माझी कमाई माझीच..भाग २

पोटातलं बाळ मुलगा की मुलगी यापेक्षा, बाळ सुदृढ, व्यवस्थित असणं जास्ती महत्वाचं नाही का?
माझी कमाई माझीच
भाग २

-©®शुभांगी मस्के...

वृंदाताई आणि राजेशराव यांची अदिती मुलगी तर संकेत मुलगा. राजेश प्रायव्हेट कंपनीत कामाला तर वृंदा गृहिणी.

लग्नानंतर वर्षभरात पाळणा हलला आणि अदितीचा जन्म झाला.  एकाला दोन हवेतच आणि वृंदाला अदितीच्या पाठीवर पुन्हा दिवस राहिले.

छोट्या अदितीच्या मागे पळताना, पाय घसरून पडल्याच निमित्त झालं आणि अपघाताने वृंदाला पोटातलं बाळ गमावावं लागलं.

बाळ गेल्याच दुःख वृंदाला झालंच होतं.

"आई..आई" करत अदिती आईजवळ घुटमळत होती, तोच वृंदा अदितीवर जोरात डाफरली.
" दूर हो माझ्यापासून, तुझ्यामुळे झालंय सगळं."

दुसऱ्याच क्षणी वृंदाची आई बोलली.. कशाला एव्हढा गळा काढतेस त्या पोरीवर? जे झालं ते झालं, मी तर म्हणते बरंच झालं. वर्षभरात पुन्हा कुस उजवते की नाही बघ तुझी." यावेळी मात्र, मुलगाच व्हायला हवा बर का."

"पोरी काय शेवटी दुसऱ्याच धन. आता मात्र मुलगाच हवा." वाक्यावर जोर देत वृंदाची आई बोलत होती. सासूबाईच बोलणं ऐकून, राजेशचा संताप संताप झाला होता. त्यांच्या मानसिकतेची किव आली होती त्याला. पण हॉस्पिटलमध्ये उगाच कशाला, म्हणून तो गप्प बसला.

वृंदाची परिस्थिती नाजूक होती. मुलगी का असेना, पण जगात येण्याच्या आधीच आपल्या रक्तमासाने सिंचन केलेलं बाळ आपल्यातून असं निघून जाणं दुःखदायक होत. आई म्हणून वृंदाला आणि  बाबा म्हणून राजेशलाही खूप दुःख झालं होतं.

"मुलगी म्हणजे दुसऱ्याच धन" सासूबाईंच्या तोंडचे शब्द त्याच्या कानात गुंजन करत होते.

छोट्या अदितीला, दोन्ही हातात त्याने घट्ट कवटाळून घेतलं. तिच्या गोबऱ्या गालांना ओंजळीत घेऊन, तिला किती तरी वेळ कुरवाळत होता तो. त्याने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकले, तशी छोटी अदिती बाबांना बिलगली.

ओंजळीतली वाळू निसटावी तसे दिवस निसटत होते. एक एक दिवस करता करता, एक तप उलटून गेलं होतं. अदिती आता बारा वर्षाची झाली होती.

मुलगा नसल्याचं अधुरेपण, वृंदाताई बोलून दाखवत नसल्या तरी, वागण्या बोलण्यातून आणि अनेकदा अदितीवरच्या रागातून त्या व्यक्त करत होत्या.

बारा वर्षात त्यांनी मुलगा व्हावा म्हणून, किती मंदिरांच्या पायऱ्या झिजवल्या असतील त्यांनाच ठाऊक. उपास-तापास, देवाला नवस, व्रत वैकल्ये करून थकल्या होत्या. एवढ्या वर्षानंतर तर उमेदही विरत चालली होती.

अचानक, एक दिवस त्यांचा महिना टळला. पुन्हा एकदा आई होण्याची चाहूल लागली, आनंदाला पारावार नव्हता.

यावेळी आपल्याला मुलगाच हवा त्यासाठी मंत्र,जप.. पुन्हा त्यांची उपास तापास पूजापाठ सुरू झाली.

"अगं हे दिवस आहेत का उपासतापास करायचे. चांगलं खात पित जा, डॉक्टरांनी पण तेच सांगितलंय ना?" उपास तापास, व्रत वैकल्ये आणि तेही कशासाठी तर मुलगा हवाय म्हणून!"

"पोटातलं बाळ मुलगा की मुलगी त्यापेक्षा,  बाळ सुदृढ, व्यवस्थित असणं जास्ती गरजेचं नाही का?" 

"ज्या देवीला तू नवस बोललीस ना वृंदा, ती पण एक स्त्री आहे; हे तू विसरू नकोस," राजेश सांगून थकला होता.

अखेर, प्रार्थना फळाला आली आणि वृंदाने एका मुलाला जन्म दिला. खूप उत्साहात बाळाचं नाव संकेत ठेवलं. एकीकडे संकेतच्या बाललीलामध्ये वृंदा रमली होती तर दुसरीकडे अदिती एका नव्या पडावावर, कौमार्याच्या उंबरठयावर होती. तिच्या शरीरात होणाऱ्या बदलाने एक दिवस अचानक कौल दिला. अदिती मोठी झाली होती.

अदिती अभ्यासात हुशार होती. स्वतःचा अभ्यास स्वतः करायची. घरात ओली बाळंतीण आई आणि तिरस्कारिक नजरेने बघणारी, सोहळ ओवळ पाळणारी आजी. बिचाऱ्या अदितीची घुसमट होत होती.

आता या वेळी अदितीला, आईची जास्ती गरज होती. आईने आपल्याला समजून घ्यावं, मनातला गोंधळ दूर करावा. संकेतला जशी ती कुशीत घेऊन झोपते तसं तिने आपल्याही डोक्यावरून मायेने हात फिरवावा. जवळ घेऊन, समजावून सांगावं.

"तू आता मोठी झालीस," वारंवार आठवण करून देत तिच्या राहण्या, खाण्या, वागण्या, बोलण्यावर मात्र मर्यादा आणल्या होत्या. जबाबदार आणि कर्तव्याची जाणीव शब्दोशब्दी करून दिल्या जात होती.

अदिती जास्तीच शांत शांत, एकटी एकटी, अलिप्त राहायला लागली होती. वृंदाला तर तिच्यात चुकाच चुका दिसायला लागल्या होत्या.

"पोट्टी मोठी झाली, कामापुरता शिकवा आणि अठराची झाली की लावून द्या लग्न. जावई बापू, तुमची पाहिली प्रायव्हेट नोकरी  पेन्शन पण नाही तुम्हाला. पोरगी म्हणजे शेवटी दुसऱ्याच धन. तिच्यावर तुम्ही केलेला खर्च तुमच्या काही कामाचा नाही. डोक्यावर पाणी पडलंच आहे तर उजवून टाका चांगलं स्थळ पाहून दोन चार वर्षात. उद्या हे पोरगंच तुमचं भविष्य असणार."

"हीच तुमच्या म्हातारपणाची काठी", म्हणत आजीने संकेत वरून फिरवून, कपाळावर नेत कडकड बोटं मोडली.

बारावी झाल्या झाल्या, आजीने अदितीसाठी, ओळखीतलंच एक स्थळ सुचवलं.

"माझी अदिती हुशार आहे. चांगली शिकून सवरून मोठी झाली की नंतरच तिचं लग्न लावून देईल."

"मी समर्थ आहे तिच्या भल्या बुऱ्याच विचार करायला. तिची काळजी करायची गरज नाही; समजावून सांग तुझ्या आईला." राजेशने वृंदाला निक्षून सांगितलं.

संकेत झाल्यापासून वृंदाचा ओढा, संकेतच्या बाजूने झुकत गेला होता. रात्रंदिवस त्याच्या पालनपोषणात तिने स्वतःला व्यस्त करवून घेतल होतं.

अदिती मात्र आईच्या एका स्पर्शासाठी तरसून जायची.  राजेश आपल्या परीने अदितीला खूप जपायचा पण तिच्या वयाच्या या टप्प्यावर वृंदाची जास्ती गरज आहे, या गोष्टीची त्याला ही जाणीव होती. अनेकदा समजावूनही वृंदा मात्र कळतं पण वळत नाही, असाच व्यवहार ठेवायची.


🎭 Series Post

View all