Login

माझ्याशी ही बोला भाग 2

माझ्याशी ही बोला मी पण तुमच्या घरचा एक भाग आहे
माझ्याशी ही बोला भाग 2
मी पण तुमच्या घरचा एक भाग आहे

©️®️शिल्पा सुतार

मैत्रिणींचे लग्न जमले होते तेव्हा त्यांचे मिस्टर किती वेळ त्यांना फोन करत असत. सारख भेटायला येत होते. गिफ्ट आणायचे. ते फिरायला जात होते. त्यांना भेटायला त्यांच्याशी बोलायला त्यांचे नवरे किती अधीर होते हे तिने बघितल होत. पण इथे का नाही अस? यांना मी आवडत नाही का? यांचा असा काय शांत स्वभाव आहे ते समजत नाही. माझा ना दम घुटतो इथे. मला माझ्या आईकडे जायचं आहे. तिच्या डोळ्यात पाणी होतं. माझ का नशीब अस?

थोड्यावेळाने टीव्ही बंद झाल्याचा आवाज आला. त्याबरोबर संतोष आत मध्ये आला. नेहमीप्रमाणे रूम बंद झाली. तिला काही हवं आहे की नको आहे याचा विचार न करता त्याने नेहमीप्रमाणे तिला अंगाखाली घेतलं . तिने सुरवातीला विरोध केला. पण काही उपयोग झाला नाही. त्याच्या पुढे तीच काही चाललं नाही. ती तशीच गप्प पडून होती. थोड्यावेळाने तो झोपला.

ती बराच वेळ जागी होती. जाऊदे विचार करून काही उपयोग नाही. मी किती रडले चिडले तरी कोणाला फरक पडणार नाही. ते त्यांचे त्यांचे खुश आहेत. मी बाहेरची आहे ते कश्याला मला त्यांच्यात घेतील. आपलं आपलं काम करा शांत रहा. झोपू या आता. सकाळी लवकर उठावं लागतं.

ती सहाला उठली. अंघोळ झाली. चहा ठेवला. संतोष साठी डबा बनवला. नणंद कॉलेजला जाणारी होती. तिचा डबा भरून दिला. सगळ्यांसाठी पोहे केले. नाष्टा चहा झाल्यानंतर संतोष ऑफिसला निघून गेला. ती लांबून त्याच्या कडे बघत होती.

तिने रोज प्रमाणे धुण भांडे केले. स्वयंपाक काय करावा हे विचारायला ती पुढे हॉल मधे आली. सासूबाई फोनवर बोलतांना दिसल्या. कोणाचा फोन आहे काय माहिती?

सासूबाई तिला आवाज देत होत्या. "राखी घे ग तुझ्या आईचा फोन आहे."

राखी खुश होती. ती आईशी बोलत होती.

"आपल्या उमाच लग्न जमलं. काल बैठक झाली. विशेष कोणाला बोलावलं नव्हत. घरघुती कार्यक्रम होता. " आईने सांगितल.

राखीला मनात थोड वाईट वाटल की मला बोलवलं ही नाही या लोकांनी. यांच्या साठी ही मी परकी झाली आता. पण ती काही म्हटली नाही. "अरे वाह कोण आहेत लोक?"

आई सगळं सांगत होती. " आता साखरपुड्याचा कार्यक्रम करून घेवू. लग्नाची तारीख दिवाळी नंतर धरु. "

" मुलाकडचे चांगले आहेत ना आई? बोलतात ना ते उमाशी? " कारण हे अस एकट रहाणं कठिण असत. हे तिला चांगल माहिती होत.

" हो चांगला आहे मुलगा. बघायला आला होता तरी अर्धा तास तिच्याशी बोलत होता."

"मग बर आहे. "

" राखी बेटा तुझ कस सुरू आहे? "

आईने अस विचारल्यावर तिला एकदम हुंदका फुटला. पण तिने तो एकदम दाबला. शांत रहायला हव. "आई एक मिनिट पाणी पिते."

" काय झालं ग. काही त्रास होतो का? "

" नाही ठीक आहे. "

"मी विचारल कस सुरू आहे तुझ?"

" बर म्हणाव लागेल. " तिने सांगितल.

" काय झालं चिडले का घरचे? त्यासाठी तुला सोडून त्यांना फोन केला. कार्यक्रमाला तुझ्या घरच्यांना ही बोलावलं आहे." आई बोलली.

"चिडलेले नाहीत चांगले आहेत हे लोक. फक्त खूप शांत आहेत. विशेष गडबड नसते इकडे. "

" तु दोन दिवस आधी ये."

"आई माहिती नाही घरचे पाठवतील की नाही. मी सांगते तुला. " तिला वाटल होत सासुबाई बोलतील लग्न जमवतांना संतोषला नाही बोलवलं. त्यामुळे ती घाबरली होती.

आईला माहिती होत राखी नाराज आहे. बहुतेक काहीतरी घरचा प्रॉब्लेम आहे. तरी त्यांनी काणाडोळा केला. दोन मुली, एक मुलगा, नवरा बायको, आजी त्यांच मोठ कुटुंब होत. राखीच लग्न लवकर केल. त्या लग्नात उमाला पाहुण्यांनी बघितल होत. लगेच पसंत केल. एक एक जबाबदारीतून ते मुक्त होत होते. राखीला त्रास असला तरी तिने सासरी रहाव अस त्यांना वाटत होत.

राखीला अजिबात कोणाचा आधार नव्हता. दिल्या घरी रहाव लागेल. अस होत.

तिला हे माहिती होत. ती माहेरी काही सांगू शकत नव्हती. मागे ती थोड बोलली होती. हे माझ्याशी बोलत नाही. तेव्हा आई तिला बोलली होती. "आत्ताच तर लग्न झालं. लगेच काय समजलं तुला नवऱ्याबद्दल. थोडा वेळ लागतो संसाराची घडी बसायला. जरा सहनशील रहा. आपल्या मागे भाऊ बहीण आहे याची आठवण ठेव जरा."


0

🎭 Series Post

View all