Login

माझी मानवी...भाग ६३

तिचे अपॉइंटमेंट लेटर बघून राहुल जरा नाराज झाला. पण आशेचा एक किरण त्याला दिसला. कारण मानवी ला नवी

राहुल मात्र त्याच्या बोलण्यावर विचार करत होता. "हा असा का बोलला असेल? मानवीलाच भेटा म्हणजे काय? काय विचित्र माणूस आहे. काय बोलतो त्याचा साधा संदर्भ देखील लागतं नाही."

राहुल विचारात होतं तेव्हाच त्याला मानवी च्या मेसेज नोटिफिकेशन दिसले आणि त्याने पटकन फोन मधील मेसेज वाचण्यासाठी फोन बघितला.

"सर एक तासाने भेटायला जमेल का?"

"ठिक आहे. मी तुला घ्यायला येतो."

"नको तुम्ही ठिकाण सांगा मी येते तिथे."

"ठिक आहे. आपल्या ऑफिस च्या जवळ एक कॉफी शॉप आहे तिथे भेटूया?"

"चालेल मी एक तासाने येते."

मानवी च्या मेसेज का रिप्लाय देऊन राहुल डोळे बंद करून बसला. तिला कसे फेस करू आता? पण करावं तर लागेल. चूक आपली आहे तर बोलावं लागेल. ह्याचं विचारात तो ताडकन उठला आणि ऑफिस मधून निघून गेला 

रविचे मात्र त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष होते. 

*****

मॅनेजमेंटच्या सरांच्या ओळखीमुळे आणि मानवी च्या हुशरिमुळे इंटरव्ह्यू छान झाला आणि तिला लगेच अपॉइंटमेंट लेटर मिळाले सुद्धा. पगार जरा कमी होता पण नोकरी मिळाली ह्याचा आनंद होता. तिने लगेच तिच्या मॅनेमेंटच्या सरांना कॉल केला 

"सर तुमचे खूप खूप धन्यवाद. इंटरव्ह्यू नुकताच झाला आणि नोकरी पण मिळाली. आता तुमची पार्टी नक्की."

"अभिनंदन. नोकरी तुलाच मिळणार होती कारण तू किती मेहनती आहेस ह्याची कल्पना त्याला मी दिली होती. आणि तू हुशार तर आहेसच. आता छान मन लावून काम कर."

दोघांनी बोलून फोन ठेवला तोच तिला स्नेहल चा फोन आला.

"हा बायको झाला का इंटरव्ह्यू?"

"हो नुकताच झाला तुलाच कॉल करणार होते आता."

"अरे वाह. आवाजावरून कळतंय की नोकरी मिळाली तुला."

"बरोबर ओळखलं. मिळाली नोकरी. मी खूप खूष आहे. पण..."

"आता पण काय?"

"स्टार्ट उप कंपनी आहे त्यामुळे अजून दोन महिने आहेत जॉईन करायला."

"चिल बायको. आता महत्त्वाचं आहे की नोकरी मिळाली. चल मी येते तुला घ्यायला. आज मला काम कमी आहे. मस्त सेलिब्रेट करू आज आपण."

"नाही आता नको संध्याकाळी भेटू आपण. मी त्या खडूस राहुल ला भेटणार आहे आता. तुला कालच सांगणार होते पण राहुल नाव ऐकून तुला वाईट वाटेल म्हणून बोलले नाही काही."

"पण आता का भेटणार आहेस तू त्याला?"स्नेहल मनातून जरा विचलित झाली.

"त्याला काही काम आहे. काल त्याचा मसेज होता तसा."

"मग तू त्याला सगळं सांगणार आहेस का?" स्नेहल चा आवाज जरा खोल गेला होता.

"नाही. तो काय म्हणतो ते ऐकायचे आहे फक्त मला. तो जे वागला त्या नंतर त्याला काहीही सांगण्यात मला काही रुची नाही."

"ठिक आहे. संध्याकाळी भेटू." म्हणत स्नेहलने फोन ठेवला. मानवी राहुल ला भेटणार आहे. हे ऐकल्यावर तिच्या मनात एक वादळ उठत होते. ती अस्वस्थ होत होती. काहीतरी विचार करून तिने राहुल ला फोन करायचे ठरवले. तिने राहुल ला फोन लावला पण रिंग जायच्या आत लगेच कट केला. 

******

राहुल आधीच त्या कॅफे मध्ये जाऊन बसला होता. तो तिथे एक कॉर्नर चा टेबल बघून तिथे जाऊन बसला. जिथून त्याला मानवी येताना लगेच दिसेल अशी जागा त्याने निवडली. तिथे बसल्यावर त्याने एक मेसेज केला.

मानवी आल्यावर तिच्याशी काय काय बोलायचे ह्याचा विचार तो करत होता. 

थोड्यावेळात मानवी तिथे आहे. हातात डॉक्युमेंट्स ची फाईल, क्रीम कलर चा कुर्ता आणि ब्राऊन कलर ची लेगिन घालून मानवी कॅफे च्या दिशेने येताना त्याला दिसली. त्याने लगेच शर्ट व्यवस्थित केला. मानवी कॅफे च्या डोअर मधून आत येत होती तितक्यात राहुल चा फोन वाजला.

आता कोण फोन करत आहे म्हणून त्याने जरा वैतागून फोन कडे बघितले तर तिथे मानवी म्हणजे स्नेहल त्याला फोन करता होती. पण त्याने आज तिचा फोन कट केला. तोपर्यंत मानवी तिचे कुरळे केस हातानेच नीट करत त्याच्या समोर येऊन उभी राहिली. 

त्याने हातानेच तिला बसण्याचा इशारा केला. दोघे देखील एक मेकांची नजर चोरत बसले होते. 

थोड्यावेळाने राहुल ने मानवी समोर तिची डायरी ठेवली. 

"ही तुझी डायरी आहे ना? ह्यात जे कन्सेप्ट आहे ते मला ह्या वर्षाच्या फेस मॅगझिन साठी योग्य वाटतात. पण तुझ्या परवानगी शिवाय मी हे वापरू शकत नाही."

"इतकचं ना? ठिक आहे. माझी काही हरकत नाही. तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली तर तुम्ही वापरू शकता." मानवी ने अगदी सहज डायरी मधील कन्सेप्ट वापरण्यासाठी परवानगी दिली.

"आय आय सॉरी." राहुल हळूच मानवी कडे बघत म्हणाल. तशी तिची एक भुवई उंच झाली. तिची प्रतिक्रिया बघून राहुल तिला परत एकदा सॉरी म्हणाला.

"सर. त्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही ही कन्सेप्ट वापरू शकता." मानवी डायरी राहुलच्या समोर सरकवत बोलली.

तितक्यात वेटर दोन कॉफी घेऊन आला. 

"मानवी. त्या दिवशी मी जरा जास्तच रागावलो. असं करायला नको होतं मी. तू परत ये कंपनी मध्ये. "

"नाही सर. आता परत नाही येणार. हे बघा मला दुसरी नोकरी मिळाली आहे."मानवी राहुलला तिचे अपॉइंटमेंट लेटर देत बोलली.

तिचे अपॉइंटमेंट लेटर बघून राहुल जरा नाराज झाला. पण आशेचा एक किरण त्याला दिसला. कारण मानवी ला नवी नोकरी जॉईन करण्यासाठी अजून दोन महिने होते. त्याने पटकन फोन उचलला आणि परत एक मेसेज केला.

"मानवी मला खरंच तुझ्यासोबत काम करायला आवडेल. झालं ते विसरून तू परत ये. मी परत तुझी माफी मागतो." राहुल मानवी कडे बघून बोलत होता.

"सर आता हे सगळं बोलण्यात काही अर्थ राहिला नाही. तुम्ही ही कन्सेप्ट वापरा. मी त्याचे सगळे अधिकार तुम्हाला देते. आणि सांगणार देखील नाही कोणाला की ही माझी कन्सेप्ट आहे. त्यामुळे आता मी येते." असं म्हणत मानवी जायला म्हणून उठली. मागे फिरून जायला निघणार तोच तिच्या समोर फेस चा संपूर्ण स्टाफ उभा होता. 

"विजय सर, सीमा मॅम, रिया, रवी सर तुम्ही सगळे इथे?" मानवी आश्चर्याने बघत बोलली.

"मीच बोलवलं त्यांना इथे. तू परत यायला तयार होणार नाहीस हे मला माहीत होतं. म्हणून बोलवलं सगळ्यांना. माझं नाही कमीत कमी त्यांचं तरी ऐकशील."

"मानवी परत ये ना. तू नाही तर किती काम करावं लागतंय माल." रिया मानवी चा हात पकडत बोलली.

"तू नाहीतर कोणाला त्रास देणार मी." रवी राहुल कडे बघत मानवी ला बोलला.

"दी ये ना परत." विशाल

"मानवी आता तर राहुल सरांनी माफी पण मागितली आहे. आता इतका भाव खाणं बरं नाही. " सीमा मॅम मानवी च्या खांद्यावर हात ठेवत बोलल्या.

"तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतं आहेत मला. पण मला नोकरी मिळाली आहे. आणि तिथे माझ्यासाठी कोणी शब्द टाकला असताना त्यांना नाही सांगणं मला पटत नाही." मानवी सगळ्यांकडे बघत बोलली.

"पण अजून दोन महिने आहेत तुला जॉईन करायला. तो पर्यंत तरी ये." राहुल एकदम बोलला.

"मानवी सध्या तुझी गरज आहे टीमला. मॅगझिन पब्लिशिंग साठी अजून फक्त दोन महिने आहेत." सीमा मॅम

क्रमशः

काय असेल मानवी चा निर्णय? ती परत जाईल का? बघुया पुढील भागात.

प्रिय वाचक मित्रांनो. माझी मानवी आपल्या सगळ्यांचीच खूप आवडती कथा आहे. ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि मी लिहिलेल्या पहिल्याच भागाला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आणि छान छान कमेंट करून मला प्रोत्साहन दिले ह्या बद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमच्या मुळे ही कथा पुढे लिहिण्याचा मला हुरूप आला आणि हिम्मत देखील. सुभाषिनी मॅडम इतकी छान लेखिका मी नाही. त्यात त्याची लोकप्रिय कथा पूर्ण करण्याचे काम खरंच अवघड आहे. तरी त्याची कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे काही चुकल्यास सांभाळून घ्या.

सुभाषिनीच्या आठवणीत