दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३६
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३६
चेक इन झाल्यावर दोघं बोर्डिंग गेटवर येऊन बसले. त्यांनी कला मावशीने दिलेले ठेपले खाल्ले. ठेपले खूपच चविष्ट होते.
"बर आता तू कॉफी पिणार की चहा घेणार?"
"मला आपला श्रमपरिहार करणारा चहाच आवडतो. कॉफी म्हणजे मस्ती मजा. चहा खूप जवळचा वाटतो."
अभिराम चहा घेऊन आला. चहाच्या किमतीच्या मानाने चहाला काही चवच नव्हती. समिधा म्हणाली,
"टपरीवर मिळणारा चहा किती स्वस्त आणि मस्त असतो. आलं घातलेला गरम वाफाळता चहा पिण्यात खूपच मजा असते."
"हो ना इथे सगळा दिखावा असतो."
अभिरामनी समिधासाठी मुद्दाम विंडो सीट बुक केली होती आणि नशिबाने तिथे विमानाचा पंख येत नव्हता. नाहीतर विंडो सीट मिळून सुद्धा विमानाचा पंख दिसत राहतो.
"तुला विमान उडताना भीती नाही वाटणार ना."
"नाही नाही मला आकाश पाळण्यामध्ये बसायला खूप आवडतं त्यामुळे इथे भीती नाही वाटणार."
"ते बरं झालं नाहीतर काही जणांना खूपच भीती वाटते."
विमानाने टेकऑफ घेतलं आणि समिधा खिडकीतून दिसणारी मुंबापुरी आपल्या डोळ्यात सामावून घेत होती. नंतर विमान ढगातून प्रवास करू लागलं तेव्हा तिला खूप हलकं वाटू लागलं. श्रीनगर एअरपोर्टला विमान पोचल्यावर आपले सामान घेऊन दोघेही एअरपोर्टच्या बाहेर आले.
टॅक्सीत बसल्यावर अभिरामने सेंटॉर हॉटेलचे नाव घेतल्यावर समिधाची भुवई उंचावली गेली. बाबांनी दाल सरोवराच्या बाजूचे फाईव्ह स्टार हॉटेल सेंटॉर बुक केलं होतं. तिथे प्रवेश केल्यावर समिधाला वाटलं आपण एखाद्या आलिशान राजवाड्यात आलो आहेत की काय. त्यांचा सूट खूपच भारी होता. बसल्यावर एक फूट आत जाणारा बेड, सर्व शुभ्रधवल फर्निचर, भिंतीवर असणारी शोभिवंत चित्र सारं काही तिला मोहून टाकणारं होतं. नंतर ती तोंड धुवायला म्हणून बाथरूम मध्ये गेली तर तिकडे तर काय वेगळीच ऐट बाथ टब, उंची शाम्पू, बाथ जेल. खूपच ऐश होती.
बाहेर येऊन खिडकीचा पडदा सारून तिने बाहेर नजर टाकली. अहाहा! निसर्गाचे विलोभनीय रूप पाहून तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. हिमाच्छादित पर्वत शिखरे पाहून धरतीने शुभ्र धवल वस्त्रे परिधान केल्याचा तिला भास झाला. खिडकीतून तिला दाल सरोवर दिसत होते. ओळीत उभ्या असलेल्या शोभिवंत हाऊसबोटी पाहून तिने एका कादंबरीत वाचलेलं वर्णन आठवलं. हाऊसबोट म्हणजे छोटेखानी राजवाडा असतो. लहान जागेत साऱ्या पंचतारांकित सुविधा तिथे उपलब्ध असतात. तिथे अंथरलेली रेशमी कार्पेट म्हणजे उंची अभिरुचीचे दर्शन. प्रत्येक हाऊसबोटीला दिलेली नावं पण खूप भारी असतात. तिची नजर हॉटेलच्या प्रांगणातील खूपच सुंदर अशा गुलाबांकडे गेली. ती पाहताना तिला आपली नजरच गुलाबी झाल्याचा भास झाला. समिधा बाहेरचा निसर्ग पाहण्यात रमली असताना अभिराम पण तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. ती म्हणाली,
"हा असा निसर्ग बघून कळतं काश्मीरला भारताचे नंदनवन का म्हणतात. ह्या नंदनवनाचे नाव अतिरेक्यांनी खराब केलं. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली."
"निसर्ग पाहून आपल्या डोळ्यांची क्षुधा शांत होईल. माझ्या पोटात आता कावळे ओरडायला लागलेत. खाली जाऊन जेवून येऊया."
दोघांचे आवरून झाल्यावर दोघं खाली डायनिंग हॉल मध्ये जेवायला आले. तेथील विविध प्रकारची पेये, खाण्याच्या पदार्थांची रेलचेल पाहून समिधा भांबावून गेली. तिने म्हटलं,
"बापरे इतकं सगळं एक वेळच्या जेवणासाठी. काय खावं काय नाही काही कळतच नाही. आता तुम्हीच मला कोणते पदार्थ खावे यासाठी मदत करा."
"अगं तुला जे नावीन्यपूर्ण वाटतात ते थोडे थोडे घेऊन बघ."
जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेतल्यावर अभिराम म्हणाला,
"आज आपल्याला लांब कुठे फिरायला जाता येणार नाही. आज आपण मस्त शिकाऱ्यात बसून जलविहार करूया."
"अय्या शिकाऱ्यात. मला आवडेल."
अभिरामला तिच्या बालिशपणाची मजा वाटली. एरव्ही ती खूप समजून उमजून गंभीर वागते. पण हे असं आपसुक प्रतिक्रिया येते तेव्हा ती बालिश वाटते.
संध्याकाळी ते दोघे शिकाऱ्याजवळ जातात ना जातात तोच सर्व शिकारेवाले त्यांच्या जवळ येऊन त्यांचा शिकारा कसा उत्तम आहे याची तोंड दुखेस्तोवर स्तुती करू लागले. अभिरामनी समिधाला विचारलं,
"तू सांग कोणत्या शिकाऱ्यात बसायचं?"
समिधाने सर्व शिकाऱ्यांकडे नजर टाकली. एका शिकाऱ्याच नाव होतं "किस्मत की डोर". तिला तो शिकारा आवडला. त्याचं नाव सध्याच्या तिच्या आयुष्याशी साधर्म्य दाखवणारे वाटले. आज किस्मत की डोर मुळेच ते एकत्र आले होते. दोघे त्या शिकाऱ्यात बसले. शिकार्याची सजावट खरच खूप कलात्मक होती. शिकारावाला त्यांना म्हणाला,
"शाब, मेमशाब आरामसे बैठो. आपको जन्नत की सैर कराता हुं."
शिकारा सुरू झाल्यावर समिधा सगळ्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेत होती. ते पाहून अभिरामला समाधान वाटत होतं. समिधाचे आभाळाकडे लक्ष गेलं. तिला कश्मीर की कली मधील गाणं आठवलं,
"दिवाना हुआ बादल, सावन की घटा छाई"
दाल सरोवरामध्ये मस्त सैर झाल्यावर सुद्धा समिधाला वाटत होतं ही सैर संपूच नये. एकंदरीत ती खुश होती म्हणून अभिराम पण खुश होता. समिधाने त्याला विचारलं,
"आपण बर्फात कधी जायचं?"
"ते तर मुख्य आकर्षण काश्मीर सहलीचं. आपण उद्याच जातोय गुलमर्गला बर्फात फिरण्यासाठी."
(काश्मीर सहल दोघांसाठी रोमहर्षक ठरेल की काही कटू प्रसंगाची आठवण पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा