अगर तुम साथ हो.. भाग २
मागील भागात आपण पाहिले की काव्या रितेशला लग्नाचा आग्रह करते. आता बघू पुढे काय होते ते.
"काव्या.. त्या रितेशमध्ये तू असं बघितलंस तरी काय? तुझ्याकडे बघ आणि त्याच्याकडे बघ. तुझं शिक्षण, तुझं रूप.." श्रीकांतराव चिडले होते.
"बाबा, कोणाला रूपावरून बोलू नये असं तुम्हीच म्हणता ना? आणि एवढाही काही तो दिसायला वाईट नाही."
"अगं पण त्याची जात वेगळी, आपली वेगळी." कुंदाताई मध्ये बोलल्या.
"आई, प्रेम असं जातपात बघून होतं का?"
"काव्या, मी जास्त नाही बोलू इच्छित. तुझा निर्णय ठरलाच आहे असं धरून चालतो. पण एक सांगावसं वाटतं, मी त्याच्याशी बोललो आहे." आदित्य बोलू लागला. "मला तो थोडा स्वार्थी वाटतो."
"दादा, तू फक्त एकदादोनदा बोलला असशील. पण मी ओळखते त्याला. आणि स्वार्थी कोण नसतं रे.." काव्या रितेशची बाजू घेऊन बोलू लागली.
"त्याला अजून नोकरी नाही." आदित्य पुढे म्हणाला.
"आज नाहीतर उद्या लागेल. नक्की बघा.. तो कुठच्या कुठे जाईल. माझा विश्वास आहे त्याच्यावर." काव्या बोलत होती.
"काय बोलू यावर?" श्रीकांतराव वैतागले होते.
"काही नको.. फक्त मला आशीर्वाद द्या. मला माहिती आहे तुमच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. आता त्या पूर्ण होत नसतील पण तरीही विश्वास ठेवा मी हे सतीचे वाण पेलून दाखवेनच." काव्या हात जोडून म्हणाली.
"तू नाटकात जायला हवं होतंस किंवा राजकारणात. गोड बोलून आपलं बोलणं समोरच्याच्या डोक्यात कसं घुसवायचं हे छान जमतं तुला." श्रीकांतराव वैतागून म्हणाले.
"बाबा, म्हणजे तुमची परवानगी आहे?" काव्याचा विश्वास बसत नव्हता.
"त्याच्यावर नाही..पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्या विश्वासापोटीच तुला परवानगी देतो आहे. आणि तसंही काही गोष्टी भविष्यावर सोडायच्या असतात. मी आता जबरदस्तीने तुझे माझ्या दृष्टीने योग्य अश्या ठिकाणी लग्न लावून दिले आणि परिस्थिती बदलली तर तो अपराधीपणा आयुष्यभर खात राहिल मला. त्यापेक्षा तू आणि तुझं नशीब." श्रीकांतराव म्हणाले.
"आई, दादा.."
"हेच हो म्हणाले तर माझं काय धरून बसतेस? मला काय माझी लेक सुखात असली म्हणजे झालं." कुंदाताई म्हणाल्या.
"आई..." काव्या आईच्या गळ्यात पडली.
"त्यातल्या त्यात एक सुख असेल आई तुला.. एक फोन केलास की लेक हजर." आदित्य काव्याला चिडवत म्हणाला. काव्याला यावर काहीच बोलायचे नव्हते. तिच्या घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली हेच तिच्यासाठी महत्वाचे होते.
"रितेश.. असा काय पाठी लागतोस लग्नासाठी?" स्मिताताई वैतागल्या होत्या.
"आई, तू तरी समजून घे ना.." रितेश आईला मस्का मारत म्हणाला.
"समजून काय घेऊ टोणग्या.. अजून नोकरीचा पत्ता नाही आणि चालला लग्न करायला." स्मिताताई नाक मुरडत म्हणाल्या.
"आई, तिच्या घरातले तिचं लग्न लावून देतील. प्लिज ना.."
"तुला ना घाई झाली आहे लग्नाची. बाबांना समजले तर मलाच बोलतील. तुला पण पोसायचं आणि तुझ्या बायकोला पण?"
"आई, तिला नोकरी आहे. मीसुद्धा काम बघतो आहेच ना? आम्हाला दोघांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचे आहे. तिचं लग्न दुसर्या कोणाशी झालं ना तर मी जीव देईन.. सांगून ठेवतो."
"आला मोठा जीव देणारा.. साधं बोट कापलेलं चालत नाही. मी कानावर घालते तुझ्या बाबांच्या. मग तू जाणे आणि ते जाणे. खरं सांगायचं तर त्यांच्यापेक्षाही मला जावईबापूंचं जास्त टेन्शन आलं आहे. ते काय म्हणतील?" स्मिताताई बोलत होत्या.
"आई, माझ्या लग्नाशी त्यांचा काय संबंध? आपण बोलतो का कधी त्यांच्यामध्ये?" रितेश चिडला होता.
"तसं नाही रे.. पण ते पडले जावई. त्यांचा मान मोठा."
"मग कधी आले नाहीत माझ्या मदतीला धावून? मनात आणलं असतं तर चार ठिकाणी शब्द टाकू शकले असते माझ्यासाठी. पण नाही. सतत 'तुमचं तुम्ही बघा.' बघितलं आहे म्हणावं माझं मी. आता गरज नाही त्यांनी मध्ये बोलायची."
"रितेश, असं बोलतात का?"
"ते जेव्हा मला बोलतात, तेव्हा का नाही तू विचारत त्यांना. आणि त्यांच्यासाठी तू माझ्या लग्नाला नाही म्हणालीस तर मी हे घर सोडून जाईन." रितेश निर्धाराने म्हणाला.
"नको डोक्यात राख घालून घेऊस. मी बोलते बाबांशी."
"ऐकलं आहे मी सगळं. दमडी कमवायची लायकी नाही. आणि लग्न करायचे आहे." माधवराव म्हणाले
"तुम्हाला पसंत नसेल तर मग मी वेगळं राहीन." रितेशने आज बोलायचे असा निश्चयच केला होता.
"नाही हं.. अजिबात वेगळं रहायचं नाही. तुम्हीपण कशाला ताणून धरता? तसंही आपल्यानंतर सगळं याचेच तर आहे. करू दे लग्न. काहीजणांचं भाग्य लग्नानंतर उजळतं. याचंही असेल तसंच." स्मिताताई मध्ये पडत म्हणाल्या.
"तुम्हा दोघांशी बोलण्यात काही अर्थ आहे का? घाला गोंधळ. पण माझ्याकडून कसलीच काहीही अपेक्षा ठेवू नका." माधवराव तिथून निघून गेले.
जबरदस्ती का होईना दोघांच्याही घरातून लग्नासाठी परवानगी तर मिळाली. आता बघू पुढे काय होते ते. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा