Login

माझीच मी

आयुष्य मन भरून जगा. दु:खावरही हसता आलं पाहिजे.
स्वत:बद्दल काय लिहू हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. मला माझ्याबद्दल लिहायला खरचं सुचत नाही. लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास कधी आनंद तर कधी दु:ख देणारा होता. मागे वळून पाहिले, तर खूप काही कमावलं, असं वाटतं असताना हातून काहीतरी सुटून गेलं.

मी चौथीला असताना माझे बाबा मला गावी शिकायला घेऊन गेले. मी लहानपणापासून गावी आजोळी आजी - बाबांकडे लाडात वाढलेली. लहान असल्यामुळे सगळे माझेच लाड करायचे. त्यावेळी आई - पप्पा मुंबईला होते. चौथी ते सातवीपर्यंतच माझं शिक्षण गावी झालं. शाळा लांब असल्यामुळे मी मुंबईला शिक्षणासाठी आले.

गावचं शिक्षण आणि मुंबईचं शिक्षण यात खूप फरक आहे, हे मला गावावरून मुंबईला आल्यावर कळलं. मला ईथले शिक्षणच नकोस वाटू लागलं. शाळेत काय शिकवायचे, हे मला समजायचं नाही. माझ्या मनातली ही भीती माझ्या आईने दूर केली. माझ्या मनात नव्याने शिक्षणाची गोडी तिने निर्माण केली. घरच्या परिस्थितीमुळे भावडांना शिकायला मिळाले नाही. आई - पप्पा नेहमी बोलायचे, "तू हुशार आहेस. तू खूप शिकशील." असा विश्वास त्यांनी मला दिला. परिस्थिती कशीही असो आपल्याला पुढे जायचंय. हेच आपलं ध्येय हे मी त्यांच्याकडून शिकले.

लहानपणापासून मला डॉक्टर व्हायचं होतं. दहावी नंतर सायन्सला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण घरच्या परिस्थितीमुळे मला कॉमर्सला ऍडमिशन घ्यायला लागलं. तिथेच माझं डाॅक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. घरालाही थोडा हातभार लागेल, ह्या हेतूने बारावी नंतरचं मी काम शोधू लागले. मला एका खेळण्याच्या दुकानात काम मिळाले, तिथून खऱ्या आयुष्याचा अर्थ काय असतो हे मला समजू लागले. नोकरी करतच पुढचं शिक्षण मी पदवीपर्यंतच पूर्ण केलं. त्यानंतर मास्टर्स पण केलं.
       
कोरोना आला तेव्हा मी एम.बी.ए. च्या सीईटीची तयारी करत होते. काम आणि स्टडी त्या परिस्थितीत करणं खूप कठीण होतं. बाहेरची स्थिती ऐकूनच घाबरून जायचे. त्यावेळी मी एकटीचं मुंबईत होते. घरची खूप आठवण यायची, पण जाऊ शकत नव्हते. मनाने मी खूप खचली होते. मानसिकता सगळी नकारात्मक झाली होती. त्या स्थितीत स्टडी करणंही मी सोडून दिलं. त्यावेळी मला सर्वात जास्त आधार माझ्या बेस्टफ्रेंडने दिला. माझा मनात निर्माण झालेला नकारात्मकपणा त्याने दूर केला. लॉकडाऊन नंतर सीईटी पास होऊन मी एम.बी.ए.ला अडमिशन घेतलं.
       
एम.बी.ए.च एक वर्ष पूर्ण झालं. आई - पप्पांनी लग्नाचा विषय काढला. आई- पप्पांनी मला सांगितलं नातेवाईकांमधला मुलगा आहे. नशीब एवढं चांगलं होतं की, घरच्यांनी मला जो मुलगा दाखवला तो माझा बेस्ट फ्रेंडच होता. गंमत तर ही होती की, आम्ही आधीपासूनच एकमेकांना आवडत होतो. आम्ही घरी सांगायच्या आधीचं घरच्यांनी माझ्यासमोर विषय काढला. नियतीनेच आमची लग्नगाठ बांधली. असं त्यावेळी मला वाटल होत. सगळीकडे आनंदी - आनंद होता. दोन्ही कुटुंब आनंदात होती. पण पुढे काय घडणार आहे, हे कोणालाच माहित नसतं. लग्न व्यवस्थित पार पडले. हातावरची मेहंदी उतरली नाही, तेच माझ्या नवऱ्याला ऍडमिट करावं लागलं. लग्नाला दहा दिवसही होत नाही, तोपर्यंत माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती देवाने माझ्याकडून हिरावून घेतली, तीही कायमची! नियती कधी काय करेल सांगता येत नाही. त्यानंतर मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेले. जगूच वाटतं नव्हतं. खूप वेळा जग सोडून जायचा विचार केला, अजूनही तोच विचार मनात येतो पण तेव्हा ज्यांनी जन्म दिला त्यांचा चेहरा आठवतो. खूप आठवणी मनात साठल्या. खूप काही राहून गेलं. नियतीने सर्व हिरावून घेतलं.

खचलेल्या मनाला स्वत:ला सावरता नाही येत. तरीही सावरायचा प्रयत्न करायचा. आपण दुसऱ्यांना समजावू शकतो, पण स्वत:ला नाही. हसावं वाटत नसताना हसावं लागतं. दु:ख पावला - पावलावर आहे. मात्र आनंद शोधावा लागतो. आपला आनंद आपणच तयार करावा लागतो.
           
✍? रेश्मा बोडके
0