माझी कमाई माझीच..भाग १

घराच्या उघड्या दरवाजाकडे, ओसाड नजरेने बघत तिने गाडी काढली आणि गाडी घराच्या दिशेने निघाली
माझी कमाई माझीच...
भाग १

-©®शुभांगी मस्के...

"एवढं शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, ते हाच दिवस बघण्यासाठी." तुझ्या नवऱ्याच्या पगारातले पैसे नाही मागत आहोत, कळलं का?" "तुझ्याच कमाईचे पैसे, त्यावर आमचा काहीच हक्क नाही का?"

"खूप आधुनिकीकरणाचे तुणतुणे गाते ना तुमची पिढी. आमचे विचार तुम्हाला जुनाट, बुरसटलेले, भेदभाव करणारे वाटतात."

"मुलीचं, लग्न झालं म्हणून काय.. मायबापाची, भावंडांची जबाबदारी तिच्या लेखी संपून जाते काय?" वृंदाताई चिडल्या होत्या.

"बघताय ना, मुलगा मुलगी भेदभाव, तुम्ही कधीच केला नाही. म्हणायचात, माझी आदु माझा अभिमान आहे, माझा गुरुर, गर्व केवढा तुम्हाला तिचा."

"आणि आता लग्नानंतर वर्ष दोन वर्षात बघा कसं तुझ माझं करायला लागलीय, मर्यादा आहेत असं म्हणतेय"......

"आपल्या लग्नानंतर वर्षभऱ्यात अदितीचा जन्म झाला. आपल्याला मुलगी झाली तेव्हा, तुमच्या आईने मलाच सर्वस्वी जबाबदार ठरवलं. या ना त्या कारणावरून सतत बोलायच्या त्या मला. सगळं दुःख एकटीने पचवलीत मी."

"घराण्याला वंश, हवा होता त्यांना, हिच्या जन्मानंतर आपल्याला बाळ होतच नव्हतं. किती ते टोमणे ऐकावे लागले, या गोष्टीचा, स्वतःला किती त्रास करवून घेतला होता मी."

"एक दिवस, तुम्हीच मला समजावलं, पिढ्या पिढ्यांमधला फरक तो, विचार वेगळे असतीलच..  आपल्याला मुलगी आहे ना! घराण्याचं नाव तर ती ही मोठ करूच शकते. मुलगा मुलगी आपल्या हाती थोडीच काही असतं, सगळी देवाची मर्जी."

"आपण आपल्या मुलीला खूप प्रेम द्यायचं, तिला घडवायचं, उत्तमोत्तम शिक्षण द्यायचं, योग्य पालनपोषण करून संस्कारक्षम बनवायचं. मग बघ तिचं आपल्या कुटुंबाचं नाव रोशन करेल, एक दिवस तुला पण तिचा अभिमान वाटेल."

"अहो, बघताय ना! तुमची तिच आदू... आज काय म्हणतेय, स्वतःच्या सख्ख्या भावासाठी, पैसे नाहीत तिच्याजवळ."

"बर झालं लवकर गेलात, आजचा दिवस बघून केवळ दुःखच झालं असतं तुम्हाला."

"आई आई गं, आई गं"... कडकड वाजणाऱ्या गुडघ्यांवर हात ठेवत वृंदाताई उभ्या झाल्या.

"ऐकताय ना, तुमच्या याच पोरीच्या शिक्षणासाठी,  लग्नात माझ्या वडिलांनी तुम्हाला वाहिलेला, दिड तोळ्यांचा गोफ अन् अंगठी, माझ्या विरोधात जावून मोडली होतीत तुम्ही."

"आज तेच दोन सव्वा दोन तोळे सोन असते तर असे आपल्या संकेतसाठी, तुमच्या या लेकीपुढे, हात पसरायची वेळ आली नसती माझ्यावर."... "सोनं गहाण ठेवलं असतं नाहीतर विकलं असतं, माझ्या पोराची तेवढी वेळ निभावून नेली असती."

"आज लाखात कमावते तुमची पोर, पण आमच्या काय कामाचा तिचा पैसा." डोळ्यातले आसवं पदराने पुसत, वृंदाताई त्यांच्या यजमानांच्या, म्हणजेच अदितीच्या वडिलांच्या, हार घातलेल्या फोटोकडे बघत, ओसंडून वाहणाऱ्या डोळ्यातल्या अश्रूंचा पूर पदराच्या स्वाधीन करत बोलत होत्या.


"हळू गं आई, किती वेळा सांगितलंय डॉक्टरांनी, खाली  बसत जावू नका म्हणून, उठताना हात देत तिने आईला बसायला खुर्ची दिली. नको मला ती खुर्ची, नकोच ती तुझी काळजीवाहू नाटकं!" वृंदाताई जोरात चिडल्या.

"आई अगं, काय बोलतेस तू? रडतेस काय अशी?" डॉक्टरांकडे गेलो होतो ना आपण, औषधंही सुरू आहेत, उद्या आणून देणारच होते औषध मी... तुझा फोन आला आणि तडकाफडकी निघून आले, म्हणून राहिलं आणायचं."

"सगळ्यापेक्षा आता सध्या, तुझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन जास्ती महत्वाचं नाही का? ते सोडून हे नव्या बिझनेसच काय मध्येच?"

