा हळूच म्हणाली,
"गाडी थोडी साइडला घेता का?" अभिरामने घाबरून विचारलं,
"का गं तुला बरं वाटत नाही का?"
"नाही. मला बरं वाटतं आहे. पण मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे. जरा महत्त्वाचं आहे."
"हो पण मग इथे रस्त्यात कशाला, घरी जाऊन बोलूया ना."
"घरी बाबा आणि काका असतील, मावशी असतील. मला फक्त तुमच्या एकट्याशी बोलायचं आहे."
"अगं आपण पोहोचेपर्यंत दोघांचे जेवण झालं असेल आणि आपण दोघं गेल्यावर ते दोघे खाली जाऊन सोसायटीच्या बेंचवर गप्पा मारत बसतील. ते दोघे एकत्र असले की साऱ्या जगाचा त्यांना विसर पडतो. मावशी बाहेर टीव्ही बघत बसतील. त्या बरोबर त्या एखादी भाजी निवडायची असेल तर निवडत बसतील. चालेल ना तुला."
"हो ठीक आहे. कोणी नसेल तर मग काही हरकत नाही."
त्यामुळे दोघेही घरीच आले. अभिरामने म्हटल्याप्रमाणे बाबा आणि काकांचे जेवण झालं होतं. हे दोघे आल्यामुळे त्यांच्या गप्पांमध्ये खंड पडला.
"अरे व्वा तुम्ही दोघं आलात. अच्छा तुम्हाला जेवायचं असेल ना! तुम्ही दोघं शांतपणे जेवा. मी आणि रवी जरा खाली चक्कर मारून येतो." काका असं बोलल्यावर अभिरामने समिधा कडे पाहिलं आणि दोघेही हसले.
"काय रे पोरांनो तुम्ही हसता कशाला? मी फक्त तुम्ही शांतपणे जेवा म्हणालो."
"अरे काका म्हणून आम्ही हसत नाही. मी हिला रस्त्यातच तुम्ही दोघे आम्ही आल्यावर खाली गप्पा मारायला जाल असं म्हणालो होतो. कळलं!"
"ए रवी जरा त्यांना सांगून ठेव तू उद्या सकाळी निघणार आहेस ते. बाकी काही आताच बोलू नकोस."
"ए काका तुमचं दोघांचं काय चाललंय! बाकी न सांगण्यासारख आहे तरी काय?"
"ते उद्याच कळेल. सरप्राइज आहे. अर्थात तुम्हाला आवडणारं सरप्राइज आहे. जा आता पटकन हातपाय धुवून जेवायला बसा."
बाबा आणि काका खाली गेले. मावशींनी जेवण गरम करून दोघांना वाढलं. समिधा म्हणाली,
"मावशी तुम्ही पण बसा. जेवण इथेच डायनिंग टेबल वर ठेवा. काय लागेल ते आपण हाताने घेऊ."
"नको ताई मी नंतर बसते."
"मावशी आधीच उशीर झाला आहे. तुमचं ताट घ्या बघू." समिधाने त्यांना आग्रह केला.
समिधाच्या ह्या वागण्याने अभिरामचा तिच्याबद्दलचा आदर अधिक वाढला. पण आता समिधा आपल्याला काय सांगणार ह्याची त्याला उत्सुकता लागून राहिली होती. समिधाच्या मनात येत होतं आपण मनोजबद्दल सांगितल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल. ह्या दोलायमान अवस्थेत दोघांनी जेवण उरकलं.
(समिधा अभिरामला मनोज बद्दल सर्व काही सांगू शकेल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा