Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३७

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३७


आज बर्फात जायचं म्हणून समिधा खूप उत्सुक होती. ती सकाळी लवकरच उठून तयार झाली होती. अभिराम तयार झाल्यावर तिला म्हणाला,

"ह्या पंजाबी ड्रेस मध्ये तुला बर्फात जाता येणार नाही. तुला तिथे आपण भाड्याने ड्रेस मिळतो तो घेऊ. माझ्या पण लक्षात आलं नाही. तुला कमीत कमी शूज तरी घ्यायला हवे होते. आता ह्या वेळी पूर्ण ड्रेस भाड्याने घेऊ. पुढच्या वेळी तयारीनिशी येऊ."

दोघांनी खाली येऊन ब्रेकफास्ट केला. त्यात सुद्धा असलेले वैविध्य पाहून समिधा हरखून गेली. इतक्यात त्यांची ठरवलेली टॅक्सी आली आणि दोघे निघाले. समिधाने भाड्याचा ड्रेस परिधान केला. अभिराम तिला सावध करत म्हणाला,

"शूज मध्ये बर्फ जाणार नाही ह्याची काळजी घे. नाहीतर पायातून थंडी जाईल."

समिधाला कधी एकदा बर्फात जातो असं झालं होतं. अथांग दूरवर पसरलेला शुभ्र बर्फाचा गालिचा पाहून ती खुश होऊन पळू लागली. दोन्ही हातांनी बर्फ उधळू लागली. तिच्या या हालचाली पाहून अभिराम मनातल्या मनात मोहरुन गेला. समिधाने त्याच्या कडे वेळ मागितला होता नाहीतर त्यानेही तिला साथ दिली असती. कोई बात नहीं आज नहीं तो कल सही. समिधाला वाटत होते की अभिरामने तिचे फोटो काढावेत. पण सांगणार तरी कसं. अभिराम तिच्याही नकळत तिच्या मनमोहक अदा कॅमेऱ्यात बंदिस्त करत होता. भरपूर खेळून झाल्यावर अगदी निघताना समिधाच्या शूजमध्ये बर्फ गेलाच. ती वेदनेने विव्हळू लागली. थंडीने गारठली.अभिरामने तत्परतेने तिचे शूज आणि सॉक्स काढले. बर्फ पटकन काढून टाकला आणि त्याने बरोबर आणलेल्या तेलाने त्याने तिच्या तळपायाला मालिश केलं. त्यामुळे तिला बरं वाटलं. त्या अल्प काळात पण तिला गारठल्यासारखे झाले. अभिरामच्या समयसुचकतेचे तिला कौतुक वाटलं.

बर्फात खेळण्याचं मुख्य आकर्षण आटोपल्यावर त्यांनी काश्मीर मधील इतर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. शालिमार गार्डन, चष्मेशाही उद्यान वगैरे. हे सर्व पाहून झाल्यावर अभिराम म्हणाला,

"आपण उद्या खरेदी करूया. इथल्या सिल्कच्या साड्या, शाली खूप प्रसिद्ध आहेत. सगळ्यात शेवटी आपण पुन्हा दाल सरोवरामधील चार चिनारला भेट देऊ."

"हो चालेल. पण आता खरेदी कशाला. आधीच इतका खर्च झाला आहे."

"बाहेर आल्यावर खर्चकडे बघायचं नाही. आपण अगदी लगेच इथे पुन्हा येणार नाही ना. आणि हो अगदी सगळ्यांसाठी खरेदी करायची आहे. नको नको म्हणू नकोस."

समिधाच्या लक्षात आलं की त्याला आपल्या माहेरच्या सर्वांसाठी खरेदी करायची आहे. ती खूप भावनिक झाली.

दुसऱ्या दिवशी ते एका मोठ्या सरकारी नोंदणीकृत शोरुम मध्ये आले. तिथे दर्शनी भागात लावलेल्या साड्या पाहूनच समिधा वेडी झाली. तिचे डोळे भिरभिरत होते. अभिराम तिला म्हणाला,

"तुझ्यासाठी चांगल्या दोन तीन साड्या घे आणि आई आणि कला मावशीला पण तुझ्या पसंतीने एकेक साडी घे. बाबा आणि काकांसाठी मी स्वेटर पसंत करतो. तुझ्या लाडक्या बहिणीना तुला जे जे घ्यावेसे वाटेल ते घे."

"सर्वांची खरेदी अगदी नावानिशी सांगितली आणि तुम्ही स्वतःसाठी काहीच घेणार नाही का!"

"अगं माझ्याकडे नवीनच दोन जॅकेट्स आहेत. मुंबईत कुठे असते थंडी. तुला इतकंच वाटत असेल तर तुझ्या पसंतीचे काहीही घे."

अभिरामने तिला नवीन संकटात टाकलं. आता ह्याची आवड निवड आपल्याला काय माहित. चला बघूया आता. समिधाने एकूण तीन साड्या सिलेक्ट केल्या.

"हे काय तुझ्यासाठी कमीत कमी दोन साड्या घे आणि ते बघ नवीन काश्मिरी डिझाईनचे पंजाबी ड्रेस आहेत त्यातला एक सिलेक्ट कर."

सर्वांसाठी तिने काही न काही तरी घेतले. तिची नजर एका सुरेख मफलरवर गेली. तो खूपच उंची लोकरीपासून विणलेला होता. तो घेऊन तिने अभिरामाच्या हातात दिला. अभिरामला पण तो खूपच आवडला. नंतर जेवणासाठी ते काश्मिरी धाब्यावर गेले. काश्मिरी जेवण खूपच चविष्ट होते.

निघायच्या आदल्या दिवशी ते शिकाऱ्यात बसून चार चिनार बघायला गेले. शिकाऱ्यातून उतरल्यावर अभिराम तिला म्हणाला,

"हे एक बेट आहे. ह्याचं नाव चार चिनार आहे कारण चार सुंदर आणि विशाल चिनार वृक्षांनी वेढलेले आहे. चिनार हा मोठा पानझडी वृक्ष आहे. ह्याची पाने शरद ऋतूत सुंदर लाल आणि केशरी रंगाची होतात."

समिधा त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत सभोवताली आश्चर्याने बघत चालली होती. इतक्यात तिची नजर समोर गेली आणि तिची चालण्याची गती मंदावली आणि चेहऱ्याचे हावभाव बदलले.

(समिधाने समोर काय पहिलं आणि तिची चालण्याची गती का बरं मंदावली पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all