Login

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 42

जगाने किती हि नाकारले तरी तू मला हवी हवीशी आहेस

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी भाग 42


प्रभाकर राव रूम मधे होते. मोहिनी ताई हळूच बाहेर आल्या. त्यांनी रूम बाहेरून लॉक केली. आशा काकू आल्या. "आशा रूम बंद केली ना."

"हो वहिनी. तस ही ह्यांना पडल्या पडल्या झोप लागते."

"बर झाल. नको त्या वेळी या दोघांना त्या श्रद्धाचा पुळका येतो. आज चान्स आहे तो सोडायचा नाही." मोहिनी ताई बोलल्या.

दोघी श्रद्धाच्या रूममध्ये आल्या. श्रद्धा त्या दोघींना बघून उठून बसली. "काही हव का मॅडम?"

" पाच मिनिट आहेत तुझ्याकडे. निघायचं इथून. आता तुला इथे राहता येणार नाही. " काकू बोलल्या.

"काय?" ती घाबरली होती.

"आदर्शला आता तू इथे राहिलेली नको आहेस. आणि आम्हालाही. तुझ्या पोराला घेवून नीघ आताच्या आता." काकू जोरात बोलल्या.

" कोणी सांगितल? आदर्श अस म्हणणार नाही. इतक्या रात्री मी कुठे जाणार? यांना येवू द्या. मी नीट बोलते त्यांच्याशी. त्यांचा गैरसमज दूर करते. ते म्हटले तर जाईन. " श्रद्धा घाबरत बोलली.

" नाही. आदर्शला तुझ्याशी बोलायच नाही. का त्रास देते आहेस त्याला. फक्त पाच मिनिटात निघायच. नाहीतर तुझ बाळ आम्ही तुला देणार नाही. श्रेयस इथे राहील. " मोहिनी ताई बोलल्या.

"हो. आम्ही सांगू आदर्शला श्रद्धाला घराबाहेर काढ. श्रेयसला राहू दे आणि आता हल्ली तो आमच ऐकतो तुला माहिती आहे. त्याच किती प्रेम आहे तुझ्यावर ते दिसल. " काकू कुत्सित पणे बोलल्या.

त्यांच्याबरोबर वॉचमन होता. त्याने श्रद्धाला हात धरून कॉटवर उठवलं. मोहिनी ताईंनी तिला ढकलल.

" काय करत आहेत मॅडम. असं करू नका. मला आदर्शशी बोलायच आहे. हे अस म्हणण शक्य नाही. "

" लावून बघ फोन. "

तिने फोन लावला. त्याचा फोन लागला नाही. काकू, मोहिनी ताईंना माहिती होत आज त्याचा फोन बंद आहे. थोड्या वेळा पूर्वी त्या संग्रामशी बोलल्या होत्या. त्याने सांगितल होत आदर्श बिझी आहे. अजूनही काम झाल नाही . फाॅरेनचे क्लायंट आहेत. त्यांना लवकरात लवकर काम संपवायच होत . मीटिंग मधे डिस्टर्ब होत म्हणुन त्या सगळ्यांचे फोन बंद होते.

"बघितल फोन लावून. फोन बंद आहे ना. मुद्दाम बंद केला त्याने फोन. आदर्श आता थोड्या वेळा पूर्वी आमच्याशी बोलला. तो रागाने दिल्लीला गेला आहे. घरात अजिबात शांती नाही. तुझ्या मुळे नुसती चिडचिड होते त्याची. जा बाई इथून त्याला शांततेत राहू दे." काकू खूप बोलत होत्या.

श्रद्धाच्या डोळ्यात पाणी होत. आदर्शने या दोघींना फोन केला. माझ्याशी का नाही बोलले. खरच त्यांना मी नको आहे का? काय करू? कुठे जावू इतक्या रात्री? आई तूच मार्ग दाखव. तुझी मुलगी संकटात आहे. आई तू असती तर मी तुझ्याकडे आली असती ना.

काकूने श्रेयसला तिच्या कडून ओढून घेतल. "केव्हाच सांगते आहे समजत नाही का. जा आता एकटी. श्रेयसला मी देणार नाही." त्यांनी त्याला वॉचमन कडे दिल. श्रेयस रडायला लागला.

"नाही प्लीज थांबा. मी जाते. श्रेयसला द्या आधी इकडे. तो रडतो आहे. मी परत कधी इकडे येणार नाही. मॅडम प्लीज माझ बाळ द्या. मी विनंती करते. श्रेयस ला द्या. मी जाते ना." ती वॉचमन कडून श्रेयुला घेत होती. तो देत नव्हता.

" या घरच्या आसपास जरी दिसली ना तर तुझ तुझ्या पोराच काही खर नाही समजल ना. नीघ लवकर. दे रे श्रेयसला तिच्याकडे. " काकू बोलली. वॉचमनने श्रेयुला दिल. श्रद्धाने पटकन त्याला स्वतः कडे घेतल.

" बाळासाठी औषध आणि कपडे घेऊ द्या त्याला स्वेटर घालते आणि मग जाते. "

काकू तिथेच उभे होते ती काय काय घेते ते बघत होत्या. तिने बाळाचे औषध, स्वेटर, शाल घेतली. थोडे कपडे घेतले स्वतःच्या मोबाईल आणि चार्जर घेतला पर्स घेतली आणि ती निघाली. या लोकांशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. माझ जावू दे आता श्रेयुला त्यांनी ठेवून घेतल तर मी एकटी पडेल. श्रेयुला तिने घट्ट धरल होत. ती पटकन निघाली.

या लोकांनी तिला बंगल्याबाहेर काढलं. ती बाजूला उभी राहिली तिने पर्समध्ये बघितलं पैसे नव्हते. तिला खूप राग आला होता. यांना मी एवढी नकोशी झाली का . तिने आदर्शला फोन केला. हे का अस बोलले. त्यांना नव्हत रहायच माझ्या सोबत तर सरळ सांगायच ना. की हे सगळं सासुबाई आणि काकूने केल असेल. कोणावर विश्वास ठेवणार. आदर्शचा फोन लागत नव्हता. तिने नंतर मीनाला फोन केला. मीनाचा फोन एंगेज होता. बहुतेक ऑफिस कॉल सुरू असेल.

तिने वॉचमन कडे पन्नास रुपये मागितले. त्याने दिले नाही. तिला हाकलून दिलं. ती श्रेयसला घेऊन चालतच निघाली. बरंच रहदारीचा रस्ता होता म्हणून बरं झालं. मीनाच पीजी होत त्या बाजूला जरा सुनसान एरिया होता ती तिथून जात होती. बस स्टॉप वर दोन मुलं दारू पीत बसलेले होते.

" कुठे जायचं आहे मॅडम आम्ही सोडू का? नाव तर सांग छान आहे ही. पोरगा कोणाचा आहे? थांब तर जराशी. एवढ्या रात्री रस्त्यावर काय करते आहेस?"

ते श्रद्धाच्या मागे यायला लागले. तस तिने पटापट चालायला सुरुवात केली. ती दमली होती. पुढे त्यांचे दोन मित्र पानपट्टी वर उभे होते ते सुद्धा यांच्यात सामील झाले. ते चौघ मिळून श्रद्धाला त्रास देत होते.

तेवढ्यात मीनाचा फोन आला. श्रद्धाने पटकन फोन उचलला. "मी तुझ्या पीजी पासून अगदी दहा मिनिटाचे अंतरावर आहे. पटकन ये मीना हे लोकं मला त्रास देत आहेत."

मीना काठी घेऊन पटकन पळत आली. रस्त्यावर बस स्टॉप दिशेने आली. तोपर्यंत श्रद्धा त्या लोकांशी भांडत होती. पोलिसांना फोन केला आहे सांगितल्यावर ते पळाले.

मीनाने पुढे होऊन श्रेयसला घेतलं. "काय झालं तू इतक्या रात्री काय करते आहे इथे?"

श्रद्धा रडत होती. त्या दोघी तिथे बस स्टॉप वर बसल्या. ती काय झालं ते सांगत होती.

"बापरे कठिण लोक आहेत हे. श्रद्धा रूम मध्ये चल."

"नको तिकडे. कोणाला समजायला नको मी इथे आहे ते. मला इथून दूर जायच आहे." श्रद्धा बोलली.

" कुठे जाणार? "

" माहिती नाही पण त्या घरात वापस जाणार नाही. ते लोक श्रेयुला घेवून घेतील." श्रद्धा परत रडत होती.

"मी आदर्श सरांना फोन करू का?"

"नाही. त्यांनीच सांगितलं आहे मला घराबाहेर जायला. त्यांना नाही रहायच माझ्या सोबत. ते कधीच त्यांच्या घरच्यांपासून वेगळे होणार नाही. जावू दे. मला परत त्या घरी जायचं नाही. आता मी नशिबाने तिथून निघाली आहे तर मी एकटी राहणार. आदर्श ही तसेच आहेत. रोज माझ्याशी भांडतात. पंधरा वीस दिवस झाले आम्ही बोलत नाही एकमेकांशी. त्यांनी माझ्यावर हात उगारला. ते श्रेयुला ही घेत नाहीत. माझ्या रूम मधे रहात नाहीत. आत्ता ही रागवून दिल्लीला गेले आहेत. त्या घरात कोणालाच मी नको आहे. मला भीती वाटते त्यांची. तिकडे रहायच नाही. नको ते लोक श्रेयूला देणार नाही. मी श्रेयु शिवाय राहू शकत नाही. " श्रद्धा रडत होती. मीनाला कसतरी वाटल.

" श्रद्धा परत एकदा विचार कर. एकदा सरांशी शांततेत बोलून घे. "मीना बोलली.

" झाल बोलून. मी म्हटले होत त्यांना आपण दुसरीकडे राहू. ते ऐकत नाही उलट मला खूप ओरडले. बोलले मला अॅडजेस्ट करता येत नाही. मला सारख माफी मागायला लावतात. त्या मॅडम डेंजर आहेत. आदर्श नसले की त्या ओरडतात. माझा विचार झाला आहे मी नाही राहणार तिकडे. मी जावू का?"

" कुठे जाणार एकटी. मी आहे ना."

" तु मला मदत केली हे समजल तर आदर्श ओरडतील. तुझा जॉब जाईल . " श्रद्धा घाबरली होती. माझ्या मुळे हीच नुकसान नको.

" काही होणार नाही. चल. "

कुठे ?

"इथून जवळ माझी मावस बहीण एका हॉटेल मध्ये आलेली आहे. तिच्या कडे जावु. मी उद्या भेटते तुला. इथे राहिली तर आदर्श सर पाच मिनिटात तुला घेवून जातील. फोन दे इकडे स्विच ऑफ कर. या पुढे कधीच चुकून फोन ऑन करू नकोस. " मीना बोलली.

तिने तो फोन मीना कडे दिला. " बरोबर आहे ते लोक फोन ट्रेस करतील. तुझ्या कडे राहू दे हा फोन."

मीनाने कोपर्‍यावरुन टॅक्सी बूक केली. दोघी तिची बहिणी स्वाती कडे आल्या. ती दिल्लीला रहात होती. इकडे कामा निमित्त आली होती.

" हिला राहू दे इथे तुझ्या सोबत .तू कधी वापस जाणार आहेस स्वाती ? " मीना बोलली.

" परवा. "

" हिला नेते का सोबत? तिला गरज आहे."

" ठीक आहे."

"तिला तुझ्या ओळखीच्या सेवाभावी संस्थेत सोड. मी बोलते त्या लोकांशी. तिथे काम करेल राहील ही." मीना सांगत होती.

"हो. पण तिथे गरीब निराधार बायका राहतात. पेमेंट विशेष मिळत नाही. " स्वातीने सांगितल.

"असू दे थोडे दिवस ती तिथे ठीक आहे. मुलगा लहान आहे तिचा."

"कोण आहे ही?"

"माझी मैत्रीण आहे. सासरच्या लोकांनी अर्धा रात्री तिला घरा बाहेर काढल. सगळे भांडतात. खूप त्रास आहे तिला. "मीना श्रद्धा बद्दल सांगत होती.

" माहेरचे?"

"नाही कोणी. "

"पोलिसात जा ना मग. सोडू नका त्या लोकांना. चांगला धडा शिकव. का घाबरते तू?" स्वाती बोलली.

"काही उपयोग नाही. मोठी पार्टी आहे. पोलिस लगेच फोन करतील आदर्श सरांना. परत तिथे जावून फसेल ती." मीना बोलली.

" तू जॉब करते ते बिल्डर का? "

" हो ही त्या सरांची बायको आहे. कोणाला सांगू नको ती इथे आहे. "

हो.

" ऐक श्रद्धा . स्वाती एका सेवाभावी संस्था साठी काम करते. ती तुला सांगेल कुठे जायच ते. तिथे रहा. सगळ्या बायका आहेत तिथे. चांगल वातावरण आहे. होईल तेवढ काम कर. ही स्वाती देईल तुला पैसे. श्रेयु साठी लागेल ते घे. पुढे मागे बघू नकोस. मी थोड्या दिवसानी येईन. माझ्या दुसर्‍या फोन वर फोन कर या पुढे. "मीना भराभर सांगत होती.

" हो. मीना थँक्यू." ती तिला येवून भेटली.

" मी उद्या तुला एक फोन घेवून येते. " मीना सकाळ पर्यंत तिथे होती. ती सकाळी वापस आली.

स्वाती, श्रद्धाने नाश्ता केला. स्वाती तिला तिच्या बद्दल माहिती विचारत होती." श्रद्धा काळजी करू नकोस दुपारी जेवण मागवून घे. मी संध्याकाळी येईन. दार लॉक कर." थोड्या वेळाने ती कामाला निघून गेली.

श्रेयू झोपला होता. श्रद्धा आदर्श बद्दल विचार करत होती. खरच यांनी सांगितल असेल का मला तिथून जायला. हे आता हल्ली रोज मला बोलतात. एकदा बोलून बघू का यांच्याशी. नको ते इकडे आले तर श्रेयुला घेवून गेले तर. तिने श्रेयुला एकदम जवळ घेतल. नको या पुढे त्या लोकांच नाव घ्यायच नाही. माझ बाळ माझ्या जवळ आहे हे खूप आहे. काय होईल पण पुढे? मी याला कस सांभाळणार? नोकरी नाही, पैसे नाही. मला कपडे नाही. ती रडत होती. कठिण परिस्थिती आहे. आई तूच बळ दे मला आता.

सकाळी सुलभा कामाला आली. बेडरूमच दार लोटलेलं होतं. कुठे गेल्या मॅडम आणि श्रेयश? ती विचारत होती. कोणाला माहिती नव्हत. तिने पूर्ण बंगल्यात फिरून बघितल.

अदिती उठून आली. आकाश पटकन आला. सगळे इकडे तिकडे बघत होते.

"वहिनी कुठे गेली?" तिने मोहिनी ताई आणि काकूंना विचारलं.

" मला माहिती नाही. मी आता उठले." मोहिनी ताई बोलल्या.

"कुठे गेली ही श्रद्धा? पळून तर गेली नाही ना. काय बाई सांगून जायची पध्दत आहे की नाही? काय समजायचं आपण आता. " काकू बोलत होत्या.

प्रभाकर राव उठून आले. सगळे आता श्रद्धाला शोधत होते. रात्रीच्या वॉचमनला विचारलं. सीसीटीव्ही कॅमेरा रेकाॅरडींग ऑन केले. तर काही दिसलं नाही.

" कोणी हात लावला याला? काय सुरू आहे हे? " प्रभाकर राव ओरडत होते.

अदितीने आदर्शला फोन केला. " दादा बिझी आहेस का?"

"नाही मी आता तुला फोन करत होतो. श्रद्धाचा फोन का लागत नाही? स्विच ऑफ आहे. तिला फोन दे. " आदर्श बोलला.

"दादा तुझा फोन काल बंद होता का ?"

"हो रात्री उशिरा पर्यंत मीटिंग होती. श्रद्धा कडे फोन दे ना. नंतर मी बिझी होईल. "आदर्श बोलला.

अदितीला काय बोलाव सुचेना. "दादा वहिनी आणि श्रेयश घरात नाही. ते कुठे गेले ते कोणालाच माहिती नाही . आम्ही सगळे शोधतो आहोत तिला. "

"म्हणजे काय? " आदर्श घाबरला.

"दादा, वहिनी रात्री पर्यंत घरात होती. सकाळी सुलभा आली तर तिने बघितल रूम मधे कोणी नाही."

"कुठे आहे ती?"