Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४६

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४६


समिधाने बँकेत कळवून टाकलं की काही दिवस ती येऊ शकणार नाही पायाला दुखापत झाल्यामुळे. तिच्या माहेरी कळल्यावर आई आणि बाबा लगेच तिला बघायला आले.

"समू काय ग हे काय होऊन बसलं."

"काही नाही हो बाबा दहा दिवसांचा प्रश्न आहे लगेच मी उड्या मारायला लागेन."

"तुला खूप घाई असते. घाईमुळे ते झाले आता जरा सावकाश चालत जा." समिधाच्या काळजीने तिच्या आईने विचारलं,

"मी राहू का दोन दिवस. तुला जरा बरं वाटेल."

"नाही आई तू इथे राहिलीस तर तिकडे सगळ्यांची पंचाईत होईल. इथे कला मावशी आहेत. अभिराम आणि काका, बाबा सगळे आहेत. मी घेईन माझी काळजी."

हे असं आराम करायची सवय नसल्यामुळे तिला काही सुचतच नव्हतं. अभिरामने तिच्यासाठी काही पुस्तके ऑनलाईन ऑर्डर केली होती. तिला वाचनाची प्रचंड आवड होती. तिने तो खुराक दोन दिवसातच संपवला. सकाळच्या वेळी ऑफिसला जायच्या आधी अभिराम आस्थेने तिची चौकशी करूनच निघायचा. संध्याकाळी पण तो नेहमीपेक्षा लवकर यायचा. तिच्याशी गप्पा मारायचा. एक दिवस त्याच्या मनात एक नवीन कल्पना सुचली. त्याने काका संध्याकाळचा फेरफटका मारून आल्यावर त्याला पण समिधा आराम करत असलेल्या रूम मध्ये बोलावलं,

"काय रे अभी आज काय बेत आहे."

"अरे समिधा सारखं वाचन, टीव्ही बघून कंटाळते. तिच्याबरोबर गप्पा तरी किती मारणार म्हणून आज तिला माझ्या आवडीचा एक खेळ आवडतो का विचारुया."

"कोणता खेळ?"

"गाण्याच्या भेंड्या. अंताक्षरी खेळायला आवडतं का तुला!"

"अय्या आवडतं का काय विचारता आहात. मला खूपच प्रिय खेळ आहे. मी आणि माझ्या बहिणी काम करता करता अशा भेंड्या खेळायचो कधी एखाद्या शब्द घेऊन खेळायचो तर कधी एखादा सण, रंग घेऊन खेळायचो. कधी कधी आम्ही मुला मुलींच्या नावांच्या भेंड्या पण खेळायचो. खेळता खेळता खूप आनंद पण मिळायचा आणि कामं पण पटापट होऊन जायची. चला चला आपण पण खेळूया."

"आज पहिल्याच दिवशी आपण शेवटच्या अक्षरावरूनच भेंड्या खेळूया. पहिलं गाणं काका म्हणशील का?"

काकांनी अगदी लगेचच सुरुवात केली. त्यांचा आवाज खूप छान नसला तरी बरा होता. त्यानंतर अभिरामने एक मुकेशचे "मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुनें" गाणं गायलं. त्याचा आवाज खूपच छान होता. मुकेशच्या आवाजातील दर्द त्याच्या गळ्यात जाणवत होता. समिधाने तशी त्याला पावतीही दिली.

"खूपच छान आवाज आहे तुमचा. मुकेश तुमचा आवडता सिंगर आहे का. त्याची दर्दभरी गाणी अजूनही लोकांना तितकीच प्रिय आहेत."

"हो तसं बघायला गेलं तर मला जुने सगळेच गायक प्रिय आहेत. आता तू कुठचं गाणं म्हणतेस! तुझा आवाज छानच असावा असं वाटतंय."

समिधाने "उल्जन सुलझेना" हे गाणं गायलं. तीचा आवाज पण छान होता. सध्या ती तिच्या जीवनातील उल्जन मध्येच अडकली होती. लगेच काकाला एक कल्पना सुचली.

"अभी आणि समिधा तुमच्या दोघांचेही आवाज खूप छान आहेत. मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी एक द्वंद्व गीत गाऊन दाखवा. पूर्ण गायलं पाहिजे. पाठ नसेल तर लिरिक्स मोबाईल मध्ये बघा."

अभिराम ने सुरुवात केली,

"मेरे दिल मे आज क्या है तू कहे तो मैं बता दू"

समिधाने पण त्याला सुंदर साथ दिली.

अभिरामच्या मनात आलं हे गाणं आपण म्हटलं खरं. आपण आपल्या हृदयातल्या गुजगोष्टी तिला कधी सांगू शकू का! ह्या जगावेगळ्या लग्नामुळे आपण दोन अनोळखी जीव पवित्र अशा विवाह बंधनाने बांधले गेलो आहोत. आज आपल्या मनात तरी समिधाबद्दल निखळ प्रेम भावना आहे. ती व्यक्त करण्याची संधी आपल्याला कधी मिळेल हे एक त्या देवालाच माहित.

समिधाला वाटत होतं की हे गाणं गाऊन अभिरामने अप्रत्यक्ष रित्या असं तर सांगितलं नसेल ना की त्याच्या मनात जे काही आहे ते आपल्याला चालणार असेल तर तो ते सांगेल. त्याच्या मनात आपल्याबद्दल नक्की काय भावना असतील. खरोखर आपल्याबद्दल त्याला तसं काही वाटत असेल की केवळ अडचणीत सापडलेल्या एक मुलीची मदत केल्याची भावना असेल. पण आता आपल्याला त्याच्याबद्दल खूपच आपलेपण जाणवायला लागलं आहे इतकं मात्र खरं. हा सुद्धा फक्त आपलेपणा आहे की अजून काही हे कळत नाही. समिधा विचारात गढलेली पाहून अभिरामने तिच्या चेहऱ्यापुढे हात हलवत विचारलं,

"काय मॅडम कुठे हरवलाय!"

"अहो काही नाही दोन दिवस आपण उगाच फुकट घालवले. आता मात्र रोज आपण वेगवेगळ्या प्रकारची अंताक्षरी खेळायची."

"चला नुसत्या गाण्यांनी पोट भरणार नाही. जेवून घेऊया."

(समिधा आणि अभिराम दोघं हळूहळू एकमेकांच्या जवळ येत आहेत. त्यांच्यात "मन का मनसे मिलन" होईल ना पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all