Login

माझेच खरे भाग १

स्वतःचा अट्टाहास वाईट असतो हे सांगणारी कथा

माझेच खरे भाग १

©® सौ.हेमा पाटील.


"हे लग्न मला मान्य नाही. ही मुलगी आपल्या घरची सून होऊ शकत नाही." आलोकचे बाबा रणजितसिंह म्हणाले.

हे ऐकून काय बोलावे हे आलोकला समजेना. स्वातीला घरी घेऊन येताना तो जरासा साशंकच होता, पण स्वातीनेच घरी येण्याचा हट्ट केला होता.

आलोकची आई मात्र गप्प होती. तिच्याकडे पाहिल्यावर तिला स्वाती आवडली आहे असे वाटले, पण तिने अवाक्षरही काढले नाही.

गेल्या दोन वर्षांपासून स्वाती व आलोक रिलेशनशिपमध्ये होते. अलिकडे स्वातीने आलोकच्या मागे लग्नासाठी लकडा लावला होता.

"ए, आपण लग्न कधी करायचे? मला तुझी अर्धांगिनी बनून तुझ्या घरी कधी एकदा येतेय असे झाले आहे." स्वाती म्हणाली.

"हो. मलाही वाटतेय लग्न लवकर व्हावे. आजच आईबाबांशी बोलतो. तूही बोल." आलोक म्हणाला.

"त्यापेक्षा तू आमच्या घरी चल माझ्यासोबत. जे काही होईल ते समोरासमोर. काहीही झाले तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. तुझा निर्णय तर बदलणार नाही ना?" स्वाती म्हणाली.

"नाही बदलणार." आलोक म्हणाला.

त्याच दिवशी दोघेही स्वातीच्या आईबाबांना भेटायला गेले. स्वातीच्या घरी आधीच कुणकुण लागली होती, त्यामुळे त्यांनी आलोकचे प्रेमाने स्वागत केले. त्या दोघांनीही लग्नाला परवानगी दिली आणि स्वातीला स्वर्ग दोन बोटे उरला. त्याच उन्मादात उद्या तुझ्या घरी जाऊया असे स्वाती म्हणाली. आलोकच्या घरी मात्र त्यांचे खूप थंड स्वागत झाले.

आलोकचे बाबा स्वभावाने कडक होते. मी म्हणेन तीच पूर्व दिशा असा त्यांचा खाक्या होता. त्यांची पत्नी अनिता व दोन मुले आलोक व अंशिता कायमच त्यांच्या म्हणण्यानुसार वागले पाहिजेत असा त्यांचा अट्टाहास होता. घरातील कुटुंबप्रमुखाचे सर्वांनी ऐकले पाहिजे, घराची शिस्त पाळली पाहिजे याचा ते अतिरेक करत. या गोष्टीचा बाकीच्यांना त्रास होतो हे त्यांच्या खिजगणतीतही नव्हते.

कुटुंब म्हटले की, चौघांची चार मते असणारच. मुले लहान होती, तोपर्यंत ठीक होते. मारुन मुटकून ऐकत. मुले मोठी झाली तरीही रणजितसिंह यांचे वागणे बदलले नाही. मुले आपल्या करड्या शिस्तीत बिघडणार नाहीत असा त्यांना फाजील आत्मविश्वास होता.

त्यांच्या मुलीने काॅलेजमध्ये असतानाच वेगळ्या जातीच्या मुलाशी पळून जाऊन लग्न केले, याचा त्यांना धक्का बसला होता. त्यामुळे आलोकवर अधिकच बंधने ते घालत. आलोक स्वातीला घेऊन घरी आला, तेव्हा खरं तर त्यांनी मनापासून होकार द्यायला हवा होता, पण त्यांचा इगो मध्ये आला. स्वाती त्यांच्याच जातीतील होती, सुस्वरुप होती. नोकरी करत होती, विशेष म्हणजे आलोकला आवडली होती. तरीही त्यांनी समोरासमोर स्वातीला नकार दिला होता.

स्वाती तिथे काहीच बोलली नाही, कारण आजवर आलोकने तिला आपल्या बाबांच्या स्वभावाबाबत काहीच सांगितले नव्हते. कुटुंबावर असणारे बाबांचे वर्चस्व तिच्या लक्षात आले.

त्यानंतर ते दोघे जेव्हा भेटले, तेव्हा आपल्याला रजिस्टर लग्न करण्याशिवाय पर्याय नाही असे आलोकने सांगितले.
बाबा लग्नाला तयार होणार नाहीत याची त्याला खात्री होती.

"आईची खूप इच्छा आहे की, मुलाच्या लग्नात मिरवावे, पण बाबा आपल्या लग्नाला तयार नाहीत. यावर रजिस्टर लग्न एवढाच पर्याय आपल्यासमोर शिल्लक आहे. लग्नानंतर आपल्याला वेगळ्या घरी राहावे लागेल, कारण त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण वागणार आहोत. ताईच्या लग्नाला सहा वर्षे झाली, पण अजूनही तिला घरी येण्याची परवानगी नाही. आई, मी तिच्या घरी बाबांना कळू न देता जातो भेटायला."

हे ऐकून स्वाती विचारात पडली.

क्रमशः

काय निर्णय घेते स्वाती? आलोक शी लग्न करायचे या निर्णयावर ती ठाम राहते? की आपला निर्णय बदलते? दोघांचे लग्न होते का? आलोक घ्या आईची लेकाच्या लग्नात मिरवण्याची इच्छा पूर्ण होते का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

0

🎭 Series Post

View all