दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३३
अभिरामने समिधाला समजून घेतलं ह्या जाणिवेने ती भारावून गेली. खरंच इकडे बाबा, काका आणि अभिराम सगळेच तिला खूप समजून घेतात. आता अभिराम तिला तू झोप म्हणाला खरा. एकाच बेडवर कसं झोपणार. ती त्याला म्हणाली,
"तुम्ही इथे बेडवर झोपा मी सोफ्यावर झोपते."
अभिरामने विचार केला घरी तर समिधा दाटीवाटीने झोपत असते. इथे तरी तिला आरामात झोपायला मिळायला हवं म्हणून तो तिला म्हणाला,
"तू बेडवर झोप मी इथे सोफ्यावर झोपतो काही हरकत नाही."
हो ना करताना समिधा बेडवर झोपली. इतक्या मऊशार बेडवर झोपायची, एकंदरीतच इतक्या ऐषोरामाची तिला सवय नव्हती. ती विचार करू लागली घरी सगळे झोपले असतील. ते सगळे एक माणूस कमी झाला तरी दाटीवाटीने झोपले असतील. दिवसभराच्या श्रमाने झोप चांगली लागते. सगळ्यांनाच लवकर उठावं लागतं. अशा विचारांच्या तंद्रीत तिला खूप गाढ झोप लागली. सकाळी नेहमीप्रमाणेच लवकर जाग आली. अभीराम शांतपणे सोफ्यावर झोपला होता. स्वतःचं आवरून समिधा बाहेर आली. हॉलमध्ये वर्तमानपत्र चाळता चाळता बाबा आणि काकांच्या गप्पा सुरू होत्या. तिला खूप आश्चर्य वाटायचं हे दोघे इतक्या काय गप्पा मारत असतील. अगदी दोन मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्या की कशा गप्पा मारतात अगदी तसेच हे दोघे बोलत असतात. अर्थात ते अगदी जिगरी दोस्त होते. तिला बघून बाबा म्हणाले,
"अगं तुझी सुट्टी चालू आहे ना मग इतक्या लवकर कशाला उठलीस. तुम्हा बायकांना आरामाची पण अलर्जी असते. मस्त आरामात उठायचं."
"मला रोजच लवकर उठायची सवय आहे बाबा."
"बरं समिधा आज आता जेवण झालं की मी निघेन म्हणतो. तिकडे नाही तर मंजुषा आणि शशांक च्या काही कारवाया सुरू होतील."
"बाबा अजून दोन-चार दिवस रहा ना! आपल्याला गप्पा मारायला वेळ मिळेल आणि तुम्ही आहात तर काका पण किती खुश आहेत."
"पुढल्या वेळी आलो की चांगला एक आठवडा राहीन. नंतर कंटाळू नकोस. म्हणशील हे जाणार तरी कधी!"
"काय हो बाबा! मला माणसांची आवड आहे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायला पण मला खूप आवडतं."
"आता तू नवी नवरी आहेस. सध्या आयते खा. पुढल्या वेळी माझी फर्माईश नक्की सांगेन."
इतक्यात अभिराम पण आवरून बाहेर आला आणि यांच्या गप्पांमध्ये सामील झाला.
"काय रे अनिल यांना आता सरप्राईज द्यायचं का?"
"अरे म्हणजे काय आता काय मुहूर्ताची वाट बघतोस काय!"
"कालपासून तुमचं दोघांचं सरप्राईज सरप्राईज चाललं आहे. एकदा कळू तरी द्या आम्हाला अजून तुम्ही काय देणार आहात ते."
"बाबांनी उठून त्यांच्या बॅगेतून एक एन्व्हलप काढून अभीरामच्या हातात दिलं. बघ उघडून आवडतंय का!"
"त्याच्यात अभिराम आणि समिधासाठी काश्मीर टूर्सचे बुकिंग होतं. एअर टिकिट्स आणि इतर कागदपत्र!"
"अहो बाबा आता कुठे आम्ही जाणार. मी तर ऑफिसमध्ये काय बोललो पण नाही. कामं
खोळंबली असतील."
खोळंबली असतील."
"समिधा तुझी अजून सुट्टी आहे ना!"
"हो माझी अजून दहा दिवस सुट्टी आहे."
"झालं तर मग आणि अभिराम तू काय बोलूच नकोस. हा डिसेंबर महिना चालू आहे. सध्या तुझ्याकडे कामाचं जास्त प्रेशर नाहीये. मी दिनेश आणि सारंगला सर्व सांगून ठेवलं आहे. ते सर्व नीट सांभाळतील आणि विसरू नकोस मी पण मदतीला आहे. उद्या सकाळी अकरा वाजताच फ्लाईट आहे. तेव्हा दोघांनी आता पटापट ब्रेकफास्ट झाल्यावर आपल्या बॅगा भरा आणि तयार राहा. बॅग भरो निकल पडो." समिधा पटकन म्हणाली,
"बाबा आम्ही नंतर कधीतरी जाऊ ना आता कशाला!"
"ए बाई हे लग्नानंतर जायचं असतं त्यालाच हनिमून म्हणतात कळलं. मला एक सांग तू कुठे कुठे बाहेर फिरून आली आहेस."
"छे आम्ही इथे जवळपासच देव दर्शनाला वगैरे जाऊन आलो आहे. फिरायला अशी मी कुठे गेलेच नाही. काश्मीर तर खूप लांबची गोष्ट. काश्मीरचे निसर्ग सौंदर्य फक्त चित्रपटातच पाहिलं आहे."
"मग झालं तर. हा पृथ्वीवरील स्वर्ग बघून ये आणि चित्रपटात पाहिलेल्या काश्मीरचा प्रत्यक्ष अनुभव घे. तिथे काय गाणी गायची असतील तर गाऊन घे. ह्याला शूटिंग करायला सांग. तू काही हिरोईन पेक्षा कमी नाहीस."
समिधाच्या डोळ्यांसमोर खरोखर ती एखाद्या नायिकेप्रमाणे गाणं गात निसर्गाच्या सान्निध्यात फिरते आहे असं चित्र उभं राहिलं. ती मनातल्या मनात हसली. खरंतर समीधाला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. अजून अभीरामशी आपली नीट ओळख पण झाली नाही. आणि त्याच्याबरोबर काश्मीर सारख्या रम्य ठिकाणी फिरायला जायचं. हरकत नाही त्यानिमित्ताने आपल्याला काश्मीर तरी पाहायला मिळेल. आपण एक ट्रिप म्हणून हा अनुभव घेऊया. अभिरामला जाणून घेण्याची ही एक संधी असे समजू.
अभिरामच्या मनात विचार चालले होते समीधाने आपल्याकडे काही वेळ मागितला होता. आता तिच्याबरोबर काश्मीरला जायचं. पण काय हरकत आहे या निमित्ताने तिला रम्य काश्मिरची सहल तरी करायला मिळेल. आपल्याला जमेल तितका आनंद तिला द्यायचा प्रयत्न करायचा. समिधा मनाने अगदी काचेसारखी स्वच्छ आहे.
(काश्मिरच्या नयनरम्य वातावरणात दोघे एकमेकांना जास्त जाणून घेतील का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा