गोष्ट छोटी डोंगराएवढी..
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंगतसे छोटे मोठे असे खूप प्रसंग स्मरणात राहिलेत माझ्या जे इथे सांगता येतील. पण एका प्रसंग असा आहे की मी ठरवलं तरी कधीच विसरू शकत नाही. माझ्या संपूर्ण आयुष्याला योग्य वळण मिळण्याचे काम त्यादिवशी घडले.
माझी आई अभ्यासात हुशार असूनही घरच्या गरिबीमुळे तिला पुढे शिकता आलं नाही. पण तिच्या अंगी असलेल्या गुणांना पाहून नक्की वाटतं की तिला शिक्षण मिळालं असतं तर आज ती एखाद्या मोठ्या हुद्द्यावर काम करत असती. त्या सगळ्या गुणांमध्ये एक म्हणजे तिचा कमालीचा स्वाभिमान. कुणीही आपल्यावर बोट उचलून आपल्याला दोन शब्द सुनावण्याची वेळ आपल्यावर येऊ द्यायची नाही, असा तिचा नियम. अठरा विश्व दारिद्र्य पाहत मोठी झालेली असूनही तिने आपला प्रामाणिकपणा कधी सोडला नाही. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहताना तिच्या मनाला कधीच यातना झाल्या नाहीत. दुसऱ्याचं भलं पाहताना ती देवाकडे एकच मागते की देवा, आज त्याचं भलं केलंस तसं उद्या (किंवा अगदी परवा) माझंही कर!
तर आता मूळ मुद्द्यावर येतो. ही गोष्ट घडली त्यावेळी मी दुसरी किंवा तिसरीत असेन. मुंबईत मानखुर्दला माझी मावशी राहते. तिच्या घरी कसल्याशा कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो. छान आठवडाभर राहिलो होतो. एके दिवशी सकाळी भाजी वगैरे खरेदी करण्यासाठी माझी आई, बाबा, मावशीची मुलगी आणि तिचे यजमान बाहेर पडले. मग मी सुद्धा मागे लागून त्यांच्यासोबत गेलो. तिथल्या रस्त्यावर भरणार्या त्या बाजारात गेल्यावर टोमॅटो घेण्यासाठी एका भाजीच्या हातगाडीसमोर आम्ही उभे राहिलो. मोलभाव करताना आईने केलेल्या भावापेक्षा थोड्या चढ्या किंमतीत त्याने टोमॅटो दिले. मला त्याचा राग आला. मी गाडीच्या उंचीचा असल्याने कुणाच्याही नकळत एक टोमॅटो त्या गाडीवरून उचलून खिशात टाकला. इतकी शिताफी आपल्या हातात आहे, याचं कौतुक माझ्या गुपचूप खुदकन हसताना फुलणाऱ्या गोबऱ्या गालांवर दिसत होतं. तिथून पुढे गेल्यावर मी खिशात हात घालून टोमॅटो काढून पिशवीत ठेवायला आईकडे दिला. मला वाटलं आता मस्त शाबासकी मिळणार. त्यामुळे मी आईकडे त्या गोष्टीतल्या बाळाला सापापासून वाचवणाऱ्या प्रामाणिक मुंगसाप्रमाणे कौतुकाने पाहत होतो. पण झालं नेमकं उलट. आई प्रचंड रागावली. खरंतर ती खूप दुखावली गेली होती. कारण तिला माझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तिने माझी बकोटी धरली आणि इतकी जोरात धरली की माझा हात नंतर दिवसभर दुखत होता. मला तसाच बाजूला अक्षरशः फरफटत नेत रागाने म्हणाली,
“हे आज केलंस ते पहिलं आणि शेवटचं.. यापुढे असं काही वागलास तर ते समोर पोलिस काका आहेत. त्यांच्याकडे देईन तुला. त्यांच्या हातात तो दंडुका पाहिलास? त्याने तुला मारतील ते.. आणि मी अजिबात वाचवणार नाही तुला.."
मी त्या पोलिसाला बघून खरंच खूप घाबरलो. आणि त्याहीपेक्षा मला अपराधी वाटलं कारण आईच्या डोळ्यांत अश्रू होते. अगदी मला रागाने ओरडतानासुद्धा. तेव्हाचा आईचा तो चेहरा माझ्या आजही लक्षात आहे. त्या दिवसानंतर ते अगदी आजतागायत कुणाची एक वस्तू चोरणे, ढापणे हा प्रकार माझ्या हातून कधीच घडला नाहीच; पण कुणाला फसवणे हा विचारसुद्धा मला पाप वाटू लागला. पुढे जेव्हा आठवीत असताना माझ्या कंपास पेटीत गणिताची छापील सूत्रे होती. जी पाहून मी आरामात कॉपी करू शकलो असतो पण वर सांगितला तो प्रसंग आणि त्याची शिकवण माझ्यात इतकी भिनली होती की मी पेपर सुरू व्हायच्या आधी सरांना स्वतःहून तो गोष्ट सांगितली. परीक्षेचा निकाल लागल्यावर नेहमीसारखा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. पण निकाल देताना सरांनी मला पुढे बोलावून त्या कंपासपेटीच्या प्रसंगाचा उल्लेख करत माझं विशेष कौतुक केलं. घरी जाऊन मी जेव्हा ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा तिच्या डोळ्यांत प्रचंड अभिमान होता माझ्यासाठी. त्यावर्षी वार्षिक बक्षीस वितरण समारंभात (सन २००२) मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार खऱ्या अर्थाने अर्थात आई आणि तिच्या त्या शिकवणीचा होता. त्यादिवशी घरी पुरस्काराबद्दल समजलं तेव्हा आईने मला जवळ घेऊन माझं कौतुक केलं होतं. तो दिवस माझ्या कायम लक्षात राहील.
आजही माझ्या गावात, शाळेत वा कुणा नातेवाईकांच्या घरी कधी गेलो तर माझं फार चांगलं स्वागत होतं. आणि मला माहितेय याचं कारण माझी आई आणि तिची ती वेळप्रसंगी कठोर होऊन दिलेली शिकवण, हेच आहे.
© परेश पवार (शिव)
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा