Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३९

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३९


समिधा आणि अभिराम दुसऱ्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास घरी आले. काका गाडी पाठवणार होते परंतु अभिरामने ते येतील असं सांगितला. काका आणि कला मावशी त्यांची वाटच पाहत होते. काका लगेच खुश होऊन म्हणाले,

"आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय. दोघांच्याही चेहऱ्यावर काश्मीरचे गुलाब फुलल्यासारखं वाटतंय." अभिराम हसत म्हणाला,

"काका अरे तू समिधाला म्हणालास तर ठीक आहे. माझ्यासारख्या रांगड्या गड्यावर गुलाब कुठ दिसले तुला."

"बरं चला तुम्ही दोघं फ्रेश होऊन या. मावशींनी तुला हवा तसा साधा वरणभाताचा स्वयंपाक केला आहे."

"काका बाहेर कितीही पंचपक्वान्न असली तरी ती एक दोन दिवस ठीक वाटतात पण दोन तीन दिवसातच आपल्याला आपले घरचे वरण भात, साजूक तूप आणि वर लिंबू पिळून गरम गरम खावं असेच वाटतं."

दोघे जेवायला बसले. मस्त साधाच बेत. वरण भात, उकडलेल्या बटाट्याची भाजी, पोळ्या, साजूक तुपात जिऱ्याची फोडणी दिलेलं ताक.

"आता तुम्ही दोघेही आराम करा. अजून दोन दिवस सुट्टी आहे तुमची. समिधा उद्या घरी जाऊन आई बाबांना भेटून या. वाट बघत असतील ते."

"हो आईने उद्या जेवायलाच बोलावले आहे. काका तुम्ही पण चला न."

"मी नंतर येईन कधीतरी. उद्या तुम्ही दोघेच जा."

समिधाला दुसरा दिवस कधी उजाडतो अस झालं होतं. आपल्या घरापासून ती इतके दिवस कधीच दूर राहिली नव्हती. आई बाबा आणि आपली वाट पाहत असलेल्या बहिणीना आपण कधी बघतोय असं तिला होऊन गेलं होतं.

सकाळी नाश्ता झाल्यानंतर दोघं निघाले होते. लग्नानंतर पूजेला आले होते त्याच्यानंतर आजच समिधा आणि अभिराम घरी येणार होतें म्हणून आईने गोडाचा शिरा केला होता. आज सगळेच घरी थांबले होते. समिधा घरी आल्यावर तिने आईला मिठी मारली. दोघींचे डोळे पाणावले. सायली म्हणाली,

"ए ताई प्रत्येक वेळी डोळ्यातून पाणी काढायचं नाही. चला तुम्ही दोघं बसा. आम्हाला काश्मिरच्या गमती जमती ऐकायच्या आहेत."

"ए थांबा गं मुलीनो, आधी त्यांना गरम गरम शिरा खाऊ दे. मग त्यांना हवा तितका त्रास द्या."

सगळे हसायला लागले.

"बाबा तुम्ही पण सुट्टी घेतली आज. सायलीचे ठीक आहे. सरिता तुझे बारावीचे वर्ष आहे ना. चांगला अभ्यास कर."

"अगं माझं म्हणशील तर आता पाच सहा महिन्यात मी रिटायर होणार. भरपूर रजा शिल्लक आहेत. म्हटलं आज घेऊया. खूप दिवसांनी तुम्ही दोघं भेटणार."

समिधाच्या मनात आलं खरंच की बाबा रिटायर झाल्यावर महिन्याचं ठरावीक उत्पन्न थांबेल. बाबांना पेन्शन मिळेल पण त्यात खर्चाचा ताळमेळ कसा बसणार. ह्या विचाराने ती अस्वस्थ झाली. काही तरी करावं लागेल. समिधा बोलता बोलता एकदम गप्प झाली हे अभिरामच्या चाणाक्ष नजरेने हेरले. तिला परत बोलतं करण्यासाठी तो म्हणाला,

"अगं समिधा बॅग उघड ना. सगळ्यांना तू काय आणलं आहेस ते तरी दाखव."

तिघी जणी एकदम उत्साहाने चित्कारल्या,

"ए ताई मला काय आणलं. दाखव ना लवकर."

समिधाने सर्वांना आणलेल्या भेटी प्रेमाने दिल्या.

"हे सर्व मला ह्यांनी आग्रहाने घ्यायला लावलं आहे. त्यांना सर्वांची काळजी आणि आठवण असते. हे बघ आई तिकडचे प्रसिद्ध केशर, अक्रोड,
बदाम आणि हे मसाले."

"अरे बापरे! किती काय काय आणलं आहेस आणि मला इतकी महागाची साडी आणायची काय गरज. मी कुठे जाणार इतकी सुंदर साडी नेसून. ह्या तिघींना पण ड्रेस आणि वेगवेगळ्या पर्स कशाला आणल्यास!"

"अहो आई असं कसं म्हणता. आता तुम्हाला आमच्याबरोबर फिरायला यायचं आहे. तेव्हा ही साडी नेसायची आणि मुलींची हौस असते हो. बरं ते जाऊदे. सायली जेवण झाल्यावर आपण कुठे फिरायला जायचं ते सांग. फिरून झाल्यावर मस्त बाहेरूनच जेवून येऊ. काय कसा आहे बेत."

"अहो जावईबापु पुन्हा कधीतरी जाऊया. तुम्ही पण दमून आला आहात."

"बाबा सर्वात आधी तुम्ही मला अभिराम म्हणा. आणि आराम कशाला आम्ही काय ओझी उचलायला गेलो होतो का?"

"बाबा जाऊया ना. आम्हाला जिजूंच्या गाडीत बसायचं आहे."

"अरे अभिराम काकांना पण फोन करून बोलाव. मला पण कंपनी होईल."

"चांगली कल्पना आहे. लगेचच फोन करतो. तसं पण ह्या तिघी बारीक आहेत. या मागे बसतील."

बाबांना गप्पा मरायला सोबत म्हणून काका पण लगेच तयार झाले. सगळ्यांची बडबड चालू होती तरीही समिधाच्या मनातून बाबा रिटायर होणार हे काही जात नव्हतं.

(समिधा समोरची आव्हाने एका मागून एक येतच होती. काय होतं पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all