माझी कमाई माझीच..भाग३

आईचे टोमणे अदितीच्या काळजावर घाव करायचे जणू, आणि तिची इच्छाशक्ती अधिकाधिक प्रबळ होत होती
माझी कमाई माझीच
भाग ३

-©®शुभांगी मस्के...

छोट्या संकेतच्या, बाललीलांमध्ये अदिती आपलं बालपण शोधून घेत होती. बहीण होता होता आईच झाली होती त्याची.

आदिती अभ्यासाला महत्व देणारी होती. संकेत मोठा होत होता. शाळेत जायला लागला तेव्हा, बाबांनी संकेतच्या अभ्यासाची जबाबदारी अदितीवर सोपवली.

अभ्यासात सातत्य आणि मन लावून अभ्यास करणाऱ्या अदितीला, संकेतची अभ्यासातली हयगय खपत नव्हती. संकेतला अभ्यासाचा खूप कंटाळा यायचा. अदिती अभ्यासावरून संकेतला ओरडायची तेव्हा वृंदा त्याच्या चुका पाठीशी घालायची.

संकेतने मन लावून अभ्यास करावा, अदितीला जसे परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळतात तसे संकेतला मिळावे, वृंदाला पण वाटायचं पण अदितीने त्याचा अभ्यास घेणे म्हणजे त्याच्यावर हुकूमत गाजवण्यासारखं, तिचं महत्व वाढवण्यासारखं वाटायचं. कमी मार्क्स मिळाल्याचं खापर मात्र अदितीवर फुटत होतं.

एक आई आपल्या पोटच्या दोन मुलांमध्ये, दुजाभाव करू शकते, हा प्रश्न अनुत्तरीतच होता. आईच्या प्रेमासाठी पारखं राहिलेल्या अदितीचा मात्र आईवर प्रचंड जीव होता.

पोटात बाळ असताना आईला होणारा त्रास तिने अगदी जवळून बघितला होता. एक आई जन्म देते तेव्हा तिला कोणत्या दिव्यातून जावे लागते, या गोष्टीची तिला जाणीव होती.

स्त्रियांमध्ये होणारे बदल, मूड स्विंग्ज, हार्मोन्सचं असंतुलन, त्यातून होणारी चिडचिड आणि वयाच्या उतारवयात वाट्याला आलेलं मातृत्व, त्यातून बाळाचं संगोपन करताना तिला साधर्म्य साधता येतं नसावं.

आईच्या मानसिकतेचा ती सतत विचार करत राहायची त्यामुळे जसजशी ती मोठी होत गेली तसतशी तिची आईवडिलांवरची आस्था अधिकच प्रगल्भ होत होती.

अदितीचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. एम.ए. झाल्या झाल्या तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेचे महागडे क्लासेस लावण्यासाठी सोनं विकावं लागलं. तेव्हापासून वृंदा अदितीवर अजूनच जास्ती चिडायची.

"आज अशी म्हणतेयस पण उद्या नोकरी लागली की बघ कशी तूच माझी अदिती, माझी अदिती करशील." राजेश हसण्यावारी नेत.

"हो, नोकरी लागल्यानंतर तीच जशी काही आपल्याला मरेपर्यंत पोसणार आहे. तिला काय नोकरी लागेल आणि जाईल सासरी निघून. जिच्या शिक्षणासाठी एवढ्या खस्ता खाताय तुम्ही, शेवटी दुसऱ्याच धन आहे विसरु नका." आईचे टोमणे अदितीच्या काळजावर घाव करायचे जणू आणि तिची इच्छाशक्ती अधिकाधिक प्रबळ होत होती.

अखेर, अदितीच्या प्रयत्नांना यश आले. तिला सरकारी चांगल्या पदावर नोकरी लागली.

आयुष्य हे क्षणभंगुर असतं ते मान्य करावं लागतं. एक दिवस राजेशच्या छातीत दुखण्याच निमित्त झालं. अचानक हार्टअटॅकच निदान आणि राजेशची मोठी सर्जरी करावी लागली.

"आपल्या जीवात जीव असेपर्यंत अदितीचे आपल्या समोर हात पिवळे झाले असते तर बरं झालं असतं. मी शांतपणे डोळे मिटले असते. तर दुसरीकडे, आता माझ्यानंतर संकेतचं कसं व्हायचं?' या विचाराने राजेशच मन आतल्या आत पोखरत चाललं होतं.

"बाळा मला माहिती आहे, तू संकेत आणि तूझ्या आईची काळजी घेशीलच, त्यांची जबाबदारी पेलायला तू एकटी समर्थ आहेस. माझा विश्वास आहे तू त्यांना एकटं सोडणार नाहीस पण तुझ्या आईच्या अतिलाडाने वाया गेलेला संकेत त्याच्या भविष्य घडवण्याच्या त्यांच्या  निर्णयात तू त्याची साथ मात्र नक्की दे."

"त्याच्यासाठी काय चांगलं काय वाईट हे त्याच्यापेक्षा तुला जास्ती कळणार, हे माहिती आहे मला. मात्र अनेकदा तुला, तटस्थपणे काही निर्णय घ्यावे लागतील, ते तू घे. स्वतःचं नुकसान होऊ देऊ नको. स्वार्थी आहे बाळा हे जग. मढयावरचं लोणीही वितळून खातील एवढं स्वार्थी."

"बाळा, माझ्याजवळ वेळ कमी आहे, तुला सौभाग्य अलंकारात दागदागिन्यात मढलेलं बघायचं राहूनच गेलं. याच दोन हातांनी तुझं कन्यादान करून तुला सासरी पाठवायच होतं मला."
तुला नवरी झालेलं बघायच होतं." बाबांची केविलवाणी नजर खूप आशेने अदितीकडे बघत होती.

त्यांचे लांब लांब श्वास तिच्या उत्तराची जणू वाट बघत होते.

"हो बाबा, तुमची सगळी स्वप्न मी पूर्ण करेन. तुम्ही माझ्या पाठीशी सदैव उभे होतात मी संकेतच्या पाठीशी नेहमी असेन."
आईची काळजी घेईन."

अदितीचे शब्द ऐकले, त्यांनी हाताला पकडुन ठेवलेली मूठ  सैल झाली आणि त्याच क्षणी त्यांनी समाधानाने डोळे मिटले.

होती नव्हती, सगळी जमापुंजी राजेशच्या उपचारात खर्च झाली होती. अदितीच्या पगारावर आता घर चालत होतं. संकेतचं शिक्षण सुरुच होतं.

अदिती दिसायला सुंदर लोभस होती, शांत आणि सात्विकतेचं तेज होतं तिच्या चेहऱ्यावर, त्यामुळे ती आता अजूनच सुंदर दिसत होती.

सरकारी नोकरी त्यामुळे बरेच पाहुणे येत आणि होकारही कळवत. काही ना काही कारणावरून वृंदा मात्र प्रत्येक आलेल्या पाहुण्यांमध्ये खुसपट शोधून काढायची. तोडीस तोड असलेले निरोपही परतून लावायची. आता हे नेहमीचच झालं होतं.

अदिती फक्त पैसे कमावण्याची मशीन झाली होती. होता नव्हता पैसा वृंदाने, म्हातारपणाची सोय म्हणून, आपल्या नावावर ठेवला होता. घरचा आणि संकेतच्या शिक्षणाचा सगळा भार एकटी अदिती उचलत होती.

शिक्षण संपवून, संकेत स्थिरस्थावर होण्याची जणू ती वाट बघत होती.

🎭 Series Post

View all