"शांत हो.. शांत हो बरं तू पहिले?" 

"आई अगं! तुझी जबाबदारी नाकारलीय का मी कधी?औषधपाणी, दवाखाना, हवं नको ते सगळं बघतेच ना मी. लग्न झालंय माझं आता. मला ही काही मर्यादा आहेत की नाही. उठसूठ नाही गं निघून येता येत." अदिती शांतपणे बोलत होती.

"मला ही समजून घे ना थोडं."  बोलता बोलता, आईचे कटू बोल आठवून अदितीच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं.


"कुठे आहेस ग?" मोबाईलवर मिहिरच्या, व्हॉट्सअप मेसेजचं नोटिफिकेशन चमकलं.  आज लवकरच घरी जायचं होतं तिला, चटकन आठवलं.

तिने कुर्त्याच्या बाहीने अलगद डोळ्यातलं पाणी पुसलं. आईच्या पाठी उभी राहून, "शांत हो, शांत हो"... म्हणत ती आईच्या खांद्याला थोपटत राहिली.

"आई अगं, संकेत सध्या नोकरी करतोय ना. चांगली आहे की त्याची नोकरी. मध्येच असं, बिझनेस करायचा म्हणतोय, त्यासाठी भांडवल कुठून आणणार आपण."

"महत्वाचं म्हणजे, संकेत पटकन कुणाच्या ही बोलण्याने हुरळून जाणारा.".. " मित्रांच्या हो मध्ये हो मिळवणारा"

"समज नाही त्याला तेवढी"

"सुरवातीला, सांगितलं ते मुकाट्याने ऐकून घ्यायचा पण आता त्याला आपलं ही ऐकायचं नसतं, माझं तर नाहीच नाही."... "आजकाल मी सांगितलेल्या गोष्टी तर त्याला पटतच नाही."... "म्हणतो तू पळवाटा शोधतेस", "आता अजून काय करायला हवंय सांग बर मी"

"पण, तुझ ऐकेल तो, एकदा सांगून तरी बघ!" शेवटी पैशाचा प्रश्न आहे, त्याच्या भविष्याचा ही तर आहेच आहे, तो पेलू शकेल का व्यवसायाचा डोलारा, सक्षम आहे का तो या वयात"... अदिती आईला समजावत होती.

वृंदाताईंनी सटकन खांदे झटकले. दोन्ही हाताने अदितीचे हात बाजूला केले. "असू दे... असू दे अपेक्षाच सोडलीय मी"....

वृंदा ताईंनी, आल्यापासून नजरभर अदितीला बघितलं सुद्धा नव्हतं. फक्त पैशाच्या विषयावरून चर्चा झाली होती.

"बघते कसं जमतं ते!" म्हणत अदितीने टेबलवरची बॅग उचलली आणि घरी जायला निघाली.

पोर्चमधली चप्पल तिने पायात सरकवली, तोच गेटमधून संकेत येताना दिसला..

"ताई अगं कधी आलीस? मला कॉल का नाही केला?"

" मी आलो असतो ना लवकर," चौकात कट्ट्यावर तर बसलो होतो मित्रांसोबत.

" थोड नव्या बिझनेस संदर्भात बोलायचं होतं"

"आहे वेळ, तुला" संकेत बोलत होता.

"निघाली मी आता,"

"वेळ काढून येते, एक दोन दिवसात, जमलं तर उद्याच" आणि अदिती जायला निघाली.

"आणि संकेत अरे, जरा सिरीयस हो आयुष्याबद्दल, असा उडानदडपेपणा करून भविष्य घडवता येत नसतं रे बाळा."

"मित्रांसोबत टवाळकिपणा करत कट्ट्यावर तासनतास बसून राहतोस",

"वेळेचा सदुपयोग करायला शिक रे जरा, गेलेली वेळ परतून येत नाही बरं, पैशा इतकाचं आपला वेळ ही अनमोल असतो रे बाळा "

"Distance learning ने एम.बी.ए करणार होतास तू, त्याच काय झालं? फीस च्या पैशासाठी फोन केलास, नंतर तुझा काहीच फोन नाही त्या संदर्भात."

"सुट्टी होती का तुला आज?"

"मन लावून काम करतो आहेस ना कंपनीत?"

" आपलं काम बोलतं बर का?" अदिती शांतपणे समजावत होती.

"आल्या आल्या पाजलेसच ना उपदेशांचे डोस."

"लहान राहिलो का मी आता",  तणतणतच संकेतने पायातली चप्पल शूज स्टँडच्या दिशेनं भिरकावली आणि घाईघाईतच घरात निघून गेला.

"बाळा, लहान राहिला नाहीस म्हणूनच तर काळजी वाटतेय रे" अदिती पाठमोऱ्या संकेतकडे बघत पुटपुटली.

माहेराहून घरी जाताना, पुन्हा कधी येशील विचारणार किंवा हात हलवून बाय करणार, माझ्या माहेरी कुणीच नाही.

उघड्या दरवाजाकडे, ओसाड नजरेने बघत.. अदितीने गाडी काढली आणि घराच्या दिशेने निघाली.

क्रमशः

🎭 Series Post

View all