Login

माझ्या सुखाची परिभाषा

A Poem, Which Is Trying To Explain Real Happiness.
शीर्षक= माझ्या सुखाची परिभाषा
विषय= सुखाची परिभााषा
राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी 2


मज सुखाच्या परिभाषेचा अर्थ वेगळा सांगू नको
माणुसकीला फासेल काळीमा इतका स्वार्थी वागू नको
मानव देह तुला मिळाला माती त्याची करू नको
दुसऱ्यांसाठी जगणाऱ्यांना ,अमरत्व मिळाले विसरू नको...!

प्रश्न पडे मना काय आहे देण्या जगा माझ्या झोळीमध्ये ?
तुटकी माळ स्वप्नमोत्यांची का ओवण्याचे सामर्थ्य धाग्यामध्ये ?
किती लपल्या वेदना एका एका आरोळीमध्ये
पण दुरीतांचे अश्रू धरण्याची आहे आशा ओंजळीमध्ये...!

वृद्धांच्या ओल्या डोळ्यांमध्ये किती लपले पावसाळे
मायेच्या पदराविना अनाथांचे कसे कटतील उन्हाळे
किती वेदना छताविना आयुष्य उनाड सहाऱ्यांविना
मग आश्रमांच्या भिंतीपुढे ठेंगणी वाटतात आभाळे...!

कुणा चिंता प्रसिद्धीची कुणा उद्याच्या भाकरीची
भविष्याच्या चिंतेपोटी किती आज आयुष्य संपवती
चित्र विदारक दुनियेचे हळहळ पेटवून जाई
छोटे स्वतःचे दुःख वाटे विचारांची नदी वेगळी वाही...!

पाहून सारे दाटे डोळ्यांमध्ये जगण्याची अलबेली आशा
काहीतरी द्यावे जगा मनाची भोळीभाळी भाषा
विश्वास मज निश्चयाच्या काजव्यांनी पळते दूर निराशा
थोडे इतरांसाठी खर्ची व्हावे ,हीच माझ्या सुखाची परिभाषा...!