दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ५१
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ५१
संध्याकाळी उन्हं उतरल्यावर सर्व जण चौपाटीवर जायला निघाले. घरापासून चौपाटी जवळच असल्यामुळे सगळ्यांनी रमतगमत चालत जायचं ठरवलं. अभिराम आणि समिधा सर्वांच्या मागून चालत होते. चालताना नकळत अभिरामच्या हाताचा स्पर्श समिधाला झाला. दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं. आज अभिरामला समिधाच्या नजरेत वेगळेच भाव दिसत होते. समिधाच्या मनात आलं आपल्या मनातील भावना अभिराम जाणू शकेल का! आपलं प्रेम त्याला उमजेल का? कदाचित तो स्वतःहून काही बोलणार नाही कारण आपण त्याच्याकडून वेळ मागितला आहे. तो आपल्यावर मनोमन प्रेम करू लागला आहे ह्याची आपल्याला खात्री पटली आहे. आता आपण आपलं मन त्याच्याकडे मोकळं करायला हवं. नाहीतर "पहले आप, पहले आप" म्हणताना आपल्या भावना मनातच राहायला नकोत.
आधी सगळेच वाळूत बसले. थोडा वेळ हास्य विनोद झाल्यावर समिधाच्या बहिणी समुद्राच्या पाण्यात गेल्या. समिधाला त्यांनी आग्रह केला पण तिने नवीन साडीचा बहाणा करून जाणं टाळलं. नंतर समिधा आणि अभिरामला मोकळीक मिळावी म्हणून आई बाबा, अभिरामचे बाबा आणि काका वाळूत फेरफटका मारण्यास गेले. अभिराम आणि समिधा शेजारी शेजारी बसले होते. शांततेचा भंग करत अभिराम म्हणाला,
"आपल्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी हा किती सुंदर योगायोग आहे ना. समिधा आजच्या ह्या शुभदिनी मी तुला माझ्या मनातल्या भावना सांगू इच्छितो. अर्थात तुझ्याही भावना तशाच असाव्यात असं काही नाही. अगदी लग्नाच्या पहिल्याच दिवशी असं नाही पण जसजसा तुझा सहवास लाभत गेला मी तुझ्या प्रेमात पडत गेलो. आता तर मी प्रेमसागरात आकंठ बुडून गेलो आहे. खरं तर आधी मी कधीही लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं. योगायोगाने तुझ्याशी लग्न झालं. तेव्हा काही दिवसातच मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. तेव्हा कळलं प्रेम ही एक खूप अलगद उमलत जाणारी निखळ भावना आहे. एका अर्थी तूच मला प्रेमाची ओळख करून दिलीस. तू तुला हवा तेवढा वेळ घे पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे."
समिधा आताही आश्चर्यचकित झाली. तिच्या मनात आलं आपण फक्त मनातल्या भावना व्यक करायचं ठरवलं आणि ह्यानेच त्याच्या भावना व्यक्त केल्या. खरंच हा खूपच मनकवडा आहे. समिधा कौतुकाने त्याच्याकडेच पाहत होती. त्याच वेळी अभिरामने सुद्धा तिच्याकडे पाहिलं. नजरानजर होताच तिने लाजून नजर खाली वळवली. वाळूमध्ये तिने बोटाने "अभी" असं लिहिलं. अभिरामला त्याचे उत्तर मिळालं होतं. तो म्हणाला,
"तू माझं नाव लिहितेस म्हणजे मी काय समजू. नाव पूर्ण नाही का लिहिणार?"
"माझ्यासाठी तुम्ही फक्त अभीच आहात!"
"अगं मग हे तुम्हीचं अवडंबर का? मला फक्त अरे अभी म्हणत जा."
"अभी खरं सांगू का मी सुद्धा तुमच्यावर, नाही तुझ्यावर माझ्याही नकळत प्रेम करू लागले आहे. मनामध्ये सतत तुझेच विचार असतात. मला कल्पनाही नसताना मी तुझ्याबद्दल विचार करू लागले. ह्या लग्नाची फलश्रुती काय असेल असं मला नेहमी वाटायचं. ह्याच्या बरोबर आपल्याला नातं निभावता येईल का अशी मनात सतत शंका असायची. पण नाही. आता मला कळून चुकलं आहे की मी पण मनापासून तुझ्यावर प्रेम करतेय. तुझ्यात मी माझा राम पाहतेय. अर्थात ज्याच्या नावातच राम आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं!"
"समिधा हे प्रेम उपकाराच्या अथवा कृतज्ञतेच्या भावनेतून नाही आलं ना! बऱ्याच वेळा असं घडतं. कोणीतरी आपल्याला अडचणीच्या वेळी खूप मदत करतं. मग आपल्या मनात येतं ह्या व्यक्तीने आपल्यासाठी खूप काही केलं आहे. हिला आपण कधीच दुखावता कामा नये. मग ह्या उपकाराच्या भावनेला प्रेम समजलं जातं. समिधा मला तसं प्रेम नको आहे."
समिधाने त्याच्या तोंडावर हात ठेवला,
"नाही रे अभी हे खरोखर मनापासून प्रेमच आहे. उपकार आणि प्रेम भावनेत माझ्या मनात अजिबात गल्लत नाही. अर्थात हे इतक्या लवकर होईल असं मलाही वाटलं नव्हतं. आधी माझ्या मनात द्वंद्व चालायचं. हे असं आपल्याच बाबतीत का घडलं. मनोज माझ्या आयुष्यातून निघून गेला. त्यावेळी मी खूप निराश झाले होते. पहिल्या प्रेमात फसगत झाली. त्यानंतर नियोजित वराशी लग्न न होता अचानक एका दुसऱ्याच अनोळखी मुलाशी लग्न होणं, हे सगळं माझ्यासाठी खूपच अनाकलनीय होतं. मी खूप बावरून गेले होते. जे काही घडत होतं ते स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता."
"मी समजू शकतो समिधा. माझ्या मनात आलेली शंका मी बोलून दाखवली आणि तुझ्या बद्दल मला खात्री आहे तू अगदी खूप स्वच्छ मनाची आहेस. आत एक बाहेर एक असं तुझं वागणं कधीच नाही. तुझ्या सौंदर्याचा तुला जराही अभिमान नाही. खरंच तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली हे त्या देवाचे उपकारच आहेत."
"माझ्या सुद्धा याच भावना आहेत अभि. आता हे नातं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहील."
तिने त्याचा हात हातात घेतला त्यावर आपला दुसरा हात ठेवला. अभिरामने लगेचच तिच्या हातावर हात ठेवत म्हटलं,
"या अविस्मरणीय क्षणाच्या वेळी हा मावळता दिनकर पण आपल्या प्रेमाला साक्षी आहे. हा क्षण इथेच थांबावा असं वाटतंय. समिधा आता आपण महिन्यातून एकदा तरी याच ठिकाणी येऊन बसायचं. ही जागा माझ्यासाठी खूपच लकी आहे."
समिधाने त्याच्या खांद्यावर मान ठेवली. आज दोघांचाही स्पर्श प्रेमाची भाषा बोलत होता जिथे आता शब्दांची गरजच नव्हती. दोघे असेच काही वेळ बसून राहिले. आज दोघांनाही खूप शांत वाटत होतं. इतक्यात समिधाने समोरून सगळे येताना पाहिले. दोघं सावरून बसले.
(समिधा आणि अभिरामच्या जीवनात आता कोणताही अडथळा येणार नाही ना पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा