Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४८

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४८


अभिराम सामान बांधायला घ्या असं म्हणाल्यावर बाबांना कळेच ना हा अस का म्हणतोय. ते म्हणाले,

"अभिराम तू नेहमी असं काहीतरी कोड्यात बोलतोस. आमच्या सारख्यांच्या डोक्यात पटकन प्रकाश पडत नाही. जरा उलगडून सांग बाबा."

"अहो बाबा काही कोडं बिडे नाही हो. अजून मी समिधाला पण बोललो नाही. तुमच्या बरोबरच तिला पण आज कळेल. बाबा आपला इथे महिमला पण एक टू बीएचके फ्लॅट आहे. व्यवसायाला सुरुवात केल्यावर कुठेतरी पैसे गुंतवायचे म्हणून फ्लॅट घेतला. सुरुवातीचे काही वर्ष भाड्याने दिला. पण एका भाडेकरूने खूप त्रास दिला. तेव्हापासून फ्लॅट रिकामाच आहे. अधून मधून साफसफाई करून घेतो. एकदम वेल फर्निशड फ्लॅट आहे. तुम्ही सामान बांधून तिथे राहायला या."

"अहो काहीतरीच काय बोलता. आम्ही इथेच ठीक आहोत. सरिताचं म्हणा बारावी आहे नंतर नवीन ॲडमिशन होईल तिला कुठे प्रवेश घ्यायचा ते बघू. सईची तरी दोन वर्ष तीच शाळा असेल. मला रिटायर व्हायला एक महिना आहे. शिवाय हिच्या पण इथे ऑर्डर्स असतात."

"बाबा मी अगदी उद्याच शिफ्ट व्हा असं म्हणत नाही. एप्रिल मध्ये तुम्ही शिफ्ट व्हा. म्हणजे कोणालाच काही प्रॉब्लेम येणार नाही. शिवाय सायली पण आता आपल्याच फर्म मधे आहे. तिला जाणं येणं सोयीचं होईल. सरिताला बारावी नंतर कुठेही अगदी इंजिनियरिंग अथवा इतर कुठेही ॲडमिशन घ्यायचे असले तरी पैशाचा विचार करायचा नाही. तिला जवळ कुठे सोयीचं असेल तिथे ॲडमिशन घेता येईल. सईला नवीन शाळेत ॲडमिशन घेऊ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समिधाला माहेरी येणं किती सोयीचं होईल."

"मला माहितच नव्हतं तुमचा महिमला पण एक फ्लॅट आहे. खरंच आई बाबा तुम्ही या न तिकडे राहायला."

"समिधा एक चुकीची दुरुस्ती कर. आमचा फ्लॅट नाही तर तो आपला सर्वांचा फ्लॅट आहे. कळलं ना."

"अहो अभिराम इथे माझ्या घरगुती वस्तूंचे खूप गिऱ्हाईक आहेत. नवीन जागेत जम बसायला किती वेळ लागेल."

"आई मी तुम्हाला तेच सांगतोय. इतकी वर्ष तुम्ही काबाडकष्ट केले ना. मग आता आराम करायचा. मी, समिधा आम्ही सगळे आहोत ना. मोठ्या फ्लॅटमध्ये कधी आम्ही इकडे राहायला येऊ कधी तुम्ही सर्व तिकडे राहायला या. सगळे एकत्र असलो की घर कसं भरल्यासारखं वाटेल."

"अभिराम समजा आम्ही तिकडे राहायला आलो तर तू आमच्याकडून भाडं घ्यायचं एवढं मात्र नक्की."

"काय बाबा तुम्ही बोलता. मी तुम्हाला बाबा म्हणतो आणि मी माझ्या बाबांकडून भाडं घेऊ.
नरकात सुद्धा जागा मिळणार नाही मला."

"अभिराम खरच आमची गेल्या जन्मीची काय पुण्याई माहित नाही पण तुम्ही आमच्या आयुष्यात आलात. आमच्या सर्वच अडचणीतून तुम्ही आम्हाला सुखरूप बाहेर काढता."

"अभिराम हे वाक्य अगदी शंभर टक्के खरं आहे. माझ्या मनात पूर्वी एक तरी मुलगा असावा ही आस होती. माझ्या सर्वच मुली खूप हुशार आहेत त्यामुळे मुलगा असायलाच पाहिजे असं माझं मत बदलून गेलं. देवाने तेव्हा आम्हाला मुलगा दिला नाही पण आज असा सोन्यासारखा मुलगा देऊन त्याची भरपाई केली आहे."

"अभिराम मी ऐकलं होतं की काही काही माणसं खूप चांगली असतात पण तुम्ही चांगुलपणाचा कळस आहात. आमच्या घरातल्या, नाही नाही आपल्या घरातल्या प्रत्येकाला काय हवं नको ते तुम्ही अगदी जातीने लक्ष घालून बघत असता. कधी कधी माझ्या लक्षात येत नाही पण तुम्ही अगदी आठवण करून देता." आई-बाबांच्या बोलण्याला समिधाने पुष्टी दिली.

"अरे बापरे तुम्ही सगळेजण मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहात. मला अगदी देवपण बहाल करत आहात. मी फार काही करत नाहीये. अहो मला माणसांची आवड आहे. मी सुद्धा माझा स्वार्थ बघतोय. समिधाशी लग्न केल्यामुळे मला किती नवीन नाती मिळाली आहेत. हा आनंद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. आई बाबा मी जर आता पैसा खर्च केला नाही ना तर तो अक्षरशः कुजून जाईल. इतक्या वर्षांची कमाई आहे अर्थात योग्य ठिकाणी दानधर्म केला आहे मी. तरीसुद्धा आपल्याकडे खूप पैसा आहे तेव्हा तुम्ही अजिबात काळजी करायची नाही."

"आता तुमच्यापुढे आम्ही निरुत्तर आहोत."

"ठरलं तर मग. एप्रिल मध्ये चांगला मूहुर्त बघून आपण शिफ्टिंग करूया. त्याआधी मी थोडं रंगकाम, साफसफाई करून घेतो. आणि सांगायचं म्हणजे हे तुमचं राहतं घर आपण भाड्याने देऊया. तुम्हाला ते पैसे उपयोगी पडतील. काय कशी आहे कल्पना. तुम्हाला सर्वांना मान्य आहे ना. काय मुलींनो तुम्हाला चालेल ना. तुमच्या मित्र-मैत्रिणींना तुम्ही अधून मधून भेटू शकता कधी त्यांना तिकडे बोलावू शकता."

"जिजू आम्हाला मोठ्या घरात राहायला नक्कीच आवडेल. शिवाय तुम्ही दोघे पण आमच्या जास्तच जवळ याल."

समिधाचा ऊर अत्यानंदाने भरून येत होता. आई बाबांनीच नाही तर आपण पण गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून हा हिरा आपल्या जीवनरुपी कोंदणात आपण अभिमानाने मिरवत आहोत. अभिरामने सर्वांच हित लक्षात घेऊन आपलं मन जिंकण्यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. आपल्याला या दिशेने एक तरी पाऊल उचलायला हवं ना!

(समिधाच्या मनात हळूहळू अभिराम बद्दल निश्चितच काही तरल भावना फुलत होत्या. ते नक्की प्रेमच असेल ना की आणखी काही पाहूया येणाऱ्या भागांत)


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all