दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३२
जेवण झाल्यावर अभिरामने म्हटल्याप्रमाणे कला मावशी गवारीची भाजी निवडत टीव्ही वर सीरियल पाहत बसल्या. समिधा आणि अभिराम बेडरूम मधे गेले. समिधाच्या मनावर खूप दडपण होतं. एकदा तिला वाटलं की दुसऱ्याच एखाद्या विषयावर बोलून मनोजबद्दल सांगणं टाळावं. पण तिचं दुसरं मन म्हणालं हा अप्रामाणिकपणा आहे. त्याला आज नाहीतर उद्या सांगावच लागेल. त्याशिवाय काही पर्याय नाही. तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर तिने `रात गयी बात गयी` सारखं हा विषय पुसून टाकला असता.
समिधा स्वतःच्याच विचारात हरवलेली पाहून अभिराम म्हणाला,
"समिधा तुला एव्हढे काय सांगायचे आहे. तुला सांगायला अवघड वाटत असेल तर नको सांगूस. मला काहीही फरक पडणार नाही. आणि तुझी सांगायची इच्छा असेल तर मनमोकळे पणाने बोल."
"अभिराम आपलं लग्न खूप विचित्र परिस्थितीत अगदी एखाद्या चित्रपटात शोभेल अशा रीतीने झालं. तरीही मी माझ्या गत आयुष्याबद्दल तुम्हाला काही सांगणार आहे."
"अगं तुझ्या गत आयुष्याशी माझं काही देणं घेणं नाही. आता हा जो वर्तमान काळ आहे तो आणि येणारा भविष्यकाळ आपल्या दोघांचा आहे."
"तुमचं मन मोठं आहे तरी पण मी हे सांगणं हे माझं कर्तव्य आहे. मी कॉलेजमध्ये असताना माझ्यापेक्षा सिनिअर मुलाने, मनोजने माझ्याशी मैत्री करण्याकरता आमचा ग्रूप जॉइन केला. अभ्यासाव्यतिरिक्त मी कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा आणि इतर स्पर्धांमध्ये भाग घ्यायची त्यामुळे आमची ओळख झाली होती. नंतर खूप छान मैत्री झाली. मग मनोजने त्याचे प्रेम व्यक्त केलं. मलाही तो आवडत होताच. तो मला म्हणाला आपण आपल्या घरी संगुया. मी त्याला सांगितलं की माझ्या घरी मी नंतर सांगेन. आधी तुझ्या आई बाबांचं काय मत आहे ते बघुया. नंतर दोन तीन वेळा त्याने मला त्याच्या घरी नेलं आई बाबांशी ओळख करून दिली. त्यांच्या घरी मी आवडले. बोलता बोलता त्याच्या आईने मला जन्मपत्रिके बद्दल विचारलं. मी माझी जन्मतारीख आणि वेळ दिल्यावर त्यांनी माझी पत्रिका बनवून घेतली. माझ्या पत्रिकेत कडक मंगळ आहे म्हणून त्यांनी आमच्या प्रेमाला, लग्नाला नकार दिला. मनोज आणि त्याच्या बाबांनी त्यांना खूप समजावले. मनोजला त्यांनी भावनिक धमकी दिली. तू हिच्याशी लग्न केलेस तर मी जीवाचे बरं वाईट करून घेईन. तरीही मनोज म्हणाला की आपण लग्न करूया. मी त्याला स्पष्ट सांगितलं की आईच्या मर्जीविरुद्ध, त्यांना दुखावून लग्न नाही करायचं. अशा तऱ्हेने लग्न करून आपण सुखी होऊ शकत नाही. त्या नंतर आज दोन वर्ष झाली आमचे एकमेकांशी काहीही संबंध नाहीत."
हे सर्व बोलून झाल्यावर समिधा एकदम शांत बसली. अभिरामने तिला प्यायला पाणी दिलं.
"मला हे सर्व सांगायचंच होतं. आता तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. एक सांगते जर आपण वेगळे होणार असू तर हे फक्त तुमच्या माझ्यात ठेवा. माझ्या आई बाबांना कळू देऊ नका. त्यांना त्रास होईल. मी माझी ट्रान्स्फर दुसऱ्या ठिकाणी करून घेईन. म्हणजे मला सांगता येईल माझ्या ट्रान्स्फर मुळे मी दुसरीकडे राहते. नंतर मी आई बाबांना समजावून सांगेन. ही तडजोड तुम्हाला चालेल का?"
"समिधा खरं तर हे सगळं तू मला सांगितलं नसतं तरी चाललं असते. अगं तुझ्या गत आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टींवरून मी तुला चुकीचं मानणार नाही. तुझ्या चारित्र्यावर संशय घेणार नाही. मी इतका कोत्या मनोवृत्तीचा नाही आणि प्रेमाचं बोलशील तर ती एक खूप श्रेष्ठ भावना आहे. तो मनोज त्यावेळी खूप नशीबवान होता ज्याला काही काळासाठी तुझं प्रेम मिळालं. आता मात्र तो कमनशिबी असेल की तुझ्यासारख्या एका प्रामाणिक आणि सर्वांचा इतका विचार करणाऱ्या मुलीच्या प्रेमापासून तो वंचित राहिला. तू जसा तुझ्या आई बाबांचा विचार करतेस तसाच विचार तू त्याच्या आई बाबांचा केलास. दुसरी एखादी मुलगी असती तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे ती त्याच्याशी लग्न करून मोकळी झाली असती. किंबहुना मी तर असं म्हणेन तिने त्याच्यामागे लग्न करण्यासाठी तगादा लावला असता."
"खरंच मला वेळोवेळी जाणवतं तुमचं मन खूप मोठं आहे. अभिराम तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार केला असलात तरी ज्या तऱ्हेने आपलं लग्न झालं आहे, मला थोडा वेळ हवा आहे ह्या सर्वाचा स्वीकार करायला."
"अगं तुला हवा तेव्हढा वेळ घे. तुला कधी माहेरी जावं असं वाटलं तर बिनधास्त जा. फक्त फोन करून सांगत जा. अजिबात काळजी करू नकोस. मुख्य म्हणजे मनावर कसलेही दडपण नको. अगं हो उद्या बाबा जाणार आहेत. ते दोघं आपल्याला काहीतरी सरप्राइज देणार आहेत."
"ते दोघं अजून घरी आले नाहीत वाटतं."
"ते एकदा गप्पा मारायला बसले की त्यांना वेळेचे भान नसतं. तू झोप आता."
(बाबा आणि काका काय सरप्राइज देणार ते पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा