दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४९
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४९
समिधाच्या मनात अभिराम बद्दल हळुवार भावना निर्माण होत होत्या. म्हणतात ना सहवासाने प्रेम निर्माण होतं. तसंच काहीस तिच्या बाबतीत घडत होतं. तिला भीती वाटत होती की आपल्या ह्या सच्च्या भावनांना अभिरामने वेगळा अर्थ लावू नये. त्याला असं वाटायला नको की तो आपली आणि आपल्या कुटुंबाची इतकी काळजी घेतो म्हणून आपण उपकाराच्या भावनेने त्याचा स्वीकार करत आहोत. त्याने आपल्याशी वागताना कधीही मर्यादेचे उल्लंघन केलं नाही. त्याच्या जागी दुसरा एखादा पुरुष असता तर आता मी तुझ्याशी लग्न केलं आहे म्हणजे तुझ्यावर माझा पूर्ण हक्क आहे ह्या भावनेने तिची ईच्छा नसतानाही तिचं सर्वस्व लुटलं असतं. त्याच्या प्रति आपल्या भावना म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल वाटणारं प्रेमच आहे ना! खरं तर त्यावेळी अभिराम पुढे आला नसता तर आपलं जे झालं असतं ते झालं असतं पण आई बाबांना किती मानहानीला तोंड द्यावं लागलं असतं. खरंच देव कोणत्या ना कोणत्या रूपात येतोच.
अभिरामच्या मनात विचार येत होते ज्यावेळी आपण समिधा आणि तिच्या कुटुंबियांना नामुष्की पासून वाचवण्यासाठी तिच्याशी लग्न केलं तेव्हा आपल्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. जसजसा आपल्याला तिचा सहवास मिळतोय तसतसा तिच्याबद्दलचे प्रेम आपल्याला तीव्रतेने जाणवतं आहे. ज्यावेळी मनोजची आई आपल्या सामान्य रूपाबद्दल बोलली त्यावेळी समिधा त्वेषाने आपल्या मनाच्या मोठेपणाबद्दल बोलली. आपण पण तिच्या स्वभावाचे कंगोरे पहिले आहेत. तिच्या माहेरच्यांबद्दल तिच्या मनात सतत काळजीयुक्त विचार असतात. ते तर स्वाभाविक आहे पण ती आपल्या काकाशी, कला मावशींशी पण किती आत्मीयतेने वागते. इतकंच काय ती बँकेतल्या सहकाऱ्यांशी, कस्टमरशी पण प्रेमाने वागते.
आपल्याशी वागताना ती थोडं अंतर ठेवून वागत असली तरी तिच्या मनात आपल्याबद्दल आदर आहे. आपल्याला खात्री आहे एक न एक दिवस तिला पण आपल्याबद्दल प्रेम वाटेल. तिचं ही बरोबरच आहे तिने आपल्याकडे वेळ मागून घेतला आहे. कोणाच्याही जीवनात अशी परिस्थिती निर्माण झाली तर ती व्यक्ती भांबावूनच जाईल. नियोजित वराऐवजी दुसऱ्याच पुरुषाच्या गळ्यात वरमाला घालून त्याला आपला पती म्हणून स्वीकार करणं इतकं सोपं नाही. ते सुद्धा समिधा सारख्या सर्वगुणसंपन्न सुंदर मुलीने आपल्यासारख्या सामान्य रूपाच्या व्यक्तीशी तडजोड म्हणून का होईना लग्न करणं म्हणजे एक प्रकारे त्याग आहे. त्यावेळी तिने इतर गोष्टी गौण मानून आई बाबांच्या इज्जतीला प्राधान्य दिलं.
आता पण अभिरामने बाबांना मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला सांगितलं. खरं तर आपल्याला पण माहित नव्हतं या फ्लॅटबद्दल. अभिरामच्या मनात असणारच पण तो कदाचित योग्य वेळ येण्याची वाट पाहत असावा. खरं तर आपल्याला पण तो आपल्या कुटुंबासाठी सगळं करतोय हे पाहून थोडं ऑड वाटतंय. पण तो ऐकतच नाही. त्याच्या जीवनात आता खरा आनंद येऊ पाहतोय. आपण तो हिरावून घेऊ शकत नाही. अगदी बाळ असल्यापासून त्याने जे आयुष्य जगलं आहे ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये. अभिरामचे बाबा पण अडकले गेले. त्यांनी सुद्धा त्या पाताळयंत्री बाईसारखे वागून तिला घरातून हाकलून दिले असते तर मग तिच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक उरला नसता. देवाचा न्याय पण अजब असतो. अभिरामच्या नशिबात खूप कारस्थानी आई आली पण पित्याच प्रेम देणारा काका आला. दोघांमध्ये किती जिव्हाळा आहे. दोघेही एक दुसऱ्याचं मन जपत असतात.
एका अर्थी आई बाबा मोठ्या घरामध्ये राहायला आले तर त्यांची झोपण्याची, एकंदरीत सगळ्यांचीच गर्दीत वावरण्यापासून सुटका होईल. आपल्या बहिणींची मोठ्या घरात रहायची हौस फिटेल.
बराच उशीर झाला होता म्हणून दोघेजण घरी यायला उठले इतक्यात अभिरामला काहीतरी आठवले आणि तो सायली जवळ जाऊन त्याने तिच्या कानात काहीतरी विचारले. त्यावर उत्तर म्हणून सायलीने पण अभिरामच्या कानात काही सांगितले. ते ऐकून अभिराम उडालाच,
"काय म्हणतेस. कमालच आहे."
तो जोरात बोलल्यामुळे बाबांनी विचारलं,
"काय झालं अभिराम! काय ते आम्हाला पण सांगा."
"बाबा तुम्हाला आणि सगळ्यांना वेळ आल्यावर कळेल. आता माझं आणि सायलीचं गुपित आहे.
सायली मी तुला फोन करून सांगेन काय करायचं ते. चला बाय! आता झोपा सगळे."
सायली मी तुला फोन करून सांगेन काय करायचं ते. चला बाय! आता झोपा सगळे."
निघताना दोघेही आई बाबांच्या पाया पडले.
"सांभाळून जा. रात्रीची वेळ आहे."
(अभिरामने सायलीला काय विचारले आणि तिने सांगितल्यावर त्याला इतकं आश्चर्य का वाटलं पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा