Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४०

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४०


आठवड्याचा पहिला दिवस सोमवार उजाडला. सुट्टी संपून समिधाला आजपासून ऑफिसला जायचं होतं. अभिराम म्हणाला,

"पहिलाच दिवस आहे मी सखाराम काकांना तुला सोडायला सांगतो."

"छे छे मला कारच्या प्रवासाची सवय नाही. मी आपली नेहमीसारखी ट्रेननेच जाईन."

"बरं आज तुला इथून पास काढायचा आहे तो तरी
फर्स्टक्लास चा काढ."

"अहो हा महिना सेकंडचाच काढते. उलटा प्रवास आहे. मला गर्दी नाही लागणार. काय आहे आम्ही नेहमी सेकंड क्लास ने फिरणारे फर्स्टक्लास मध्ये बुजल्यासारखं वाटेल."

"आता तुला सवय करायला हवी. तू मॅनेजर आहेस ना बँकेत. अजून प्रमोशन मिळतील."

"तेव्हाचे तेव्हा बघू. चला मी निघते आता. तुमची काय स्वतःची फर्म आहे. सर्वेसर्वा आहात. त्यामुळे कधीही गेलं तरी चालेल. एक बरं आहे इथून स्टेशन जवळ आहे. त्यामुळे पटकन जाता येईल." बाहेर काका बसले होते.

"समिधा नीट जा. इथना पहिल्यांदाच जाते आहेस. डबा, पाणी सगळं घेतलं ना."

"हो काका. येते मी."

समिधा बँकेत शिरली तर तिचे सहकारी कुजबुजले,

"ए आली समिधा आली."

"समिधा आम्हाला एकदम ग्रँड पार्टी पाहिजे हा. डबल धमाका."

"का गं! डबल का?"

"एक तर वर्किंग डे मुळे लग्नाला आम्ही कोणीच आलो नाही आणि आता दुसरी गुड न्यूज साहेब आताच आलेत. तेच सांगतील."

समिधा आपल्या डेस्क वर गेली इतक्यात तिला साहेबांनी बोलावल्याचा निरोप मिळाला. ती लगेच केबिन मध्ये गेली.

"या समिधा मॅडम. डबल काँग्रज्यूलेशन्स! लग्न झालं आणि तुम्हाला सिनिअर मॅनेजरचे प्रमोशन मिळालं आहे. आहात कुठे."

"हो मी सुट्टीवर जायच्या आधी इंटरव्ह्यू दिला होता. आला पण रिझल्ट. सगळी देवाची कृपा, तुमचं मार्गदर्शन आणि इतर सर्वांचे सहकार्य."

"हा तुमचा नम्रपणा. तुम्ही खूप मेहनती आहात आणि मन लावून काम करता त्याचेच हे फळ. हे लेटर यात काय फायदे मिळणार आणि इतर सर्व नमूद केलं आहे."

समिधा बाहेर आल्यावर सर्वांनी तिचं अभिनंदन केलं. सर्वांनी मिळून आणलेलं गिफ्ट साहेबांच्या हस्ते तिला दिलं. सर्वांनी गलका केला,

"आता उद्या पार्टी."

"हो नक्की. तुम्ही मेनू डिसाइड करा. कोणाला ऑर्डर द्यायची ते ठरवा."

"आपला दीपक आहे ह्यातील एकदम माहितगार. ए दीपक मस्त मेनू ठरव आणि शेवटी आईसक्रीम पण. बँकिंग अवर्स संपल्यावर सर्व येऊदे म्हणजे निवांत खाता येईल." साहेब म्हणाले,

"पार्टी उद्या आहे आता सर्व कामाला लागुया. कस्टमर यायची वेळ आली."

"हो हो चला आपल्या जागेवर."

समिधाचा विश्वासच बसेना. तिने पहिला फोन आपल्या घरी लावला.

"आई मला प्रमोशन मिळालं आहेस कुठे."

"समू किती आनंदाची बातमी दिलीस. अभिनंदन. तू हुशारच आहेस."

