दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ५२ (अंतिम)
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ५२ (अंतिम)
सर्वजण जवळ आल्यावर सायलीने पाहिलं की समिधा आणि अभिराम दोघेही एकदम सावरून बसले आहेत. तिला खूप मजा वाटली.
"चला जीजू आता लवकर जेवायला जाऊ. पोटात कावळे ओरडायला लागलेत. हा आता तुमचं पोट प्रेमाने भरलं असेल." समिधाच्या आरक्त चेहऱ्याकडे पाहून सायली म्हणाली. समिधाने तिच्या पाठीवर एक लाडिक चापटी मारली. सगळेजण एका सुंदर रेस्टॉरंट मध्ये गेले. सगळेच खूप खुश होते. काय खायचं ह्याची अगदी जोरदार चर्चा चालली होती. सर्वांची नजर चुकवून अभिराम आणि समिधा खाणाखुणा करत होते. असं चोरून चोरून खाणाखुणानी एकमेकांशी बोलताना त्यांना एक आगळंच समाधान मिळत होतं. जेवताना काकाचे लक्ष सारखं सारखं अभिरामच्या चेहऱ्याकडे जात होतं. आज त्याच्या चेहऱ्यावर जी खुशी दिसत होती ती त्याने कधीच पाहिली नव्हती. अभिरामने फक्त काकालाच समिधाने त्याच्याकडे थोडा वेळ मागितल्याचे सांगितले होते. म्हणूनच आता काकाच्या लक्षात येत होतं की आजच्या शुभदिनी दोघांचे मनोमिलन झालेलं दिसतंय. त्याला खूपच आनंद झाला. हास्य विनोद करत सर्वांची जेवणं झाली आणि सगळ्यात शेवटी सर्वांनी आइस्क्रीम खाल्लं. काकाने दोघांना एकमेकांना आइस्क्रीम भरवायला सांगितलं. त्यानंतर काका सारं काही उमजून म्हणाला,
"अभी पुढच्या वेळेपासून आमचे लटांबर बरोबर नको तुमच्या. दोघांनीच यायचं. अरे हे क्षण खूप विशेष असतात. हे असे शाश्वत प्रेमाचे क्षण खूपच अविस्मरणीय असतात. त्याचा तजेला कायम अनुभवता येतो. हे असे प्रेम सगळ्यांच्याच नशिबात नसतं. इतर वेळी आपण सर्व एकत्र असणारच आहोत. पण हे काही फक्त तुमचे दोघांचे विशेष दिवस आहेत तेव्हा तुम्हीच ते साजरे करायला हवेत."
सगळ्यांनीच त्याला दुजोरा दिला. सायली पटकन बोलली,
"टू इज कंपनी, थ्री इज क्राउड"
अभिरामचे लक्ष काकाकडे गेलं. त्याने पाहिलं काका खूप हळवा झाला होता. बहुदा त्याला त्याच्या प्रेयसीची आठवण येत होती. काकाने अगदी तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं आणि म्हणूनच तो आजन्म ब्रह्मचारी राहिला. प्रेमात खूप ताकद असते म्हणतात ते उगाच नाही. इतक्यात सायलीने तिची मागणी केली,
"हो जीजू पण आमच्या पार्टीची स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल हा. नाहीतर तुम्ही मजा कराल आणि आम्हाला पार्टी मिस करावी लागेल."
तिच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागले.
"अरे पण आम्हाला तुमची अडचण होत नाही. हो की नाही समिधा. तुम्ही सर्व आहात म्हणून आमच्या जीवनाला अर्थ आहे. आम्हाला दोघांनाही आमच्या सभोवती आपली माणसं हवी असतात."
"अगदी खरं. आपल्या माणसांनीच घर भरलेलं असावं."
जेवण झाल्यावर समिधाची आई बाबा, बहिणी त्यांच्या घरी गेले. हे चौघे इकडे आले. सर्व आवरून सगळे जण झोपायला गेले. अभिराम आणि समिधा आपल्या रूम मध्ये आले. अभिराम मुद्दामहून खाली झोपण्याची तयारी करू लागला. त्याला समिधाची प्रतिक्रिया पहायची होती. समिधाने त्याच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं. ती गालातल्या गालात हसत म्हणाली,
"एका माणसाचा अजून माझ्या प्रेमावर विश्वास बसला नाही का! आता हा एव्हढा मोठा बेड मला खूपच मोठा वाटू लागला आहे. अभी अजून पण तुला खालीच झोपायचं आहे का?"
"एका माणसाला मी बेडवर झोपलेलं चालणार आहे का! समिधा खरंच चालेल ना!"
समिधा बेडवरून खाली उतरून आली आणि तिने त्याचा हात हातात घेतला. अभिरामने आवेगाने तिला आपल्या मिठीत घेतलं. समिधाने त्याच्या छातीवर डोक ठेवलं. हळूच नजर उचलून तिने त्याच्याकडे पाहिलं. दोघांचे श्वास एकमेकात मिसळू लागले. आज दोघांचे मनोमिलन होत होतं. हळुवार आवाजात समिधा म्हणाली,
"अभी आता माझं मन माझं राहिलं नाही. तिथे आता फक्त तू आणि तूच आहेस. माझं मन अखेर तुझं झालं. तुझं मन तू काहीही न बोलता मी जाणून घेईन. तुला मी सुखदुःखात कायम साथ देईन. तुझ्या आयुष्यात आता फक्त आणि फक्त आनंदच असेल. इतकी वर्ष सर्व सुखांपासून वंचित राहिलास आता तुला सर्व भरभरून मिळेल. माझ्याशी लग्न केल्याचा मी तुला कधीच पश्चाताप होऊ देणार नाही. बाबा आणि काकांना मी कायमच जपेन."
"समिधा आजपासून आपल्या जीवनाची नवी सुरुवात झाली आहे. आता आपल्यात माझं तुझं काहीच नसेल. त्या वेळी ते विवाह बंधन तुला जाचक वाटलं असेल पण आता तुला ते अधिकाधिक हवं हवंस कसं वाटेल ह्याकडे मी नक्कीच लक्ष देईन. आता तू खऱ्या अर्थाने माझी झालीस."
त्यानंतर दोघेही मूकपणे स्पर्शातून संवाद साधू लागले. ही आगळी वेगळी अनोखी भाषा त्यांना एकमेकांबद्दल खूप काही सांगून गेली. एकमेकांना समजून घेण्यात पहाट कधी झाली दोघांनाही कळलंच नाही. ज्यांना अकस्मात लग्न करावं लागलं ते दोन जीव आज खऱ्या अर्थाने एकमेकांचे झाले. आज उगवलेली नवी पहाट त्यांच्या सुखी जीवनाची खऱ्या अर्थाने नवी सुंदर सुरुवात होती.
समाप्त.
©️®️सीमा गंगाधरे
माझी कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच प्रतिक्रिया देऊन सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच नवीन लेखनासाठी प्रेरणा देतील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा