Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४२

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४२


आज महिना अखेरीचा दिवस होता. महिन्याच्या शेवटच्या दिवशी समिधाची सॅलरी बँक अकाऊंट मध्ये जमा व्हायची. ऑफिसमधले सगळेजण मोबाईल मध्ये त्याचा मेसेज कधी येतो वाट बघत असायचे. सगळ्यांनाच कडकी असायची अशातला भाग नव्हता. पण सॅलरी क्रेडिट होणे म्हणजे किती आनंदाची भावना असते हे प्रत्येक नोकरी करणाराच जाणू शकतो. कधी कधी मेसेज न येता डायरेक्ट अकाउंटला सॅलरी क्रेडिट व्हायची. काही जणांना छंद होता सॅलरीच्या दिवशी सारखं सारखं अकाउंट चेक करण्याचा. त्यातलेच कोणीतरी आनंदाने ओरडून सांगायचं,

"ए झाली रे झाली." लगेच सर्व जण आपल्या अकाउंटला किती क्रेडिट झाले ते जाऊन बघायचे. आजच्या दिवसाची सगळेच जण आतुरतेने वाट पहायचे. समिधाच्या मनात आता ट्रेनमध्ये बसल्या बसल्या तोच विचार चालू होता. आपल्या प्रमाणेच आपले बाबा पण आजच्या दिवसाची वाट पाहत असायचे कारण त्यांची सॅलरी महिन्याच्या प्रत्येक सात तारखेला व्हायची. त्यामुळे तोपर्यंत समिधाचाच आधार असायचा. आज बाबांना आपली खूप जास्त आठवण येत असेल. बाबांना फोन करून थोडे पैसे त्यांच्या अकाऊंट मध्ये ट्रान्स्फर करायला हवेत.

पुढच्या महिन्यापासून आपली सॅलरी वाढेल प्रमोशनमुळे. इतर पर्क्स सुद्धा वाढतील. अजून आपण अभिरामशी बाबांना काही पैसे देण्याच्या बाबतीत काहीच बोललो नाही. त्यांच्याजवळ हा विषय कसा काढायचा काही कळतच नाही. बघूया काहीतरी मार्ग काढावाच लागेल.

विचारांच्या तंद्रीत तिचं उतरायचं स्टेशन सांताक्रूझ आलं पण. आज बँकेत आधी पासूनच रांग लागली होती. विविध टॅक्स भरण्याची शेवटची तारीख होती. उद्या बिचारे पेन्शनरची गर्दी असेल. तिला आशाळभूतपणे बँकेत येणाऱ्या पेन्शनर्सची नेहमीच दया यायची. काही काहींच्या खात्यात तर झिरो बॅलन्स किंवा अगदीच पाच दहा रुपये असायचे. काहींचे पेन्शन औषध पाण्यात संपून जायचं तर काहींची मुलं त्यांना नीट वागवत नसत आणि महिन्याला त्यांच्याकडून पण पैसे घ्यायची.

बँकेत ती नेहमीप्रमाणेच जलद काम करत होती पण तिच्या मनात विचारांचें काहुर उठले होते. सध्या मावशी नसल्यामुळे ती घरातील सर्व उरकून ऑफिसला येत होती. थोड्या वेळाने गर्दी थोडी कमी झाल्यावर तिने बाबांना फोन लावला.

"हॅलो समू तुझीच आठवण आज येत होती. तू अगदी दर महिन्याला ह्या बापाला आर्थिक मदत करत होतीस. हो तरी तू काळजी करू नकोस. आमची थोडी ओढाताण होईल पण आम्ही करू सर्व व्यवस्थित."

"बाबा मी त्याचसाठी फोन केला. आता मी तुमच्या अकाऊंट मध्ये थोडे पैसे ट्रान्स्फर करते आणि मग ह्यांच्याशी बोलून दर महिना मी तुम्हाला पैसे देत जाईन."

"अगं तू वेडी आहेस का. खरं तर मुलीकडून पैसे घेणं चुकीचं आहे त्यात लग्नानंतर तर मुळीच नको. तू जावई बापूंना काही बोलू नकोस. उगाच त्यांचा गैरसमज होईल."

"ते मी बघते. बाबा आता जमाना बदलला आहे. लग्नानंतर मुलीकडून काही घ्यायचं नाही, लोक काय म्हणतील. असा विचार आता करायचा नाही. मला एक सांगा ज्यांना फक्त मुलीच आहेत, ज्यांना कोणाचा आधार नाही अशा पालकांनी काय करायचं. मुली आता कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. आपल्या पालकांना काही हवं नको बघणं आता मुली पण तितक्याच जबाबदारीने करतात. बरं आता ठेवते काम आहे."

इतक्यात मोबाईलमध्ये मेसेज दिसला सॅलरी क्रेडिट झाल्याचा. आज अभिरामशी बोलायचं हा विचार पक्का झाल्यावर तिला शांत वाटलं. संध्याकाळी घरी जाताना लग्नानंतरचा पहिला पगार म्हणून तिने देवापुढे ठेवण्यासाठी पेढे घेतले. ती घरी आली तर अभिराम आज तिच्या आधीच आला होता. तिने कपडे बदलून हात पाय धुतले आणि ती चहा करण्यासाठी किचन मध्ये गेली. गॅस वर चहाचे आधण ठेवलं होतं. तिने मागे बघितलं तर अभिराम तिला म्हणाला,

"तू बाहेर बस मी आपल्या तिघांसाठी चहा घेऊन येतो."

"अहो तुम्ही कशाला केलात मी केला असता ना."

"अगं माझ्या हातचा पिऊन बघ जमलाय की नाही मला."

ती बाहेर आली आणि पेढ्याचा बॉक्स घेऊन आधी देवासमोर पेढे ठेवून आली. मग काकांना पेढा दिला.

"लग्ना नंतर पहिलाच पगार म्हणून पेढे आणले."

"अरे व्वा छान छान."

"काय कसा झाला आहे चहा."

"एकदम फक्कड."

चहा घेऊन झाल्यावर काका फेरफटका मारायला खाली गेले. ती संधी साधून समिधा म्हणाली,

"अहो आज माझी सॅलरी झाली. म्हणजे अकाउंट मध्ये क्रेडिट झाली."

"अरे व्वा म्हणजे तुम्हाला एक तारखेची वाट पहावी लागत नाही."

"बरं मी आता ते पैसे तुमच्या अकाऊंट मध्ये ट्रान्स्फर करू की काकांच्या अकाउंटला करू. तुम्ही सांगाल तसं करेन."

"लग्नाच्या आधी तू काय करायचीस."

"तेव्हा मी माझ्या आणि बहिणीच्या किरकोळ खर्चासाठी पैसे ठेवून बाकी बाबांच्या अकाउंटला ट्रान्स्फर करायचे."

"आता यापुढे तसे काही करायचं नाही."

समिधाने पटकन त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिला वाटलं आता बाबांना आपल्याला पैसे काही देता येणार नाही. अभिरामच्या आतापर्यंतच्या वागण्यावरून तो असं काही बोलेल असं तिला वाटलं नव्हतं. तिच्या मनात आलं शेवटी सगळे नवरे सारखेच असतात की काय!

(अभिराम असं का म्हणाला असेल त्याचं कारण पाहुया पुढील भागात)


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all