"आई मी नंतर बोलते आता काम आहे."

"समू अभिरामना कळवलं का?"

"अय्या नाही गं"

"हे बघ आता सुखदुःख, आनंद सगळं आधी त्यांना सांगायचं. नंतर आम्हाला. कळलं ना."

"हो आई माझ्या लक्षातच आलं नाही. सांगते त्यांना."

समिधाच्या मनात आलं अभिराम आपला किती विचार करतो तरी आपण अजून आपल्या भावविश्वात त्याला सामावून घेतलं नाही. आपल्याला आता सवय करून घ्यायला हवी. आईच्या बरोबर लक्षात आलं. चल त्याला आधी फोन करूया.

"हॅलो"

"हॅलो काय गं नीट गेलीस ना ऑफिसला. काही झालंय का?" अभिरामच्या शब्दातील काळजी पाहून तिला आपण त्याला डावललं त्याचं तिला वाईट वाटलं.

"अहो नाही मी आले नीट ऑफिसला. मला प्रमोशन मिळालं ते सांगायला फोन केला."

"अरे व्वा मनःपूर्वक अभिनंदन. पहिला दिवस एकदम आनंदाचा. आता सर्वांना मस्त पार्टी दे."

"हो पार्टी घेतल्याशिवाय इथे सुटका नाही. उद्या देणार आहे. बरं आता ठेवते. काम सुरू झालं आहे."

खरंच हा माणूस एकदम दर्यादिलं आहे. आपण पण त्याला समजून घ्यायला हवं. समिधा स्टाफ आणि नेहमी येणाऱ्या ग्राहकांची पण लाडकी होती. ती सर्वांशी खूप आत्मीयतेने वागायची. ज्येष्ठ नागरिकांशी तर ती खूप प्रेमाने बोलायची. त्यांना सर्व समजावून सांगायची. कुणाचे कामात काही अडलं तर समिधा सर्वांना मदत करायची.

संध्याकाळी समिधा घरी निघाल्यावर पण ट्रेनला गर्दी नव्हती त्यामुळे तिला छान बसायला पण जागा मिळाली. सकाळी पण उलटा प्रवास असल्यामुळे तिला बसायला जागा मिळाली होती. घरी येताना तिने आठवणीने पेढे आणले होते. काका तिची वाटच पाहत होते.

"समिधा खूप खूप अभिनंदन! अभीराम कडून कळलं तुला प्रमोशन मिळालं."

"हो काका सुट्टीवर जायच्या आधीच मी इंटरव्ह्यू दिला होता. आता हात पाय धुवून देवासमोर पेढे ठेवते आणि तुम्हाला पण देते." इतक्यात अभिराम पण घरात आला.

"काय रे समिधासाठी प्रमोशनचे गिफ्ट आणलं की नाही!"

"अरे काका तुझाच पुतण्या आहे तुझ्याच संस्कारात मोठा झालो आहे. आणलं आहे. आता तिला देईन तेव्हाच दाखवेन."

"हा घ्या काका पेढा. नमस्कार करते हो."

तिने दोघांना पेढे देऊन कला मावशींना पण पेढा देऊन नमस्कार केला. अभिराम ने तिच्यासाठी आणलेली भेटवस्तू पुढे केली.

"हे काय आता?"

"बघ उघडून." समिधाने उघडून पाहिलं त्यात एक आकर्षक सुंदर घड्याळ होतं.

"अय्या किती छान आहे. आज मला ऑफिसमधून पण लग्नाचं गिफ्ट मिळालं आणि आता हे प्रमोशनचे गिफ्ट. सुंदर आहे. खूपच सुंदर आहे"

समिधाचा आनंदी चेहरा पाहून अभिरामने मनातल्या मनात देवाची प्रार्थन केली हिला कायम असेच आनंदात ठेव.

(अभिराम आणि समिधाचा संसार असाच आनंदाचा होत राहील का पाहूया पुढील भागात)


क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all