माझी कमाई माझीच..भाग५ (अंतिम)

ही आपली खरी कमाई, आपल्या नात्याला खरं अर्थ देणारी. मिहिरच्या बोलण्यावर अदिती गोड लाजली.
माझी कमाई माझीच
भाग ५

-©®शुभांगी मस्के...


अदितीने आणलेल्या गरमागरम समोस्यावर सर्वांनीच मस्त ताव मारला. रूममध्ये ठेवलेल्या बॅग्जकडे बघत मिहिरने अदितीला विचारलं, "काय ग  काय आणलस एवढं? काय खरेदी केलीस एवढी?

"साड्या बिड्या आणल्या की काय? उगाच पैसा खर्च करत जावू नकोस बरं. आजकाल तुमच्या लोकांना काय तो छंदच लागलाय खरेदीचा." सासूबाईंनी चार गोष्टी अधिक सूनवल्या.

अदितीने आणलेल्या बॅग्ज  पटापट रिकाम्या केल्या.

"हा शर्ट तुमच्यासाठी आणलाय." अदितीने शर्ट मिहिरच्या हाती दिला.

"घालून बघा साइज बरोबर आहे का? बिल आहेच, काही कमी जास्ती असेल तर परत करता येईल."

"Wow, माझं आवडतं परफ्यूम पण." त्याने परफ्यूमच्या बॉटलचं झाकण काढून नाकाला लावलं.

"हे एक कुणासाठी?" मिहिरने विचारलं.

"संकेतसाठी.. त्याला खूप आवडतात परफ्यूम्स ठार वेडा आहे तो. परफ्यूमची अंघोळ तेवढी करत नाही म्हणून मिळवलं. अदिती संकेत विषयी खूप उत्साहाने बोलत होती.

"म्हणजे, भावासाठी पण शॉपिंग झाली तर." त्याने डोळ्यांना ताण देत विचारलं.

"नाही हो! परफ्यूम आवडलं म्हणून घेतलं."अदितीने सांगितलं..

संकेतसाठी आणलेलं परफ्यूम आणि आईची औषध तिने एका वेगळ्या बॅगमध्ये ठेवली.

सासुसासऱ्यांची औषधं तिने त्यांच्या सुपूर्द केली.

"अगं, काही तरी जबाबदारी घेऊ देत जा तुझ्या भावाला. आज जबाबदारी घेणार नाही तर मग कधी उचलेल तो कुटुंबाची जबाबदारी?"

"लहान आहे का तो आता. आईच्या औषधाचा खर्च निदान तो पगारातून करूच शकतो ना. असं स्पून फीडींग करत राहशील तर तो स्वतःच्या हाताने खायला कधी शिकेल?"

"मान्य.. तू तूझ्या आईची जबाबदारी स्वीकारलीय पण म्हणून का..?" मिहिर बोलता बोलता थांबला. मिहिर चिडून बोलतोय की काळजीपोटी? अदितीला काहीच कळत नव्हतं.

"आता काय, उद्या माहेरचा दौरा काय? नाही म्हणजे हक्काची सुट्टी पण आणि या वस्तूंच्या निर्यातीचं निमित्त पण." मिहिरने टोमणा मारलाच.

"अगं! अदिती बिलात ताकाचे पैसे लावलेत पण सामानात ताकाच पॅकेट नाही गं?" सासूबाई खूप मोठं नुकसान झाल्याच्या आविर्भावात रूममध्ये आल्या.

"हो आई, तहान लागली होती खूप."

ताक पिल्याचं तिने सांगितलं तेव्हा, " हो का!" म्हणत तोंडाचा मोठा आSS फाडत त्या बाहेर निघून गेल्या. 

दुसऱ्या दिवशी हळूच तिने माहेरी जायचा विषय काढला. संकेतच्या प्लॅनविषयी मिहिरला सांगितलं.

"संकेत जोवर मला विश्वास देणार नाही, तोपर्यंत मी त्याला मदत करणार नाही." कशाची लपवाछपवी न करता सगळं मीहिरला तिने स्पष्टच सांगून टाकलं.

"येताय का सोबत तुम्ही?" अदितीने मिहिरला विचारलं. तोही सोबत जायला तयार झाला.

घरी गेल्यावर पुन्हा आई आणि संकेतने बिझनेसचा विषय छेडला. पुन्हा तेच बोलणं झालं. जबाबदारी पासून पळवाट वगैरेचे ताशेरे अदितीच्या दिशेने ओढल्या गेले. कर्तव्य आणि जबाबदारीची पुन्हा एकदा जाणीव करून दिल्या गेली.

"हे बघ संकेत, आजकाल बिझनेससाठी बँका कर्ज देतात. तुझा प्लॅन तू तयार ठेव. त्या दृष्टीने तू सखोल अभ्यास कर. घाईघाईने कोणताच निर्णय न घेता अभ्यासपूर्वक परिस्थितीत हाताळायला हवी.  महत्वाचं म्हणजे, हा बिझनेस तू तूझ्या स्वबळावर उभा करावास याहून मोठा आनंद नसेन माझ्यासाठी."

"संकेत, मी निदान आता तरी, तुला काहीच मदत करू शकणार नाही. कारण यावर्षी आईच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया माझ्या दृष्टीने जास्ती महत्वाची वाटते मला. कोणत्या गोष्टीला आपण प्राधान्य द्यावं? हे आपणच ठरवायला हवं नाही का?"

संकेत तावातावात निघून गेला होता.

वृंदाताईंच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया त्यांच्या दृष्टीने खूप गरजेची होती.

संकेत कितीही नव्या बिझनेससाठी उत्साही असला तरी, व्यवहारातले डावपेच त्याला कळत नाही. हे वृंदाताईंना चांगलंच माहिती होतं. त्यामुळे त्याने नोकरीच करावी, हाताशी असलेली नोकरी सोडू नये. काटकसर करावी, उधळपट्टी करू नये,  वृंदाताईंना मनोमन वाटत होतं.

आदिती जो काही निर्णय घेईल तो संकेतच्या हिताचा असेल. एक जबाबदार, हुशार, भावाला जीव लावणारी, भावावर आईच्या मायेनं प्रेम करणारी, बहीण पाठीशी उभी असल्यावर चिंता नाही. वृंदाताई बोलून दाखवत नसल्या तरी अदितीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत.

सगळी सोंगं घेता येतात मात्र पैशाचं सोंग घेता येत नाही. हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं.

"बरं बोललीस. असंच स्पष्ट बोलायला हवं. प्राउड ऑफ यू डियर." म्हणत मिहिरने अदितीची पाठ थोपटली.

आज मिहिरचा वाढदिवस होता. तिने छान केक घेतला. मिहिर आणि अदिती घरी जायला निघाले..

"मिहिर, तुम्ही घरासाठी कर्ज काढलंत, हिरीहिरिने संपूर्ण घराचा खर्च माझ्यावर सोपवलात. पण यापुढे आपण सगळा घरखर्च वाटून घेऊ.माझी कमाई माझीच असायला हवी. ती कधी? कशी?आणि कुणासाठी खर्च करावी? हाही निर्णय माझाच असायला हवा. कारण, माझ्या कामाचे पैसे असतात ते. मान्य करता ना तुम्ही?" 

तिने मिहिरला स्पष्टच सांगितलं त्यानेही होकारार्थी मन डोलावली.

"जबाबदरीची जाणीव ठेऊन, आपापली कर्तव्य निभावून आता आपल्याला आपल्यासाठी थोडे पैसे बाजूला काढायला हवेत." म्हणतच तिने पर्समधून दोन गुलाबी रेषा स्पष्ट उमटलेली प्रेंग्नेंसी किट मिहिरसमोर धरली.

"खरं की काय.?" अदितीने होकारार्थी मान डोलावली.

"माझी कमाई माझीच, पण "ही आपली खरी कमाई, आपल्या नात्याला अर्थ देणारी." मिहिरच्या बोलण्यावर अदिती गोड लाजली.

ही कमाई, ही नवी सुरुवात. नव्या निर्णयाची रुजवात होती जणू.

(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पात्रांच्या स्वभावाचे विविध पैलू, कथेच्या रंजकतेचा भागच. मतेमातांतर असूच शकते. कथा आवडल्यास लाईक आणि कमेंट करून अवश्य कळवा. धन्यवाद?