माझ्या नवर्याची बायको?
" सिमरन , जस्ट घरी पोहोचलो आहे..थोडा वेळ दे ना...हो हो लगेच फोन करतो.."
घरात येणाऱ्या सुदीपचे बोलणे हॉलमध्ये पुस्तक वाचत असलेल्या आजोबांनी ऐकले. ते काही बोलणार इतक्यात " येतोच" असे म्हणून तो बेडरूममध्ये पळाला..
"वीर, ए वीर" आजोबांनी आवाज दिला..
" काय झाले आजोबा?"
"तुझा बाबा आजकाल तुझ्याशी बोलतो का? "
" नाही ओ.. ते सतत कामातच असतात ना.. आणि गेले काही दिवस घरी आले कि फोन चालू असतो.."
" तेच मी म्हणतो आहे. इतरवेळी माझ्याजवळ बसून माझ्याशी बोलणारा सुदीप आजकाल माझ्याशी बोलतच नाही.. आला कि कानाला फोन असतो.. जेवायचा एक तास सोबत असेल तेवढाच.. काय चालले असेल रे?"
" काय माहित? पण कोणत्यातरी बाईशी बोलत असतात एवढे मात्र नक्की.."
" कोण बाईशी बोलत असते," बाहेरून आत येणाऱ्या समीराने विचारले..
सांगायचे कि नाही अशा दृष्टीने आजोबांनी आणि वीरने एकमेकांकडे पाहिले.. आणि समीराच्या हातच्या खाल्लेल्या अन्नाला जागून खरे सांगायचे ठरवले..
" तू आधी हातपाय तर धुवून घे.."
" नाही.. आधी काय ते सांगा.."
" विशेष काही नाही..मी आणि वीर बोलत होतो कि आजकाल सुदीप आमच्याशी न बोलता फोनवर जास्त असतो.." आजोबा दरवाजाच्या दिशेने पहात म्हणाले..
" माझ्याशी सुद्धा बोलत नाही.. काही विचारले कि सांगतो.. ऑफिसचे काम आहे.."
" कोणत्यातरी बाईशी बोलत असतात", वीरने आगीत तेल ओतले ..
" आता काय करायचे बाबा?"
" बघू दोन दिवस वाट, मग ठरवू"
" काय ठरवाठरवी चालली आहे एवढी", अचानक सुदीपने पाठून विचारले..
" काही नाही , रविवारी खास बेत काय करायचा हे ठरवत होतो.."
" अरे , बरी आठवण केली..मी सांगणारच होतो.. रविवारी मी बाहेर जातोय , जेवायला नाहीये.."
तिघांनीही एकमेकांकडे सूचक नजरेने पाहिले..
" कुठे जाणार आहेस?"
" आता काय तुला सांगून जायचे का रोज? कधीतरी सोड ना एकट्याला?"
" मी सहजच विचारले.. चिडायला काय झाले एवढे?"
" समीरा, तू आत्ताच आलीस ना जा जरा फ्रेश हो. आपण बोलू नंतर".. आजोबांनी परिस्थिती सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला..
हो... हो...हो हे आपले जुनेच मध्यमवर्गीय कुटुंब आहे.. सुदीप, समीरा दोघेही बँकेत कामाला आहेत, त्यांचा कॉलेजकुमार वीर आणि घरातले निवृत्त आजोबा..आता बघूया खरेच समीराला सवत येणार का?
रविवारी सकाळी सुदीप अंघोळीला गेला आहे हे पाहून उरलेल्या तिघांची परत सभा भरली..
"बाबा, सुदीप तर बाहेर चालला आहे. आजपर्यंत कधीच कुठे जातो आहे हे घरी न सांगता तो गेला नाही.."
" काळजी करू नकोस.. वीर तू आणि मी ना त्याचा पाठलाग करून.बघू कुठे जातो ते.."
" बाबा मी पण येउ? नको.. काही वेडेवाकडे दिसले तर तुला त्रास होईल.. त्यापेक्षा आम्हीच जातो.."
"म्हणजे बाबा, तुम्हाला हि असेच वाटतंय , त्याच बाहेर काहीतरी आहे म्हणून? माझ्या सोळा वर्षांच्या संसाराचे काय ?" समीराने रडत विचारले
" आई मी तुझ्या लग्नात होतो?" बुचकळ्यात पडलेल्या वीरने विचारले..
" काहिही काय विचारतोस ? प्रसंग काय आणि बोलतोस काय?"
" अग मग मी सतरा वर्षाचा असताना तुमच्या लग्नाला सोळा वर्ष कशी झाली..माझी आपली एक शंका?"
" वीर, सोळा कि अठरा नंतर बोलू. जा आत आवरून ये..येताना माझा गॉगल आणि हॅटपण घेऊन ये.."
" गॉगल आणि हॅट कशाला?"
" कशाला म्हणजे.. आता आपण थोडे डिटेक्टिव्ह होऊया.."
" काय बाबा कुठे चाललात का? " अंघोळ, दाढी, नवीन शर्ट घालून आलेल्या सुदीपने विचारले.. येताच परफ्युमचा मस्त वास आला.." आणि हिला काय झाले?"
" आई कांदे चिरत होती ना म्हणून.."
" चला मी निघतो, माझी वाट पाहू नका.."
सुदीप घराबाहेर पडताच त्याच्या पाठोपाठ हे दोन डिटेक्टिव्ह पण बाहेर पडले.. पण एका तासातच घरी परत आले..
" काय झाले? लगेच कसे आलात तुम्ही?"
" अग , आम्ही खाली जाईपर्यंत सुदीप गायब झाला होता..आम्ही इथेतिथे पाहिले, पण नाही दिसला.."
" मग तुम्ही काय करत होता.."
" काही नाही. खाली उतरलोच होतो तर जरा हॉटेलात जाऊन थोडे खाऊन आलो.. तुझ्यासाठी पण गरम वडा आणला आहे. खाऊन घे."
" बाबा अशा परिस्थितीत कसे हो काय जाईल? उद्या सुदीपने घटस्फोट मागितला तर? मी कशी राहणार हे घर सोडून, तुम्हाला सोडून? काल तो फोनवर सांगत होता, घटस्फोटाची घाई नको.. थोडे दिवस वाट बघू."
" आई मी तुझ्यासोबतच राहणार.." वीर म्हणाला," बाबांसोबत राहून जेवणाचे हाल कोण करून घेईल?" हे वाक्य मनातल्या मनात..
"मी हि तुला या घराबाहेर जाऊ देणार नाही..आजोबा म्हणाले.." एवढी वर्ष तुला स्वयंपाक शिकवला आहे.. आता परत नवीन कोणाला तरी शिकवायचे नको रे बाबा.." हे वाक्य अर्थातच मनातल्यामनात..
इथे काय उलथापालथ चालली आहे याची सुदीपला कल्पनाच नव्हती..रात्री जेव्हा तो घरी आला तेव्हा आजोबा, समीरा आणि वीर तिघेही त्याची वाट पहात होते.
" सुदीप तुला घटस्फोट हवाय माझ्याकडून?" समीराने पहिला हल्ला चढवला..
" काय?" आश्चर्यचकित सुदीप..
" बाबा पण मी आईसोबतच राहणार.." वीरचा दुसरा हल्ला..
" मीपण तिच्या सोबतच राहणार आहे. पण मला कळेल का काय चालले आहे?" सुदीप..
" काही झाले तरी समीरा काही इथून जाणार नाही, तुला जायचे असेल तर तू जा.." आजोबा..
" घराबाहेर समीराही जाणार नाही आणि मी ही. काय चालले आहे प्लीज मला कोणी सांगेल का?"
" आम्ही काय सांगायचे? तूच तर काल रात्री घटस्फोटाची घाई नको असे म्हणालास" समीरा रागाने म्हणाली..
" अरे ते होय.." सुदीप जोरजोरात हसत म्हणाला.." तुम्ही ना सुतावरून स्वर्ग गाठता बाबा.."
"म्हणजे?" तिघांनीही एकत्रच विचारले..
" माझी एक मैत्रीण आहे सिमरन म्हणून. ती नुकतीच इथे आली आहे. तिचे तिच्या सासरच्या मंडळींशी पटत नाही. म्हणून ती घटस्फोट घ्यायला चालली होती.. असे करू नकोस असे मी तिला सांगत होतो.. आज तिच्या घरी तिचे आईबाबा, तिचा नवरा आणि तिच्या सासरचे आले होते.. त्या सगळ्यांना समजावून सांगितले.. त्यांची भांडणे मिटवली आणि मग घरी आलो.. तर इथे तुमचे वेगळेच काहीतरी.." सुदीप थोडे नाराज होऊन म्हणाला..
" पण मग तुला आम्हाला सांगायला काय झाले होते.. फुकटचा आम्हाला मनस्ताप.." समीरा अजूनही घुश्शयात होती..
" मी म्हटले आपल्या सुखी कुटुंबात त्यांची भांडणे कशाला.. पण या पुढे मी काहिही लपवणार नाही.. ओके.."
" हे बघ सुदीप तू जरी माझाच मुलगा आहेस तरिही माझ्यासारखे घर सांभाळून अशी कौन्सिलिंग ची कामे तुला जमत नाहीत, आणि या वीरला जमतील कि नाही माहित नाही...
" सहमत बाबा.." सुदीपने हात जोडले..
कथा कशी वाटली, सांगायला विसरू नका...
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा