दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ५०
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ५०
रात्री अकरा वाजता दोघं घरी आले. काका झोपले होते. दोघेजण आपल्या जागेवर झोपायला गेले. समिधाला घरचे सर्व भेटले होते त्यामुळे खूप आनंद झाला होता. त्या आनंद लहरीवर डोलत असताना तिला झोप लागली. अभिरामच्या मनात वेगळेच विचार चालले होते त्यामुळे झोपेने त्याच्याशी कट्टी घेतली होते. निघताना त्याने सायलीला समिधाचा वाढदिवस कधी असतो ते विचारलं होतं. त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण समिधाचा आणि त्याचा वाढदिवस एकाच दिवशी होता. १८ जानेवारी. पुढच्याच रविवारी तो दिवस होता. अभिरामने मनोमन ठरवलं होतं की समिधाचा वाढदिवस खूप थाटात साजरा करायचा. मुख्य म्हणजे तिच्यासाठी हे सरप्राइज ठेवायला हवं. समिधाच्या काही आवडीनिवडी त्याला कळल्या होत्या. काही गोष्टी तो सायलीला विचारणार होता. आई बाबा आणि सगळ्यांनाच त्याने सकाळीच बोलवायचं ठरवलं. यावेळी आपल्या बाबांनी उपस्थित राहायला हवं. बाबांना फोन करायला हवा. दुसऱ्या दिवशी काकाला विश्वासात घेऊन त्याने समिधाला सरप्राइज देण्याबद्दल सांगितलं. इथे सायलीने पण आईबाबांना अभिरामच्या प्लान बद्दल सांगितलं. सर्वांनाच खूप भारी वाटत होतं.
सायलीने विचार केला जिजुना ताईला सरप्राइज द्यायचं आहे तर देऊ दे. जीजू ताई साठी खूप काही करतील. ताईला जेव्हा कळेल जिजूंचा पण वाढदिवस आहे आणि तिच्याजवळ त्यांना द्यायला काहीच नसेल. अशा वेळी तिला वाईट वाटेल. आपण ताईला सांगायला हवं त्यांचा पण त्याच दिवशी वाढदिवस आहे म्हणजे ती पण त्यांच्यासाठी काहीतरी नक्कीच आणून ठेवेल. त्याप्रमाणे सायलीने समिधाला त्याबद्दल सांगितलं. अभिराम सारखाच तीलाही आश्चर्याचा धक्का बसला. तिने मनोमन निर्णय घेतला ह्या देवतुल्य माणसासाठी काहीतरी खास त्याला आवडेल असं गिफ्ट घ्यायचं. हो पण काय घ्यायचं. नीट विचारपूर्वक ठरवलं पाहिजे.
अभिराम तर आपलं मन जाणतो म्हणूनच प्रत्येक वेळी आपल्या मनातील विचार तो जाणतो. आता तिला लक्षात येत होतं दोघांचीही जन्मतारीख एकच आहे त्यामुळे कदाचित विचार प्रवाह एकच दिशेने धावत असतील.
अभिरामने समिधासाठी खूपच छान नजराणा स्वतःच्या पसंतीला खरेदी केला होता. एक नाजूक हिऱ्याची अंगठी जी समिधाने तिच्या नाजूक बोटात घातल्यानंतर त्या अंगठीचीच शोभा वाढणार होती. तसा पण त्यांचा साखरपुडा झाला नव्हता. या निमित्ताने ती भेट देता येईल. एक सुंदर गुलबक्षी रंगाची महागाची बनारसी सिल्क साडी घेतली होती.
समिधाने पण एक दिवस ऑफिसमधून लवकर निघून अभिराम साठी एक आकाशी रंगाचा महागचा शर्ट घेतला. त्याच्या सावळ्या वर्णावर तो शोभून दिसला असता. सुंदर पार्करचा पेन सेट घेतला. तिने ह्या काही दिवसात निरीक्षण केलं होतं अभिरामला वेगवेगळी पेन वापरण्याचा शौक होता. त्याच्या शर्ट च्या खिशाला रोज एखादं छान पेन लावलेलं असायचं. त्याच्याकडे खूप प्रकारच्या पेनांचा संचय होता. कुठे बाहेरगावी गेल्यावर त्याने पेन घेतलं नाही असं व्हायचं नाही.
आज अखेरीस १८ जानेवारी उजाडला. अभिरामने काका आणि बाबांच्या मदतीने रात्री समिधा झोपल्यावर हॉलमध्ये खूप देखणी सजावट केली होती. त्याचे बाबा आदल्या रात्रीच आले होते. समिधा नेहमी प्रमाणे लवकर उठली. तिचं सगळं आवरून तीने देवाला नमस्कार केला. हे वर्ष मला आणि माझ्या दोन्ही कुटुंबियांना सुखाचे, आनंदाचे, उत्तम आरोग्याचे जावो अशी प्रार्थना केली. नंतर ती बाहेर हॉल मध्ये आली आणि सगळी सजावट बघून खुश झाली. आनंद आणि आश्चर्य मिश्रित भावनेने तिने विचारलं,
"हे सर्व कुणी केलं आणि काय आहे आज!"
ती असं विचारते तोच तिच्या घरचे पण सगळे घरात प्रवेश करते झाले. सगळे एका सुरात ओरडले,
"आज तुझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस"
"हो पण इकडे कोणालाच माहिती नव्हतं मी कोणाला सांगितलं पण नाही. मग यांनी सगळी सजावट कधी केली."
"समिधा तेच माझं आणि सायलीचे त्यादिवशीचे गुपित होतं. तुला आधी कळू नये म्हणून रात्री मी, बाबा आणि काकाने ही सगळी सजावट केली आहे. तुला सरप्राइज आणि सजावट आवडली ना!"
"खूपच सुंदर. सगळं अगदी मनापासून केलेलं दिसतंय. नजरच हटत नाही आणि बरं का श्रीयुत अभिराम आज माझ्या एकटीचा वाढदिवस नाही. आज तुमचा सुद्धा वाढदिवस आहे हे मला सुद्धा कळलं आहे."
"तुला कसं कळलं आणि कोणी सांगितलं!"
"गुपित काय फक्त तुम्हालाच कळतं का? आम्हाला पण कोणीतरी सांगतच. हमारे भी जासुस चारो ओर फैले हुए है. तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"
"तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा". आई पटकन म्हणाली,
"बरं चला आता तुम्ही दोघे इकडे बसा मी औक्षण करते."
आईने दोघांचे जोडीने औक्षण केले. अभिरामने टेबलवर ठेवलेली डबी उघडून समिधाच्या हातात हिऱ्याची अंगठी आणि सुंदर साडी दिली. सर्व एकाच सुरात म्हणाले,
"अरे ती अंगठी अशी देतात का तिच्या बोटात घाल बरं."
समिधाने लाजत लाजत अभिरामच्या हातात हात दिला आणि मग त्यांनी ती अंगठी घातल्यावर सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या. समिधा पण आत मध्ये गेली आणि तिने पण अभिरामसाठी आणलेले गिफ्ट आणले. तिने त्याला तो शर्ट दिल्यावर सर्वांनी सांगितलं हा आता लगेच घालून ये. तिने त्याच्या हातात पेन सेट दिल्यावर त्याला खूपच आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला,
"हे माझं सगळ्यात आवडीचे गिफ्ट. मला कोणी महागाचे गिफ्ट दिलं तर ते एका बाजूला आणि पेन जरी स्वस्तातलं असले तरी ते एका बाजूला. तुझं गिफ्ट माझ्या आवडत्या पार्कर कंपनीचे आहे. खूपच छान आहे. बरं समिधा आपलं पोट गिफ्ट ने भरू शकेल पण ह्या सगळ्यांना आता आपण गरमागरम नाश्ता देऊया."
नाश्ता चहापाणी झाल्यावर अभिरामने एक फर्मान काढलं,
"सगळ्यांनी आता कान देऊन ऐका आता जेवण झाल्यावर थोडा आराम करून आपण सगळ्यांनी चौपाटीवर जायचं आहे."
"अरे सगळ्यांनी कशाला लग्नानंतरचा तुमचा पहिला वाढदिवस आहे तुम्ही दोघं जाऊन साजरा करा आम्ही घरी आराम करतो."
"पण आम्हाला सगळ्यांसोबत साजरा करायला जास्त आवडेल. हो की नाही समिधा आणि मावशी आज तुम्ही पण आमच्या बरोबर यायला हवं बरं का!"
"हो हो नक्कीच."
"नाही ताई आज माझी बहीण येणार आहे घरी त्यामुळे मी काम आटोपून आज घरी जाईन. बहीण जर राहणार असेल तर मी उद्या नाही आले तर चालेल का?"
"अहो मावशी एक बहीण येणार म्हणून दुसऱ्या बहिणीला किती आनंद होतो. तुम्ही विचारता काय! अगदी दोन दिवस नाही आलात तरी चालेल. थांबा काका आणि तुमच्या बहिणीसाठी थोडं काही घेऊन जा."
समिधाने लगेच त्यांना घरी न्यायला गोडधोड आणि पुऱ्या वैगेरे दिल्या. थोडे पैसे बळेच त्यांच्या हातात कोंबले. अभिराम तिच्याकडे कौतुकाने पाहत होता.
(समिधाला अभिरामवरील प्रेमाची जाणीव होईल का आणि ती त्याच्याजवळ आपलं प्रेम कधी व्यक्त करेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा