Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४७

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४७


समिधाचा पाय आता थोडा बरा झाला होता. ती घरातल्या घरात हिंडू फिरू शकत होती. दहा दिवसांनी अभिराम तिला डॉक्टर कडे घेऊन गेला होता तेव्हा डॉक्टर बोलले होते,

"आता तुम्ही घरातल्या घरात चालू शकता पण दुखऱ्या पायावर जास्त जोर देऊ नका. फिजिओथेरपी चालु ठेवा आणि दिवसातून दोन तीन वेळा पायाला बर्फाने शेका."

त्याप्रमाणे ती सर्व करत होती. दुपारी ती एकटीच बसली होती तेव्हा तिला आठवत होतं ह्या दहा दिवसांत अभिरामने तिची खूप काळजी घेतली होती. तिच्या पायाबरोबर तिच्या मनाचीही काळजी त्याने घेतली होती. कला मावशी होत्या तरी अभिराम स्वतः जातीने तिला फळं कापून घेऊन यायचा आणि आग्रह करून खायला सांगायचा. घरी आल्यावर तिच्या आजूबाजूला रहायचा. रोज अंताक्षरीमुळे तर तिच्या मनाला खूप आनंद मिळत होता. तिला प्रसन्न वाटावं म्हणून तिच्या बेड शेजारी फ्लॉवरपॉट मध्ये ठेवण्यासाठी सुंदर सुगंधी फुलं घेऊन यायचा. समिधा हे सर्व पाहून भारावून गेली होती.

एक दिवस संध्याकाळी तो थोडा लवकर आला होता. समिधाच्या चेहऱ्यावर थोडी उदासी दिसत होती. तेव्हा तो तिच्या जवळ येऊन म्हणाला,

"काय झालं. बरं वाटत नाही का!"

"नाही मी ठीक आहे."

"आई बाबांना भेटावसं वाटतंय का! जाऊया का आपण."

अभिरामने असं विचारल्यावर समिधाचे डोळे लकाकले. तिच्या मनात आलं काय लाख माणूस आहे. आपल्या मनातली आई बाबांना भेटण्याची ओढ त्यांनी कशी अचूक ओळखली. पण आपल्याला जायला जमेल ना. तसं पण गाडीने जायचं आहे. आता कधीतरी बाहेर पडायचं आहेच. आपल्याला पण अंदाज येईल कसं जमतंय ते. मग ऑफिसला पण जावं लागेल. तिने लगेच विचारलं,

"खरंच जायचं का! मला जमेल ना!"

"अगं मी आहे ना. मी तुला फुलासारखे नेईन आणि कापसासारखा घेऊन येईन. बघ तुला जरा पण त्रास होणार नाही."

त्याच्या बोलण्याने समिधा गालातल्या गालात हसली. ती लगेच तयार झाली. काका संध्याकाळचा फेरफटका मारायला निघणारच होते. त्यांना अभिरामने सांगितलं की ते दोघं समिधाच्या घरी जाऊन येतात ते. समिधा कला मावशींना म्हणाली,

"आज आम्ही आईकडे जातोय. आई काही जेवल्याशिवाय सोडणार नाही. फक्त काकांचा स्वयंपाक करून तुम्ही घरी जा."

समिधा हळू हळू चालत येऊन बिल्डिंग खाली थांबली. अभिराम तिथे गाडी घेऊन आल्यावर ती पुढे बसायला लागली. तेव्हा अभिराम म्हणाला,

"अगं तू मागच्या सीटवर पाय सरळ वर ठेवून बस म्हणजे तुला त्रास होणार नाही. नाहीतरी गाडीत आपण दोघेच आहोत."

"अहो पण मी मागे आणि तुम्ही गाडी चालवणार बरं नाही दिसणार."

"हे बघ मला कोणी तुझा ड्रायव्हर समजणार नाही आणि समजला तर समजला. आपण आपली सोय पहायची. सतत पाय खाली ठेवून तुझ्या पायाला रग लागेल म्हणून सांगतोय."

"नक्की चालेल ना! मला कसंतरी वाटतंय."

"तू बस लवकर. घरी जायचं न पटकन."

समिधा मागे पाय वर ठेवून बसल्यामुळे तिला अजिबात त्रास झाला नाही. ह्या वेळी हे दोघं अचानक आले होते त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आईला काय करू आणि काय नको असं झालं होतं. आईने काळजीयुक्त प्रेमाने विचारलं,

"आता जास्त दुखत नाही ना. खूप वेदना सहन केल्यास आता काळजी घे."

"नाही ग आई एव्हढे काही नाही."

बोलता बोलता आईने चहाबरोबर खायला गरम गरम थालीपीठ केलं जे अभिरामच्या खूपच आवडीचे होते.

"आई मला स्वप्न पडलं होतं तुम्ही आज थालीपीठ करणार म्हणून समिधाला म्हटलं आज जाऊया घरी."

"माझ्या चेहऱ्यावरची उदासी पाहून ह्यांना वाईट वाटलं म्हणून मला इथे घेऊन आले."

"आम्ही आता अभिरामaना चागलेच ओळखतो गं. तुला ते अजिबात दुःखी बघू शकत नाहीत.

"बरं आता. जेवायला काय करू?"

"अहो आई आम्ही जाऊ घरी. तुम्ही उगाच त्रास नका करू."

"व्वा असं कसं चालेल. एक तर तुम्ही किती दिवसांनी आलात."

"पटकन होईल असं काहीतरी साधेच करा."

खूप दिवसांनी भेटल्यामुळे सगळ्यांच्या गप्पांना अगदी उधाण आलं होतं. जेवण झाल्यावरसुद्धा गप्पा रंगल्या होत्या. शेवटी आईने घड्याळ पाहिलं. रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. काळजीने ती म्हणाली,

"अगं समू घड्याळ पाहिलंस का. निघा आता जास्त उशीर करू नका."

"हे काय आई तू मला जायला सांगतेस. आता मी लवकर येणारच नाही." बाबा आईची बाजू सावरून घेत म्हणाले,

"अगं आईला असं नाही म्हणायचं. तुम्हाला इथे गर्दीत रहा तरी कसं म्हणणार! तुला तरी सवय आहे पण अभिरामचे काय!"

"बाबा अगदी असंच काही नाही. मी पण इथे राहू शकतो. ते जाऊ दे तुम्हाला नक्की असं वाटतं ना की आम्ही दोघांनी कधी तरी तुमच्याबरोबर रहावं. मग एक काम करा. तुम्ही तुमचं सामान बांधायला घ्या."

समिधा सकट सगळेच अभिरामच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले.

(सामान बांधायला घ्या असं अभिराम का म्हणाला असेल पाहूया पुढील भागात)


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all