Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४५

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४५


समिधा अभिरामच्या लग्नाला आता तीन महिने झाले होते. शनिवार रविवारला जोडून दोन बँक हॉलिडे आल्यामुळे आता समिधा चार दिवस घरी राहणार होती. बऱ्याच दिवसात बाबा आले नव्हते म्हणून अभिरामने त्यांना चार दिवस इकडे बोलावून घेतले. ते आल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता.

"समिधा मी ऐकलं की तू ओल्या वाटाण्याच्या करंज्या खूप अप्रतिम करतेस. माझी उद्या नाश्त्यासाठी हीच फर्माईश असं समज.'"

"बाबा त्यात काय एव्हढे. मटार सोलून ठेवला आहे. अजून काय हवं बोला लगेच करू आपण."

"आपण नाही बाई तुलाच करायचं आहे." समिधाला हसू आलं. आता कला मावशी पण यायला लागल्या होत्या. समिधाने पुढाकार घेऊन ओल्या मटारच्या करंज्या आणि इडली चटणी नाश्त्यासाठी केली. पुरणपोळ्या इथे सर्वांनाच आवडतात म्हणून आज जेवणासाठी तिने पुरणपोळ्यांचा घाट घातला. सर्व जण खूप खुश होते. जेवल्यावर गप्पा मारण्यासाठी सगळे बाहेर सोफ्यावर बसले होते. समिधा बडीशोप घेऊन येत होती इतक्यात तिचा पाय घसरला आणि ती घरातच जोरात पडली. सगळे तिला उठवण्यासाठी धावले. अभिरामने तिला हात दिला पण तिला काही उठता येईना. तिच्या पायातून खूप कळ येत होती. तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि दुखण्यामुळे डोळ्यात पाणी आलं होतं. ती अक्षरशः विव्हळत होती. शेवटी बाबा म्हणाले,

"अरे अभी बघतोस काय तिला उचलून सोफ्यावर बसव. नक्की काय झाले आहे बघ. नाहीतर आपल्या इथल्या जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे घेऊन जाऊ."

अभिरामला प्रश्न पडला होता आता हिला उचलून न्यायचं तरी कसं. तिला आवडेल ना! अर्थात ही विचार करण्याची वेळ नव्हती. त्याने समिधाला अलगद उचलले. समिधाला अभिरामचा इतक्या जवळून प्रथमच स्पर्श होत होता. त्याही परिस्थितीत तिच्या मनात आलं ह्याने किती अलगद आपल्याला उचलून घेतलं आहे. हे ह्याचं असं आपल्याला जपणं आपल्याला आवडायला लागलं आहे का?

अभिरामच्या मनात येत होतं हिला असं वाटता कामा नये की आपण तिला मुद्दाम जास्त जवळ घेतोय. तिचा आपल्या बद्दल कोणत्याही प्रकारचा गैरसमज होता कामा नये. आपल्या वागण्याने तिच्या मनात हळुवार भावना
उमलायला हव्यात. एक तर हिचा पाय इतका दुखतोय फ्रॅक्चर वगैरे नको रे देवा. अभिरामने तिला अलगद सोफ्यावर ठेवलं. कला मावशी पाणी घेऊन आल्या ते समिधाला प्यायला दिलं. आता खरी पंचाईत होती. समिधाला नक्की कुठे लागलंय कसं बघणार. तिने स्वतः हाताने पोटरीच्या खाली हात लावून दुखतंय असं सांगितलं. तिला खूपच वेदना होत होत्या. बाबा म्हणाले,

"अभी आपण घरगुती उपचार करण्यात वेळ घालवायला नको. मी गाडी काढतो तू तिला घेऊन ये आपण डॉक्टर वेलिंग कडे तिला घेऊन जाऊ."

बाबा आणि काका खाली गेले. अभिराम ने समिधाला विचारले,

"तुला खाली पण उचलून नेलं तर तुझी काही हरकत नाही ना!"

"मी प्रयत्न करते दुसऱ्या पायावर जोर देऊन आधार घेऊन चालता येतं का पाहते."

समिधाने प्रयत्न केला पण ते काही तिला शक्य होईना. शेवटी अभिरामने तिला उचलूनच खाली नेलं. गाडीत बसवताना पण तिला खूपच त्रास झाला. वातावरणातला गंभीरपणा नाहीसा करण्यासाठी बाबा म्हणाले,

"काय गं समिधा मी अजून माझ्या काही फर्माईशी सांगू नये म्हणून मुद्दाम पडली नाहीस ना." समिधा सकट सर्वांनाच हसू आलं.

"काय हो बाबा मी इतकी नाटकी वाटते का तुम्हाला!"

"गंमत केली ग! ए पण आता मीच तुला तुझ्या आवडीचं काहीतरी खायला करून देईन बरं का!"

"बाबा मस्त स्वयंपाक करतात. हो की नाही काका"

"प्रश्नच नाही." इतक्यात वेलिंग डॉक्टरांचं क्लिनिक आलं. इथे समिधा पटकन म्हणाली,

"इकडे व्हीलचेअर असेल ना. मी त्याच्यावरून जाईन." बाबा आणि काका हसायला लागले,

"अनिल आपल्यामुळे लाजते समिधा." अभिरामने वॉर्डबॉयला व्हीलचेअर आणायला सांगितली

डॉक्टरनी समिधाचा पाय तपासून सांगितलं की फ्रॅक्चर नाही परंतु लिगामेंट टेअर झालं आहे त्यामुळे दहा दिवसांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल. मी हे क्रेप बँडेज बांधून देतोय आणि पाय असा सरळच ठेवायचा. या पायावर अजिबात जोर द्यायचा नाही. काही औषधं लिहून देतो. दहा दिवसानंतर पुन्हा दाखवायला या.

फ्रॅक्चर नसल्यामुळे सगळ्यांनाच समाधान वाटत होतं. समिधाला घरी आणल्यावर अभिराम म्हणाला,

"ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले सक्तीची दहा दिवस विश्रांती घ्यायची आहे त्याच्यानंतर पाहूया."

"बापरे दहा दिवस काय मी एक दिवस पण असे एका ठिकाणी राहू शकत नाही. काय करू मी दहा दिवस."

"मस्त आराम करायचा आणि आम्ही तिघे आहोत ना तुझं मनोरंजन करायला. हा एवढा मोठा टीव्ही आहे तो बघायचा."

(आता समिधापुढे दहा दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीचे आव्हान आहे. आता पुढे काय होईल पाहूया पुढील भागात)


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all