Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४४

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४४


अभिरामने वातावरण निर्मिती करण्यासाठी बाबांना विचारलं,

"आता तुमचं लक्ष सगळं निवृत्ती दिन कधी येतो याकडे लागलं असेल नाही का!"

"हो लक्ष तिकडे लागलं आहे खरं पण त्याच वेळेस काही प्रश्न आ वासून उभे राहणार आहेत त्याचेही टेन्शन येतंय. इतके दिवस पगार हातात येत होता पण एकदा निवृत्त झाल्यावर पेन्शन मिळेल. आता पेन्शन किती असतं हे तुम्हाला साधारण माहितीच असेल."

"अशावेळी तुम्हाला समिधाची उणीव नक्कीच भासेल नाही का."

"अभिराम काय सांगू तुम्हाला समिधा ही माझी मुलगी नाही तर माझा मुलगाच आहे. आमच्या प्रत्येक अडचणी दूर करणं आणि अशावेळी आम्हाला धीर देणं हे नेहमीच ती करत आली आहे."

"तिने पुढेही हे सर्व करत राहिलं तर तुम्हाला कसं वाटेल?"

"म्हणजे तुम्ही काय बोलताय माझ्या काही लक्षात येत नाही. जरा मला समजेल अशा भाषेत बोला की."

"हे बघा खरंतर समिधाने आता लग्नानंतर नोकरी करण्याची काही गरज नाहीये कारण माझा व्यवसाय असल्यामुळे माझे उत्पन्न आम्हाला सर्वांना पुरून उरेल एव्हढे आहे. समिधा एवढी शिकली आहे. तिला एवढी छान नोकरी आहे आणि तिला ते काम करायला आवडतं. मुख्य म्हणजे तिला ते काम आवडतं म्हणून ती ते करतेय. शिवाय माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येक स्त्रीने आर्थिक रित्या स्वावलंबी असावं. ते तिला आत्मविश्वासाने जगायला शिकवते . मला असं म्हणायचं की मी आणि समिधाने असं ठरवलं आहे की समिधाचा पगार यापुढेही तिने तुम्हालाच द्यावा."

"छे छे अभिराम हे शक्य नाही. समिधाचे आता लग्न झालंय. तिने आम्हाला येताना खाऊ, एखादी भेट वस्तू आणणं हे वेगळं आणि पूर्ण पगार देणं लग्न झाल्यानंतर बरं नाही वाटत."

"बाबा मला समिधामुळे आई बाबा मिळाले, बहिणी मिळाल्या आणि तुम्ही पण मला मुलगाच मानता ना आणि तुम्ही लग्नानंतर मुलगी परकी होते असे विचार मनात आणू नका. सायली आता नोकरी शोधतेय परंतु या दोघींचे अजून शिक्षण बाकी आहे. तुम्ही आता अजिबात नाही म्हणू नका. मुख्य म्हणजे ह्या गोष्टीचा उल्लेख बाहेर कुठेही होणार नाही त्यामुळे तुम्हाला कमीपणा येणार नाही."

"तुम्हाला मी काय म्हणू! तुम्ही आमच्या आयुष्यात एका अत्यंत अपमानास्पद क्षणी आलात आणि आता कायम देवासारखे आमच्या मदतीला धावून येता. आमच्या समिधाला नवरा म्हणून हिरा मिळाला आहे."

"बाबा तुम्ही मला मोठमोठ्या उपमा देऊन लाजवता आहात. अहो मी एक सर्वसामान्य माणूस आहे. माझं स्पष्ट मत आहे की माणूस येताना एकटा येतो जाताना रिकाम्या हाताने जातो तर त्याने संपत्तीचा मोह कशासाठी करावा."

"अभिराम तुझे विचार खूपच चांगले आहेत. आता सायली पण नोकरीचा प्रयत्न करतेच आहे. नोकरी करता करता ती शिकायचं म्हणते."

"सायली पण कॉमर्स साईडलाच आहे ना. सायली जर तुला नोकरी करता करता शिक्षण घ्यायचं असेल तर तुला आपल्या फर्ममध्ये नोकरी करायला आवडेल का. तिथे तुला अनुभव पण मिळेल आणि कामाचं जास्त प्रेशर नसेल. अभ्यास करायला वेळ मिळेल."

"जीजू हे तर असं झालं की आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. मला तुमच्या फर्ममध्ये काम करायला नक्कीच आवडेल."

"तुमच्या नाही ग बाई आपल्या. आता आपल्यात आमचं तुमचं काही नाही कळलं!"

ही गोष्ट समिधाच्य कधीच लक्षात आली होती. अभिराम नेहमी आपली गाडी, आपलं घर असंच नेहमी म्हणतो. कधीही तो आमची गाडी असं कधीच म्हणाला नाही. समिधा जसजशी त्याच्याबद्दल विचार करत होती तिच्या लक्षात येत होतं की अभिराममध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. समोरच्या व्यक्तीला तो कायम समजून घेत आला आहे. जसं एखाद्या सौंदर्यवतीला देव फुरसत मध्ये बनवतो असे म्हणतात तसं या मोठ्या मनाच्या माणसालाही देवाने फुरसत मध्ये बनवले आहे असे वाटते.

"बाबा आता तुम्ही या दोन गोष्टींचा अजिबात ताण घ्यायचा नाही. यापुढेही कसले टेन्शन असेल तर आम्हाला हक्काने सांगायचं. आई आता मला पुरणपोळीच्या सुगंधाने कधी जेवतो असं झालं आहे."

"हो हे काय वाढायलाच घेते मी."

आईने मार्गशीर्ष महिन्याची म्हणून समिधाला साडी देऊन ओटी भरली आणि अभिरामला शर्ट, पॅन्ट पीस दिला. सर्वांनी हसत खेळत यथेच्छ जेवण केलं. त्यानंतर दोघे घरी जायला निघाले. आईने काकांसाठी आणि अभिराम साठी चार पुरणपोळ्या डब्यात घालून दिल्या.

घरी जाताना समिधाला खूप हलकं हलकं वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून अभिरामला पण खूप समाधान वाटत होतं. ते दोघं घरी आले तेव्हा काका बाहेर सोफ्यावर बसून टीव्ही बघत होते.

"काय काका जेवून बराच वेळ झाला असेल आणि तुला भूक लागली असेल तर एक छान सरप्राइज आहे. ओळख पाहू!"

"अभिराम मला माहितीच होतं की सुषमा वहिनी माझ्यासाठी पुरणपोळ्या नक्कीच देणार. चल आताच खातो नाहीतर उद्या तू वाटेकरी होशील."

"हो मग आईनी मला आणि तुला दोघांसाठी दिल्या आहेत. माझा हिस्सा मी राखून ठेवणार."

समिधाला हसू आवरत नव्हतं. तरी तिने विचारलं,

"काका दूध गरम करून आणू का?"

"तेव्हढा धीर कोणाला आहे! जा पळ तू तुझं आवरून झोप."

(अभिराम सारख्या देवमाणसाबद्दल समिधाच्या मनात हळूहळू भक्तीभावना निर्माण होत होती की प्रेमभावना हे तिचं तिलाही कळत नव्हतं. नक्की काय ते पाहुया येणाऱ्या काही भागांत)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all