Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३४

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३४


बाबांनी सांगितल्या प्रमाणे समिधा आणि अभिराम बेडरूम मध्ये त्यांच्या बॅग्स भरायला गेले. समिधाच्या दोन्ही बॅग्स खूप मोठ्या होत्या. तिला कळत नव्हतं की एव्हढी मोठी बॅग ट्रिप साठी कशी न्यायची. ती बॅग कडे बघत बसलेली पाहून अभिरामला हसू आलं. ते समिधाने पहिलं,

"काय झालं तुम्ही का हसताय?"

"अगं तू एव्हढी मोठी बॅग घेऊन आलीस तर काश्मीर वाल्यांना वाटेल की तू तिकडे स्थलांतर करते की काय! अगं आपल्याकडे वेगवेगळ्या साइज च्या बॅग्स आहेत. मी तुला दाखवतो त्यातली कोणतीही एक तू घे."

अभिरामच्या विनोदावर समिधाला पण हसू आले. तिला आश्चर्य वाटलं की घरात दोनच माणसं तरी इतक्या बॅग्स कशासाठी."

"तुम्ही आणि काका दोघेच आहात तरी इतक्या बॅग्स!"

"अगं म्हणजे काय आम्ही भ्रमंती करत असतो. किती दिवसांसाठी जाणार त्यावर कोणती बॅग घ्यायची ते ठरवतो."

"तुम्ही खूप फिरला असाल ना! आवड आणि पैसे असले की सगळं शक्य होतं."

"हो खरं आहे. मी आणि काका आपल्या देशात, परदेशात खूप फिरलो आहोत. बाबांना जमलं तर ते पण येतात आमच्या बरोबर. आम्ही दोन वर्षाने एक मोठी टूर करतो आणि प्रत्येक वर्षी एखादी तीन चार दिवसांची अशी ट्रिप करतो."

"फिरल्यावर आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळतात, जिथे जातो तिथली संस्कृती, रूढी परंपरा कळतात. एकंदरीत बरीच माहिती मिळते."

"खरं आहे तुझं. तुला फिरण्याची आवड असेल तर आपण पण जात जाऊ वेगवेगळ्या ठिकाणी."

"हो मला नक्कीच आवडेल." तिच्या बोलण्यातील लहान मुलांसारखा उत्साह अभिरामला आवडला.
तो तिला म्हणाला,

"फिरायला जायचं तर साड्या बरोबर घेऊ नकोस. पंजाबी ड्रेस घे. ते तुला सोयीस्कर होईल. गरजेच्या सगळ्या वस्तू बरोबर घे. एकदा दोन तीन वेळा तू ट्रीपला जाऊन आलीस की एकदम अनुभवी होऊन जाशील."

"बाबांनी आपली कोणत्या ट्रेनची तिकीट काढली आहेत? दिवसाचा प्रवास चांगला वाटतो की रात्रीचा."

"अगं बाबा मघाशी बोलले तू ऐकलं नाही का! आपलं सकाळी अकरा वाजताचे फ्लाईट आहे."

"बापरे विमानाने जायचं. खूप महाग असता न टिकिट. गेलो असतो आपण ट्रेनने. ट्रेन प्रवासाचा अनुभव पण मिळाला असता."

"ट्रेन प्रवास करायचा तर छान राजधानी एक्स्प्रेसने करायला हवा. पुढल्या वेळी ट्रेनने जाऊ."

"तसेही विमानाने एकदा तरी प्रवास करायचा हे माझं लहानपणापासूनचे स्वप्न होतं. आता ते पूर्ण होईल."

हे बोलून समिधा एकदम गप्प बसली. अभिरामने विचारलं,

"अगं स्वप्न पूर्ण होणार आनंदाची गोष्ट आहे ना. मग गप्प का झालीस?"

"तुमच्याशी लग्न झालं म्हणून माझं स्वप्न पूर्ण होईल पण आई बाबा, माझ्या लाडक्या बहिणी यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. पुढे कधीतरी त्यांना घेऊन जाईन."

"अगं त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्या एकटीची नाही. आपण करूया. पुढच्या वेळी घेऊन जाऊ त्यांना."

"उगाच बोलले मी. तुम्ही तर सगळ्याच जबाबदाऱ्या घ्यायला तयार आहात."

"अगं मला कोणी नातेवाईक नाहीत. मी आणि काका आणि अधूनमधून बाबा. उलट तुझ्यामुळे मला आई, बाबा आणि बहिणी मिळाल्या. त्यांच्या मुळे माझ्या जीवनात येणारा आनंद खर्चापेक्षा खूप मोठा आहे गं."

अभिरामने तिला सोयीस्कर अशी एक बॅग काढून दिली. दोघांच्या बॅग्स भरल्यावर दोघे बाहेर आले. बाबा पण त्यांची तयारी करत होते. त्यांना बघून बाबा म्हणाले,

"समिधा, अभी तुमच्या सहवासामध्ये हे चार पाच दिवस खूपच छान गेले. खरंच अनिलशी पण खूप गप्पा मारल्या. खरं तर इथून जाऊच नये असे वाटतंय."

"बाबा तुम्हाला एक सुचवू का? तुम्ही आता कायमचे इथेच राहायला या ना. नाहीतरी तिथे आई आणि शशांक तुमच्याशी नीट वागत नाहीत."

"अरे अभी नाही. ते दोघं त्याचीच वाट पाहतात. त्यांना आपली सारी संपत्ती घशात घालायची आहे. ते मी जिवंत असेपर्यंत होऊ देणार नाही. तरी बरं मी संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या नकळत अनिलच्या ओळखीच्या वकिलाकरवी तुझ्या नावावर आधीच करून ठेवला आहे."

"बाबा आम्हला तुमचा सहवास हवा आहे. संपत्ती काय करायची आहे."

"कळतंय रे मला. बघू पुढे मागे कधीतरी राहू आपण सगळे एकत्र."

"बरं समिधा उद्या लवकरच निघा. ट्रॅफिक लागेल सकाळची वेळ आहे."

"हो बाबा तुम्ही पण सांभाळून रहा आणि काळजी घ्या स्वतःची."

दोघांनी बाबांना वाकून नमस्कार केला. बाबांनी आशीर्वाद दिला. त्यांचे डोळे पाणावले.

(अभिराम आणि समिधा उद्या काश्मीरला जायला निघणार आहेत. बघूया पुढील भागात)


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all