Login

माझ्या आयुष्यातील कस्तुरी

नाते...मैत्रिपलीकडचे
कथेचे नाव:- माझ्या आयुष्यातील कस्तुरी...
विषय:- नाते मैत्रीचे
कॅटेगरी:- गोष्ट छोटी डोंगरएवढी


"हॅलो.."

"बोल गं कशी आहेस."


"ठीक."


"काय गं काय झालं? आवाज का असा येतोय तुझा?"


तेच जे नेहमी होत. मला नाही रहायचं गं आता. मी निघून जाते माझ्या मुलाला घेऊन."


"अगं थांब..असा तडकाफडकी निर्णय घेऊ नको."


"अगं मग काय करू?डोकं आपटू का दगडावर की जीव घेऊ त्याचा?"


"शांत रहा!"


"अजून?"


"हो! अजून..."


"पण का? नाही गं आता एवढी ताकद माझ्यात!"


"तू खूप स्ट्रॉंग आहेस गं राणी..अशी खचून जाऊ नकोस..त्याच्या कर्माची शिक्षा त्याला नक्की मिळेल तू फक्त शांत रहा तुझ्या पिल्लासाठी आणि स्वतःसाठी."


"म्हणूनचं अजून जिवंत आहे मी, पण तरी जीव तुटतो गं माझा. घुसमट होते माझी."


"मी समजू शकते,पण आतातयीपणा करू नको गं..आणखी त्रास होईल तुला."


"माहीत आहे मला. शरीर थकलं ना की आराम करता येतो गं.. पण मन थकलं ना की, अवसान गळून पडतं बघ!"


"तुझ्या मनाची अवस्था आणि अस्वस्थता समजते आहे मला पण तरी शांत रहा. त्याने तुला मित्रांसाठी पट्ट्याने मारलं आहे ना तर त्याला त्याची चूक लवकरचं कळेल आणि त्याला त्याच्या कर्माची फळं ही मिळतील."


"हम्मम."


"मला तुझी खूप काळजी वाटते गं! समोर असतीस तर तुला घट्ट मिठी मारली असती आणि तुला रडून मोकळं होऊ दिलं असतं. नको गं अशी घुसमटत राहुस खूप त्रास होईल."


"माहीत आहे गं.. पण मग काय करू?"


"त्या बाळकृष्णवर विश्वास ठेव तो सगळं काही व्यवस्थित करेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट... तू स्वतःला जप,स्वतःकडे लक्ष दे, छान आनंदी रहा आणि सगळ्यात मुख्य.. स्वतःसाठी लढ. शिक्षण पूर्ण कर आणि स्वतःच्या पायावर उभी रहा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याच्याकडे जाऊ नकोस. तुझी किंमत त्याला कळुदे. तू तुझं स्वतःच अस्तित्व निर्माण कर आणि तू ते करू शकतेस कारण एवढं सामर्थ्य आहेत तुझ्यात फक्त इमोशनल होऊ नकोस राणी."


"हो, नक्कीचं! यापुढे मी स्वतःचा विचार इतरांच्या आधी करेन आणि दुसऱ्यांच्या आधी मी माझी किंमत शून्य करेन कारण ज्यांना शून्य म्हणजे भोपळा वाटतो त्यांना शून्याची किंमत किती आहे हे मी दाखवून देईन. नेहमी शेवटी लागणाऱ्या शून्यामुळे आधीच्या अंकाची किंमत वाढते हे मी दाखवून देईन आणि हे ज्या दिवशी होईल त्यादिवशी सगळ्यात आधी तुला सांगेन."


"हो नक्की.."


"माझी एक इच्छा आहे. छोटं का होईना पण स्वतःच घर घ्यायचं आहे. ज्याच्या दारावर माझ्या नावाची पाटी असेल.मला माहित आहे स्वप्न फार मोठं आहे पण अशक्य नाही.प्रत्येकवेळी मला घरातून निघ म्हणून धमकी देत असतो तो म्हणून मला स्वतःच घर घ्यायचं आहे."


"Yes thats the spirit अशीच हवी तू मला आणि मी असेन तुझ्या सोबत. फार नाही देऊ शकले तरी माझी साथ, शब्द कायम राहतील तुझ्या सोबत.तुझं घर झालं ना तर सगळ्यात जास्त आनंद मलाचं होईल. सेविंग कर आणि त्याच्याकडून घराचं काम करून घे.त्याला समजून घेतलंस एवढं पण काही उपयोग नाही, आता त्याचा उपयोग करून घे. काहीतरी करून स्वतः चं इन्कम असायला हवं असं काहीतरी बघ. स्त्री म्हणजे खेळणं नाही. खेळून झालं की टाकून द्यायला."


"हो, मी आता नाही रडत बसणार आणि सहनही करणारा नाही." शेवटी तिने डोळे पुसले आणि तिला थँक्स म्हणून फोन ठेऊन दिला.

समाप्त......


सगळ्यांच्या आयुष्यात तुझ्यासारखी निस्वार्थ प्रेम करणारी मैत्रीण असावी. कधीच एकमेकांना न बघता सुद्धा अतूट विश्वास असणारी. प्रेमाने समजावून तर कधी दटावून सांगणारी. अस करू नको नाहीतर मार खाशील बघ अस मॅसेज मध्ये लिहिणारी तर कधी मला तुझी खूप काळजी वाटते म्हणणारी. खळखळून हसणारी तर कधी श्रीरंगाच्या चारोळ्यांमध्ये रंगणारी. तुझ्यासारखी कस्तुरी सगळ्यांच्या आयुष्यात असावी.

हे खास शब्द फक्त माझ्या जिवलग मैत्रिणीसाठी निशा थोरे(अनुप्रिया)