दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४१
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४१
समिधाचं रूटीन चालू झाले होते. समिधाला घरी काही काम करावं लागत नव्हतं. तरी ती काही शांत बसणाऱ्यातली नव्हती. मध्ये मध्ये ती किचन मध्ये जाऊन कला मावशींच्या हातून काम घेऊन करायची. कधी कधी एखादा पदार्थ स्वतः करायची. काम करता करता त्यांच्याशी ती गप्पा मारायची. साहजिकच दोघींच्या मध्ये एक छान जवळीक निर्माण झाली होती. असेच एक दिवस समिधा किचनमध्ये असताना तिने पाहिलं की कला मावशींचा चेहरा चिंताग्रस्त दिसतोय. ती त्यांच्या जवळ गेली त्यांना आपल्याकडे वळवलं आणि काळजीने विचारलं,
"मावशी काय झालं तुम्ही टेन्शन मध्ये दिसता"
"समिधा ताई अहो कालपासून यांची तब्ब्येत बिघडली आहे. घरी दुसरे कोणीच नाही. आज खरं तर मी घरीच राहणार होते पण तुमची पंचाईत होईल म्हणून आले."
"मावशी ते हातातलं काम सोडा आधी आणि लगेच घरी जा. काकांना डॉक्टरकडे घेऊन जा. मी येऊ का तुमच्या बरोबर."
"अहो ही कामं तरी उरकते. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना!"
"मावशी मला कामांची सवय आहे. जोपर्यंत काकांना बरं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या बरोबर राहा. त्यांची काळजी घ्या. मी संध्याकाळी येऊन जाईन. हे पैसे ठेवा. अजून लागले तर सांगा. तुम्ही फक्त एक फोन करून सांगायचं ना. असं काही असलं तर रजा घ्यायची. मी सखाराम काकांना तुम्हाला घरी सोडायला सांगते."
समिधा आणि मावशींचा आवाज ऐकून अभिरामने किचन मध्ये डोकावले. समिधाने त्याला सर्व सांगितलं. तो म्हणाला,
"मावशी तुम्ही आमच्या घरच्यासारख्या आहात. अशा वेळी काकांना काय झालं तर! चला मी येतो तुमच्या बरोबर. तसं पण सखाराम काका अजून आले नाहीत."
सगळ्यांचा आपलेपणा पाहून मावशींचे डोळे पाझरू लागले. अभिराम त्यांच्या बरोबर गेला. इकडे समिधा झरझर सगळं आवरू लागली. इतक्यात काका आत आले,
"समिधा तुला ऑफिसला जायचं आहे. अगदी पूर्ण जेवण करत बसू नकोस. जेवढं जमेल तेवढं कर आणि निघ तू. बाकीचं मी बघेन."
"काका सगळं होत आलं आहे. मला उलट खूप दिवसांनी काम करायला मिळालं त्यामुळे बरं वाटलं."
अभिराम मावशींबरोबर त्यांच्या घरी गेला तेव्हा काकांना खूप ताप होता. तो स्वतः गाडीतून त्यांना डॉक्टर कडे घेऊन गेला. डॉक्टरनी त्यांच्याकडील आणि बाहेरची औषधे लिहून दिली. पुन्हा दोन दिवसांनी येऊन दाखवायला सांगितलं. अभिराम दोघांना पुन्हा मावशींच्या घरी घेऊन आला. त्याने मावशींना ताकीद दिली,
"मावशी काकांना पूर्ण बरं वाटल्याशिवाय तुम्ही कामाला यायचं नाही. आम्ही सर्व सांभाळून घेऊ आणि हे पैसे ठेवा जवळ. काही गरज लागली तर लगेच फोन करा. आज समिधाच्या लक्षात आलं म्हणून कळलं तरी. आम्हाला तुम्ही काही सांगितलच नसतं. चला मी निघतो आता. काकांची पूर्ण काळजी घ्या." अभिराम जाताना पैसे देऊ लागला तशी मावशी म्हणाल्या,
"पैसे नकोत साहेब. समिधा ताईंनी दिले आहेत."
"एक तर मला साहेब म्हणायचं नाही किती वेळा सांगितलं तुम्हाला. हे पैसे पण असुदे काही लागलं जास्त कमी तर कामाला येतील."
अभिराम तिथून निघाला तेव्हा त्याच्या मनात आलं ही समिधा पण एक अजब रसायन आहे. तिने मावशींकडे पाहून लगेच त्यांचा चेहरा वाचला. त्यांच्या हातातून काम घेऊन पैसे देऊन घरी सोडायची व्यवस्था करू पाहत होती. तिच्या अशा प्रत्येक कृतीमुळे आपलं मन दिवसेंदिवस तिच्याकडे ओढ घेतंय. तिच्या मनात आपल्याबद्दल काय विचार असतील. तिला झटक्यात श्रीमंती पहायला मिळाली परंतु ती कधीच गैरफायदा घेत नाही. तिच्या घरच्यांसाठी आपल्याला जितकं करता येईल तितकं आपण करायला हवं. तिच्या घरच्यांसाठी असं म्हणणं अयोग्य आहे. तिच्यामुळे आपल्याला प्रेमाची माणसं मिळाली आहेत.
विचारांच्या तंद्रीत तो घरी आला तेव्हा समिधा किचन मधील सर्व आवरून ऑफिसला गेली होती. मावशी नाहीत तोपर्यंत तिच्यावर स्वयंपाकाचा भार पडेल. आपण पण मदत करायला हवी. इतर कामांना दुसऱ्या मावशी आहेतच. त्याने काकाला विचारलं,
"काय रे सर्व आवरताना समिधाला उशीर नाही झाला ना!"
"अरे उलट तिला काम करायला मिळालं म्हणून खुश होती. बापरे कामात ती एकदम
"बडाफास्ट" आहे. अरे आमच्या वेळी एक विरार लोकल होती तिचं नाव होतं "बडाफास्ट". आपली समिधा तशीच आहे. चल तू पण आता आवरून निघ."
"बडाफास्ट" आहे. अरे आमच्या वेळी एक विरार लोकल होती तिचं नाव होतं "बडाफास्ट". आपली समिधा तशीच आहे. चल तू पण आता आवरून निघ."
(समिधा सर्वांची मनं जिंकत आहे. अभिराम तिच्या मनात कधी जागा मिळवू शकेल पाहूया येणाऱ्या पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा