माझ्याशी ही बोला भाग 3
मी पण तुमच्या घरचा एक भाग आहे.
मी पण तुमच्या घरचा एक भाग आहे.
©️®️शिल्पा सुतार
राखी नाराज होती. कोणाला माझ्या बद्दल सांगून काही उपयोग नाही. मलाच हे ठीक करावे लागेल. कसं करणार पण?
संध्याकाळी संतोष आला. नेहमीप्रमाणे तो त्याच्या आई बाबां जवळ बसलेला होता. राखी स्वयंपाक करत होती. ते तिघं काहीतरी बोलत होते. राखी पाणी द्यायला बाहेर गेली तर ते सगळे गप्प बसले. जसं काही ते काय बोलता आहेत ते हिला समजू द्यायचं नव्हतं.
तिला वाईट वाटलं ती आत निघून गेली. नंतर बाहेर आली नाही. स्वयंपाक झाला तरी किचनमध्येच बसलेली होती.
"राखी झालं नाही का अजून?" सासुबाई आवाज देत होत्या.
"झालं आहे आई. तुम्ही लोक बोलत होते ना म्हणून मी तिकडे आली नाही." ती बोलली.
"ताट कर आता."
जेवताना सासूबाई बोलल्या. "तुम्ही दोघे जाऊन या हिच्या माहेरी कार्यक्रमाला."
तिला आनंद झाला. "आई तुम्ही नाही येणार का?"
"नाही पुढे जाऊ एखाद्या कार्यक्रमाला. तुम्ही सकाळी जा आणि संध्याकाळी या. "
" मी दोन दिवस आधी जाऊ का? आईला मदत होईल. " तिने हळूच विचारल.
" आदल्या दिवशी जा. संतोषलाही घेऊन जा आणि दुसऱ्या दिवशी परत या. "
ती हो बोलली. तिची तयारी झाली होती. यांचे कोणते कपडे घ्यायचे. काही माहिती नाही?
सकाळी तिने संतोषला विचारलं ."अहो तुमचे कुठले कपडे घ्यायचे? "
" आईला विचार." तो ऑफिसला निघून गेला.
तिला संतोषच्या वागण्याचा खूपच कंटाळा आला होता. तिने तिच्या नणंदेच्या मदतीने तयार केली.
त्या दिवशी संतोष हाफ डे आला. चहापाणी झाल्यानंतर ते दोघे तिच्या घरी जायला निघाले. दोन तासाचा रस्ता होता. मोटरसायकल वरच निघाले होते. रस्त्याने ही संतोष विशेष बोलला नाही. त्यामुळे ती पण त्याच्याशी बोलली नाही.
माहेरी आल्यावर ती पटकन आत मध्ये निघून गेली. आईने तिला बाहेर जाऊन संतोषला चहा द्यायला सांगितलं. तिने तिच्या भावाला पिंटूला पाठवलं. संतोष गप्पा मारत बसला होता. जेवणाची वेळ झाली. त्याला कपडे लागत होते. टॉवेल लागत होता. तो बघत होता राखी कुठे दिसते आहे का? तिने दुर्लक्ष केलं. त्याने तिला हाक मारली. "काय हवं असेल ते पिंटूला सांगा. मला सांगायचं नाही."
तो आश्चर्यचकित होवुन बघत होता. हे काय वागण? हिला माहेरी आल्यावर झाल काय ? ही हिच्या घरी माझ्याशी बोलत ही नाही. मला एकट पाडल.
पिंटूने घरातलाच एखादा टॉवेल आणून दिला. त्याची खूपच गैरसोय झाली. जेवणाची वेळी पण तो रुसलेला होता. राखीने लक्ष दिलं नाही. नेहमी तीन पोळ्या खाणारा संतोषने आज एकच पोळी खाल्ली होती. तरीसुद्धा राखीने विचारलं नाही. लागलं तर सांगतील. मी कशी राहते त्यांच्याकडे. कोणीशीही न बोलता. तसं त्यांना काही वाटलं तर सांगतील.
रात्री झोपताना पण त्याला पायजमा हवा होता. राखी दिसली नाही. त्याने आहे त्या ड्रेसवर झोपून घेतलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुड्याच्या कार्यक्रम होता. खूप गडबड सुरू होती. त्याने आंघोळ केली की नाही हे सुद्धा राखीने बघितलं नाही. आहे की घरात बाकीचे. काही हव तर बोलेल तो.
ती आई वडिलांशी घरात बोलत होती. संतोष तिला शोधत आला. ती गप्प बसली. संतोष समोर काही सांगितलं नाही. संतोषला ते समजलं तो नंतर पूर्ण कार्यक्रमात गप्प बसून होता.
राखीला कल्पना होती की या गोष्टीचा तो राग काढेल. तिने ऐकायची तयारी ठेवली होती. तिचा उद्देश हाच होता की अस वागल तर कस वाटत हे त्याला समजायला हव.
कार्यक्रम शांततेत पार पडला.
संतोषला राग आला होता पण तो राखीच्या घरच्या बाकी लोकांना काही बोलला नाही. त्यांना त्रास दिला नाही. तेवढा बरा होतो तो. तिच्या आई-वडिलांचा मान राखून होता. प्रॉब्लेम हाच होता की तो फक्त तिच्याशी बोलत नव्हता. मोकळ रहात नव्हता. आपली बायको किती एकटी पडली आहे हे त्याला समजत नव्हतं.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा