माझी कमाई माझीच..भाग ४

आजकाल तिला एकटेपणा खायला उठायचा. आयुष्यात आलेल्या एकाकीपणाने ती खचत चालली होती
माझी कमाई माझीच
भाग ४

-©®शुभांगी मस्के...

अदितीच्या बरोबरीच्या, तिच्या सर्व मैत्रिणींची लग्न झाली होती. सगळ्याच आपापल्या संसारात रमल्या होत्या.

अदितीने ही आता पस्तीशी पूर्ण केली होती. संकेतही कॉमर्स पदवीधर होऊन एका चांगल्या प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरीला लागला होता.

आजकाल तिला एकटेपणा खायला उठायचा. आयुष्यात आलेल्या एकाकीपणाने ती खचत चालली होती. एकटेपणाने मन आतल्या आत पोखरत होतं.

आपल्याही आयुष्यात आपलं म्हणून घेणारं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं, आपल्या खूप जवळच कुणीतरी, आपली दखल घेणारं, हवं नको ते बघणारं असावं असं अदितीला वाटायला लागलं होतं. अशातच, तिच्याच ऑफिसमध्ये बदली करुनी आलेल्या मिहिरशी मनाचे तार कधी जुळले तिचं तिलाच कळलं नाही.

वयाच्या या टप्प्यावर लग्न, संसार, विचार मागे पडला असताना दोघांनाही आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, या गोष्टीची जाणीव झाली. सुरवातीला वृंदाताईंनी थोडा आक्षेप दर्शवला पण, लग्नाची पोर तरी किती दिवस घरात ठेवणार.

उद्या संकेतचंही लग्न करावं लागेल, त्याला ही त्याचा संसार असेन मग उगाच हीची लुडबूड नको. स्वतःला समजावत त्यांनी लग्नाला संमती दिली.

माझ्या आईची आणि भावाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्या प्रती कर्तव्यातून माझी सुटका नाही. अदितीने घरच्या परिस्थीतीपासून मिहिरला अनभिज्ञ ठेवलं नव्हतं. मिहिरलाही याविषयी काहीच आक्षेप नव्हता.

अखेर, दोन्ही कुटुंबाच्या संमतीने मिहिर आणि अदिती लग्न बंधनात बांधल्या गेले.

"आज मला नवरीच्या रुपात बघून बाबा तुम्हाला किती आनंद झाला असता."बाबांच्या फोटोकडे बघून, अदितीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं.

माहेरचा उंबरठा ओलांडून अदिती सासरी आली. सासरच्या जबाबदाऱ्या पेलताना अदिती आई आणि संकेतकडे पण लक्ष देत होती.

अदितीचं लग्न झालं होतं तरी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आपण तुझ्यावर अवलंबून आहोत, या गोष्टीची वृंदाताई वारंवार जाणीव करून देत होत्याच.

सुरवातीला, मिहिरच्या आईवडिलांनीही अदितीला समजून घेतलं. वडिलांची बाईक असताना, संकेतला आता महागडी बाईक हवी होती. त्याचा पगार तर त्याच्या शान शौकावर, उंची उंची ब्रँडेड महागड्या वस्तू खरेदी करण्यातच संपत होता.

अखेर हट्टाला पेटलेल्या संकेतला स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन अदितीने त्याला बाईक घेऊन दिली. तेव्हापासून मात्र, मिहिर छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष घालत होता. अधूनमधून खर्चासाठी दोघांमध्ये खटके उडायला लागले.

घराच्या रिनोवेशनसाठी कर्ज काढून आता हिरीहिरीने मिहिरने घराचा सगळा खर्च अदितीवर ढकलला. अदितीचं पैशाचं नियोजन पूर्णपणे डगमगलं होतं. पैशाचं नियोजन करताना तिची पुरेवाट लागत होती.

त्यातच आता संकेतने नोकरी सोडून नव्या व्यवसायात पैशाची गुंतवणक करण्यासाठी अदितीला पैसे मागितले. गुंतवणुकीची रक्कम खूप मोठी होती, त्याचसाठी अदिती आज तिच्या माहेरी, आईला भेटायला गेली होती.

पण वृंदाताई काहीच समजून घ्यायला तयार नव्हत्या. तिने समजावून सांगण्याच्या जागेवर त्यांनीच तिला दोन गोष्टी शिवाय ऐकवल्या होत्या.

आईला कोणत्या शब्दात समजावून सांगावं तिला कळत नव्हतं. संकेतही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. अदितीची चिडचिड झाली.

सासूबाईंनी सकाळी ऑफिसला निघताना, वाण सामानाची यादी दिली होती. आठवणीने सामान घेऊन ये निक्षून सांगितल होतं, तिला आठवलं. खरं तर तिला मुळीच दुकानात जायची इच्छा नव्हती,  पण उगाच घरी गेल्यावर दोन शब्द  ऐकून घेण्यापेक्षा तिने गाडी सुपर शॉपीकडे वळवली.

आवश्यक ते सगळं सामान घेऊन झालं होतं. तिचा घसा कोरडा पडला होता. माहेरी घरी गेल्यावर आईने साधं पाण्यासाठी पण तिला विचारलं नव्हतं.

"अपेक्षा आणि आपल्याच माणसांकडून, परकं का आहे ते घर?  घाईघाईने मीच गेले आणि हॉलमध्ये आईशी बोलत बसले. बोलणं काय? वाद म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि आले तशीच गेल्या पावली निघून. स्वयंपाक घरात जावून दोन घोट पाणीसुद्धा पिलं नाही." तिच्या मनात विचार सुरू होते.

शुध्द ताकाचा छोटा रीफील पॅक तिने सामानात टाकला. बिल करणाऱ्या दादाला बिलात जोडायला सांगून उभ्या उभ्याच तिने ताक घटाघटा पिऊन टाकलं. तिला खूप शांत वाटत होतं.

लग्न झाल्यापासून सासू सासऱ्यांच्या औषधाची जबाबदारी मिहिरने अदितीवर सोपवली. तिने ती हसत हसत स्वीकारली होती.

फार्मसीतून तिने सासूसासऱ्यांची औषधं घेतली. पर्सच्या आतल्या बाजूला असलेल्या खाण्यात जपून ठेवलेली आईच्या औषधाची चिठ्ठीची तिने घडी उघडली.

"पुढच्या महिन्यात appoinment आहे डॉक्टरांकडे. आईला घेऊन जावं लागेल." तिने आईसाठी महिन्याभर पुरेल एवढं औषध खरेदी केलं.

उद्या मिहिरचा वाढदिवस, त्यासाठी तिने छान सरप्राइज प्लॅन केलं होतं.  त्याला आवडतो त्याच ब्रँडचा महागडा शर्ट तिने खरेदी केला.आवडत्या ब्रँडचं परफ्यूमही घेतलं.

संकेतला वेगवेगळ्या महागड्या परफ्यूमचा भारी शौक. छानसा एक परफ्यूम तिने संकेतसाठी पण निवडला.

ऑफिसला जाताना तिने मिहिरचे कपडे प्रेस करायला टाकले होते. ते तिने कलेक्ट केले. तसा तिचा फोन वाजला.

"कुठे आहेस? केव्हाची निघालीस ऑफिसमधून आणि मी घरी आलो तरी तुझा पत्ता नाही." मिहिरने विचारलं.

"येतेच आहे, थोडं बाहेर काम होतं. त्यासाठी लवकर निघाले." तिने मिहिरला सांगितलं.

"येताना छान गरमागरम समोसे घेऊन ये कोपऱ्यावरच्या हॉटेल मधून. गरमागरम तेलात समोसे छान पोहत होते. आताच आलो ना मी तिथून. किती दिवस झाले गरमागरम समोसे खाल्ले नाही." मिहिरने फर्मान सोडलं, तिने फक्तच होकारार्थी मान डोलवत, हो म्हणत फोन ठेवला.

"आत्ताच ऑफिसमधून घरी गेलात, खायची इच्छा होती तर तुम्ही नेऊ शकलाच असता, पण नाही." ती मनातल्या मनात पुटपुटली.

"आजकाल मी आईकडे गेली की उगाच चिडचिड करतात हे. राहू दे त्यापेक्षा आज निमित्त आहे शॉपिंगचं तर सांगतेच माहेरी गेल्याचं,." ती स्वतःशिच पुटपुटली.

"एवढं काय काम असतं माहेरी?" एकीकडे नवरा, सासू सासरे माहेरच्या नावाने खार खातात. तर दुसरीकडे, लग्न झाल्यावर मुलींच्याही जबाबदाऱ्या बदलतात. माहेरचे  समजून घेत नाहीत. समतोल राखणं किती अशक्य आहे हे एका मुलीसाठी. आपल्याला कुणीच समजून घेऊ नये?" विचारांच द्वंद्व अदितीच्या मनात सुरू होतं.

लग्न झाल्यावर मुलीचं, माहेर परकं का होतं? तिचं मन उत्तराच्या शोधात घराकडे निघालं.
क्रमशः