दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३८
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३८
चार चिनार परिसरात समिधा सारं काही डोळ्यात साठवत चालत होती इतक्यात तिचं लक्ष समोरून येणाऱ्या मनोज आणि त्याच्या आई बाबांकडे गेलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. तिच्या मनात आलं ह्यांना पण आताच काश्मीरला यायचं होतं का? अभिरामच्या लक्षात समिधाची मनःस्थिती आली. मनोजला दोन वर्षांनी पाहिल्यानंतर तिला तिच्या प्रेमभावनांना आवर घालणे थोडं कठीण गेलं. जर अजूनही ते प्रेमबंधनात तसेच असते तर दोघांनीही धावत येऊन एकमेकांना मिठी मारली असती. पण आता ते शक्य नव्हते. मनोजने पण समिधाला लांबूनच पाहिलं. तिला दुसऱ्या पुरुषाबरोबर पाहून त्याचं मन दुखावलं. त्याने त्याच्या आईचं ऐकून समिधाला दूर केलं त्यामुळे तिच्या ग्रुपमधल्या सर्वांनी त्याच्यावर एक प्रकारे बहिष्कार घातला होता. समिधा सर्वांचीच लाडकी होती. त्यामुळे समिधाचे लग्न झाल्याचं त्याला लांबून लांबून कळलं होतं. तेव्हाच समिधा आता आपली कधीच होऊ शकणार नाही ह्याची त्याला खात्री पटली. आईने विरोध केला नसता तर समिधा आज आपल्याबरोबर असती. जर आणि तर माणसाला किती आशावादी बनवतात ना! पण आज समिधा तिच्या नवऱ्याबरोबर अशी अचानक आपल्यासमोर येईल असं त्याला वाटलं नव्हतं.
जवळ आल्यावर बळेच हसत मनोजने विचारलं,
"कशी आहेस समिधा?"
"मी मजेत आहे."
ते तिघेही तिच्यासमोर थांबल्यामुळे समिधाने अभिरामशी त्यांची ओळख करून दिली,
"हे माझे मिस्टर अभिराम आणि हा माझा कॉलेजमधील मित्र मनोज आणि हे त्याचे आईबाबा."
मनोज आणि अभिरामने एकमेकांशी हस्तांदोलन केले. मनोजच्या आईला वाटलं इतका कडक मंगळ असूनसुद्धा हिचं लग्न कसं काय झालं? तिला समिधाचा थोडा मत्सर वाटला आणि ती उपरोधाने म्हणाली,
"तुझं यांच्याशी लग्न झालं ते ठीक आहे पण ह्यांना तुझ्या पत्रिकेतील मंगळाबद्दल सांगितलंस की नाही. बहुतेक लपवूनच ठेवलं असेल."
मनोजला आईचं बोलणं अजिबात आवडलं नाही. अभिरामला पण त्यांचं बोलणं खटकलं आणि तो लगेचच म्हणाला,
"समिधाने मला पत्रिकेतील मंगळाबद्दल तसेच मनोज आणि तुमच्याबद्दल सुद्धा सर्व सांगितले आहे. समिधा एकदम काचेसारख्या स्वच्छ मनाची आहे."
"सगळं कळून सुद्धा तुम्ही हिच्याशी लग्न केलं. कमालच आहे. उद्या तुमच्यावर काही प्रसंग ओढवला की तुम्हाला कळेल मी लग्नाला नाही का म्हटलं ते."
"मानव अवकाशात झेप घेऊन अनेक वर्ष झाली आहेत आणि आपण अजून ग्रहताऱ्यांवर विश्वास ठेवून समोरच्या माणसाची परीक्षा करायची का! मी ह्या सगळ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा एखादी व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे तेच पाहतो." अभिराम समिधाची बाजू घेतोय पाहून त्यांना समिधाचा अजून अपमान करावासा वाटला,
"समिधा तुझं लग्न झालं तरी मंगळामुळे तुला रूपामध्ये तडजोड करावीच लागली ना! मनातल्या मनात तू पण मनोज आणि ह्यांची तुलना केली असशीलच."
हे ऐकून समिधाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती पटकन बोलली,
"रूपाने सुंदर असलेली माणसं मनाने तितकीच सुंदर असतील असं नाही ना. विवाह करताना जोडीदारावर असलेला विश्वास आणि मनाचा मोठेपणा हे जास्त महत्त्वाचं मानते मी. ज्या परिस्थितीत अभिरामने माझा स्वीकार केला असं कृत्य करणारा लाखात एखादाच असतो आणि असा लाख मोलाचा माणूस माझा पती आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. अभीराम आपल्याला अजून बरच फिरायचे आहे चला निघूया आपण." मनोजचे बाबा समिधाला समजावत म्हणाले,
"समिधा तू हिच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. दुर्लक्ष कर. तुला अभिराम जोडीदार म्हणून खूप समजूतदार लाभले आहेत. दोघांनी सुखाने संसार करा. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला."
दोघेही मनोजच्या बाबांच्या पाया पडले आणि तिथून लगेचच निघाले. मनोज आणि त्याचे बाबा दोघांनाही त्याच्या आईचं हे वागणं अजिबात पसंत पडलं नाही. नाही म्हटलं तरी समिधाचा मूड ऑफ झाला होता. अभिराम तीला समजावत म्हणाला,
"समिधा तू वाईट वाटून घेऊ नकोस. मनोजचे जरी तुझ्याशी लग्न झालं असतं तरी तो कायम त्याच्या आईच्या दबावाखाली राहिला असता. त्यामुळे असं समज की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं."
"अगदी खरं बोललात अभिराम. प्रेम करणाऱ्याकडे ते निभावण्याचं धारिष्ट्य असावं लागतं. तो म्हणत होता आईच्या मर्जीविरुद्ध लग्न करू पण त्यात काही अर्थ नव्हता."
"आता उद्या सकाळी आपण मुंबईला परत जाणार आहोत. मनोजची आई जे बोलली ते तू इथेच दाल सरोवरात सोडून दे. त्यांचे कटू शब्द विसरून जा."
"मी तुम्हाला ह्या सगळ्यांबद्दल आधीच सांगितले म्हणून बरं झालं नाहीतर तुमचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असता. तुम्ही त्यांच्यासमोर माझी बाजू घेतलीत त्यामुळे मला तुमचा खूप आधार वाटला."
"अगं तुझ्याशी मी लग्न करताना सप्तपदी चालताना वचनबद्ध झालो आहे. सातवे वचन आहे ना आयुष्यभर मैत्री आणि विश्वास जपणारे, एकमेकांचे सखे होण्याचे वचन. यापुढे मी कधीही तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा आघात होणार असेल तर आधी स्वतःवर झेलेन."
"अभिराम यापुढे माझा सुद्धा नेहमी तोच प्रयत्न असेल."
(मुंबईत आल्यावर समिधाला कोणती आनंदाची बातमी मिळेल किंवा कोणते प्रश्न भेडसावतील आणि अभिराम तिला त्यामधून मार्ग सुचवेल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा